Two Holes In Heart Bipasha Basu Daughter Condition: बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये कन्यारत्न प्राप्त झाले. बिपाशा- करणची लेक देवी बसू सिंग ग्रोव्हर हिच्या जन्मानंतर तिच्या हृदयात दोन छिद्र असल्याचे समजले होते. यावरील उपचारांसाठी अवघ्या तीन महिन्यांच्या देवीवर शस्त्रक्रिया करावी लागली होती. अलीकडेच नेहा धुपियासह इंस्टाग्राम लाईव्हवर, बिपाशाने या कठीण काळाविषयी उघडपणे भाष्य केले. “मला बाळ होण्याच्या तिसऱ्या दिवशी कळलं की आमच्या बाळाच्या हृदयात दोन छिद्र आहेत. कोणत्याच पालकांच्या आयुष्यात अशी वेळ येऊ नये. मी हे सगळं शेअर करणार नव्हते पण माझ्यासारख्या अन्य मातांना याविषयी माहिती मिळावी आणि मदत व्हावी असा माझा हेतू आहे.” असे बिपाशा म्हणाली.

देवीच्या हृदयात तयार झालेली दोन छिद्रे ही स्थिती वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट म्हणून ओळखली जाते. बिपाशाने या स्थितीविषयी सांगितले की, “आम्हाला व्हीएसडी म्हणजे काय हे सुद्धा समजले नाही. सुरुवातीचे काही दिवस आम्हाला काहीच समजत नव्हते. जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये स्कॅनिंग केले तेव्हा देवीच्या हृदयातील छिद्राचा आकार पाहून डॉक्टरांनी सुद्धा चिंता व्यक्त केली होती. यावेळी शस्त्रक्रिया करणे हाच पर्याय उरला होता. डॉक्टरांनी आम्हाला देवी तीन महिन्यांची झाल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. देवीवर सहा तास सलग शस्त्रक्रिया सुरु होती. पण त्यानंतर आता देवीची तब्येत उत्तम आहे. आम्ही शस्त्रक्रियेचा अगदी योग्य निर्णय घेतला होता. “

बिपाशाने म्हटल्याप्रमाणे ‘वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट’ ही स्थिती काय आहे हे सामान्य व्यक्तींना माहितही नसते. त्यामुळेच आज आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून या स्थितीसंबंधित सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत..

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज रमेश बत्रा (बत्रा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर) यांच्या माहितीनुसार हृदयात छिद्र तयार होण्यासाठी तीन मुख्य करणे असू शकतात.

१) अॅट्रिअल सेप्टल डिफेक्ट (एएसडी) या परिस्थितीत आर्टरीजमध्ये छिद्र तयार होते.
२) वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट (VSD) मध्ये इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टममध्ये छिद्र तयार होतात.
३) पेटंट डक्टस आर्टिरिओसस (PDA) मध्ये फुफ्फुसीय धमनी आणि महाधमनी यांच्या स्थितीत बिघाड जाणवू शकतो.

हृदयात छिद्र होण्याचे कारण काय?

डॉ सुभेंदू मोहंती, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, शारदा हॉस्पिटल, नोएडा यांनी सांगितले की, जेव्हा आपण म्हणतो की एखाद्याच्या हृदयाला छिद्र आहे. तेव्हा अनेकदा हृदयात एकापेक्षा जास्त छिद्र असू शकतात. खरं तर, हृदयातील दोन छिद्रांचे कारण, लक्षणे आणि उपचार हे हृदयाच्या एका छिद्रासारखेच असतात. अशी स्थिती निर्माण होण्यामागचं कारण अनेकदा अनुवांशिक असतं. पण काहींच्या बाबत अशी स्थिती जन्मतः उद्भवण्याची शक्यता असते आणि त्यामागे कोणतंही कारण नसतं.

हृदयात छिद्र झाल्याची लक्षणे काय?

डॉ बत्रा यांनी सांगितले की या स्थितीचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे श्वासोच्छवासात अडथळा, याशिवाय वारंवार फुफ्फुसाचा संसर्ग (न्यूमोनिया), हृदय कमकुवत होणे, शारीरिक वाढीस अडथळा निर्माण होणे हे सुद्धा व्हीडीएसचे संकेत असू असतात. डॉ मोहंती यांनी असेही नमूद केले की लक्षणे आकारावर अवलंबून असतात. लहान छिद्र असल्यास लक्षणे अगदी सौम्य असू शकतात तर नसतात. मोठ्या छिद्रांमुळे रडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दूध पिण्यास त्रास होणे आणि वाढ खुंटणे असेही त्रास होऊ शकतात.

हे ही वाचा<< महिनाभर गहू न खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होईल? पोळ्या टाळून वजन कमी होणार का, वाचा तज्ज्ञांचं उत्तर 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हृदयात छिद्र होण्यावर उपचार

या स्थितीवर उपचार म्हणजे त्वरित वैद्यकीयल सल्ला घेणे. ही स्थिती शस्त्रक्रियेद्वारे पूर्णपणे बरी करता येते. तर लहान छिद्र कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय स्वतःच बंद होऊ शकतात.