Belly Fat can Cause Cancer: अलीकडच्या एका अभ्यासातून पोटातील चरबी आणि महिलांमध्ये दीर्घकालीन वेदना यांच्यातील महत्त्वपूर्ण संबंध उघड झाला आहे.
टास्मिनिया विद्यापीठ आणि इतर संस्था यांच्या संशोधनात असं आढळलं की पोटातील चरबी, विशेषतः व्हिसरल अॅडिपोज टिशू (VAT) आणि सबक्युटेनियस अॅडिपोज टिशू (SAT) ही शरीरातील अनेक ठिकाणी होणाऱ्या हाडे आणि स्नायूंमधील दुखण्याला कारणीभूत ठरते.
रीजनल अॅनेस्थेशिया अँड पेन मेडिसिन या जर्नलमध्ये छापलेल्या अभ्यासात यूके बायो बँकेतील ३२,००० हून अधिक लोकांच्या माहितीचा अभ्यास करण्यात आला आणि पोटातील चरबी ही दीर्घकाळच्या दुखण्याची संवेदनशीलता वाढवण्यामध्ये चिंताजनक भूमिका बजावते, असे आढळले.
पोटाची चरबी दीर्घकालीन वेदनांमध्ये कशी कारणीभूत ठरते (Belly Fat leads to Chronic Pain)
पोटाची अतिरिक्त चरबी, खासकरून व्हिसरल फॅट (VAT) ही शरीरात सक्रिय असते आणि जळजळ वाढवणारे घटक तयार करते, यामुळे दुखण्याची तीव्रता वाढते आणि फायब्रोमायल्जियासारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका वाढतो. डायटिशियन आणि डायबिटीज शिक्षिका कनिका मल्होत्रा यांच्या मते, व्हिसरल फॅटमुळे शरीरातील दुखण्याची प्रतिक्रिया आणखी वाढते. हे महिलांमध्ये जास्त आढळते, कारण त्यांच्यातील हार्मोन्स (जसे एस्ट्रोजेन) चरबी कशी साचते आणि चयापचय यावर परिणाम करतात, त्यामुळे महिलांना पोटावरची चरबी आणि दीर्घकाळच्या दुखण्यामधील संबंध जास्त त्रासदायक ठरतो.
फक्त दीर्घकाळचं दुखणं नाही, तर पोटाची अतिरिक्त चरबी पुरुष आणि महिलांसाठी अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकते. डॉ. चॅटर्जी यांच्या मते, यामधील काही सामान्य समस्या म्हणजे :
मेटाबॉलिक सिंड्रोम : ही अशी काही स्थिती आहे जी हृदयविकार, स्ट्रोक आणि टाइप २ मधुमेहाचा धोका वाढवते आणि यामागे मुख्य कारण म्हणजे पोटातील व्हिसरल फॅट (आंतरस्तरीय चरबी).
हृदयविकाराचे आजार : पोटाची चरबी ही हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबाशी (बीपी) थेट संबंधित असते.
टाइप २ मधुमेह : पोटाची चरबी इन्सुलिनचा परिणाम कमी करते, ज्यामुळे शरीराला रक्तातील साखर नियंत्रित करणे कठीण जाते.
स्लीप अप्निया : पोटावरची जास्त चरबी झोपेत श्वास घेण्यात अडथळा आणू शकते, ज्यामुळे स्लीप अप्नियाचा धोका वाढतो.
फॅटी लिव्हर रोग : व्हिसरल फॅट (VAT) यकृतात चरबी साचण्यास कारणीभूत ठरते, ज्यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगाचा धोका वाढतो.
कॅन्सर : पोटावरची चरबी ही ब्रेस्ट, कोलन आणि एंडोमेट्रियल कॅन्सरसारख्या आजाराचा धोका असण्याशी संबंधित आहे.
वंध्यत्व : पोटावरील जास्त चरबी हार्मोन्सच्या असंतुलनामुळे प्रजननक्षमतेवर (फर्टिलिटीवर) परिणाम करू शकते.
जीवनमानात घट : जास्त पोटाची चरबी आत्मविश्वास, शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि एकूणच आरोग्य यावर वाईट परिणाम करते.
पोटातील चरबी आणि तीव्र दीर्घकालीन वेदना व्यवस्थापित करणे
डॉ. चॅटर्जी सांगतात की, पोटाची चरबी कमी करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. यामध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि BMI सोबत कमरेचे माप तपासणे आवश्यक आहे. ज्या लोकांना लठ्ठपणामुळे दीर्घकाळाचे दुखणे होत असेल, त्यांना पुढील उपचारांसाठी (जसे औषधोपचार किंवा बॅरियाट्रिक सर्जरी) डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असू शकते.