Banana on Empty Stomach: केळी हे एक चविष्ट आणि पौष्टिकतेने समृद्ध असे फळ आहे. ते प्रत्येक ऋतूमध्ये उपलब्ध असते. अनेक जण नाश्त्यामध्येही केळाचा समावेश करतात. पण बऱ्याच जणांमध्ये संभ्रम असतो तो म्हणजे केळी नक्की कधी खाल्ली पाहिजेत. सकाळी, दुपारी की संध्याकाळी. शिवाय, मुळात म्हणजे केळी रिकाम्या पोटी खावीत का हा मोठा प्रश्न अनेकांना पडतो.

रिकाम्या पोटी केळी खाण्याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. काहींसाठी ते फायदेशीर ठरू शकते, मात्र काहींना याचा त्रास होऊ शकतो. मात्र, केळं हे असं फळ आहे, जे योग्य वेळी योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचा शंभर टक्के फायदा शरीराला होतो. त्यामुळे तुम्हाला जर केळी खाऊन त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळवायचा आहे तर हे नक्की वाचा…

केळी खाताना काय काळजी घ्याल?

केळी पोषण, ऊर्जा प्रदान करतात, पचन सुधारतात आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. असं असतानाही काही लोकांना रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने आम्लता, गॅस किंवा रक्तातील साखर वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. आम्लता, मायग्रेन किंवा पोटाच्या समस्या असलेल्या लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी केळी खाणे टाळावे. तसंच याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अॅसिडिटी आणि गॅस असलेल्यांनी सावध रहावे

केळामध्ये मॅग्नेशियम आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे काही लोकांमध्ये आम्लपित्त, गॅस किंवा पोटफुगी होऊ शकते. म्हणूनच अशा लोकांनी ते टाळावे.

रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते आणि हे डायबिटीज रूग्णांसाठी धोकादायक आहे. केळांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाणही लक्षणीय असते, त्यामुळे डायबिटीज रूग्णांनी केळी खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ज्या लोकांना आधीच पोट किंवा पचनाच्या समस्या आहेत, त्यांना रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने समस्या येऊ शकतात. ज्यांना बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय केळी खाणे टाळावे.

केळी नेमकी कधी खावीत?

केळी खाल्ल्याने भरपूर ऊर्जा मिळते, म्हणून जर तुम्हाला नाश्त्यात केळं खायचं असेल तर तुम्ही ते ओटमील, दही किंवा सुकामेवा यासोबत एकत्रितपणे खाऊ शकता. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर अर्ध्या तासाने किंवा व्यायामानंतर लगेच केळी खाणे फायदेशीर ठरू शकते. तुम्ही दुपारच्या जेवणानंतर किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणूनही केळं खाऊ शकता. आयुर्वेदानुसार, केळं थंड असतं त्यामुळे रात्री केळाचे सेवन करू नये असा सल्ला दिला जातो.