Blood Tests For Heart Disease : बदलती जीवनशैली, धावपळीचे जीवन, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव; यामुळे हल्ली तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत आहे. यावेळी हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी वेगवेगळे सल्ले दिले जातात. पण, आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की, शरीराच्या आतील स्थिती जाणून घेण्यासाठी हृदयाची विशेष तपासणी करणे आवश्यक असते. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, काही रक्त चाचण्या तुम्हाला तुमच्या हृदयाच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल माहिती देऊ शकतात आणि काय बदल केले पाहिजे, याविषयी सतर्क करू शकतात
सामान्यत: डॉक्टर रुग्णाची तपासणी करताना पाच मार्करची मदत घेतात. यात रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, कोलेस्ट्रॉल, बॉडी मास इंडेक्स किंवा कंबरेचे मापन आणि झोपेचा कालावधी तपासतात. यावेळी हृदयाच्या आरोग्यस्थितीबाबत जाणून घेण्यासाठी डॉक्टरांकडून रक्ताच्या विविध चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो. पण, या चाचण्यांचे रिपोर्ट जेव्हा हातात येतात तेव्हा त्यातील आकडे आपल्याला अजिबात समजत नाही. अशा परिस्थितीत तुमच्या रक्ताचे रिपोर्ट योग्यरित्या कसे वाचायचे आणि त्यावर काय उपाय करता येतील याविषयी बंगळुरूच्या मणिपाल हॉस्पिटलचे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट सल्लागार डॉ. कुमार केनचप्पा यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
कोलेस्ट्रॉल टेस्ट किंवा लिपिड पॅनल प्रोफाइल
आपल्या शरीरात अनेक प्रकारचे लिपिड्स म्हणजे चरबी असते. हे रक्ताद्वारे शोधले जाऊ शकते. मुख्यत: चरबीच्या स्वरूपात आपल्या शरीरात एकूण कोलेस्ट्रॉल, लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL), HDL म्हणजेच हाय-डेन्सिटी लिपिड (HDL), ट्रायग्लिसराइड्स आणि व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (VLDL) असतात. शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त कोलेस्ट्रॉलचे सेवन करतो, तेव्हा कोलेस्ट्रॉल हृदयाच्या सभोवताली असलेल्या धमन्यांच्यामध्ये जमा होण्याचे प्रमाण वाढते. यामुळे हृदय रोगाचा धोका वाढतो.
एकूण कोलेस्ट्रॉलमध्ये हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) किंवा चांगले कोलेस्ट्रॉल, लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि २० टक्के ट्रायग्लिसराइड्स मोजले जाते. जर तुम्ही एकूण कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणातून एचडीएल वजा केले तर तुम्हाला नॉन-एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी मिळेल.
लो-डेन्सिटी लिपोप्रोटी किंवा ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण पाहून जोखमीचे प्रमाण निश्चित करता येते. नॉन-एचडीएल कोलेस्ट्रॉल रक्ताच्या डेसिलिटरमध्ये मोजले जाते. प्रौढांमध्ये नॉन-एचडीएलचे प्रमाण १३० mg/dL पेक्षा कमी असावे. यापेक्षा जास्त संख्या हृदयासाठी धोकादायक ठरू शकते.
सी-रिअॅक्टिव प्रोटीन
CRP म्हणजेच सी-रिअॅक्टिव प्रोटीन. जे आपल्या शरीरात एक केमिकल फॅक्ट्रीप्रमाणे काम करते. शरीरास कोणताही बाह्य विषाणू किंवा संसर्ग झाल्यास बऱ्याच रासायनिक प्रक्रिया सुरू होतात. यापैकी एक म्हणजे इन्फ्लेमेशन किंवा सूज. यावेळी यकृतात सी-रिअॅक्टिव प्रोटीन (सीआरपी) निर्माण होते. हे एक ब्लड मार्कर आहे, जे शरीरात इन्फेक्शनची पातळी वाढवते.अशावेळी सी-रिॲक्टिव्ह प्रोटीन (HS-CRP) चाचणी केली जाते.
यात हृदयातील जळजळ आणि कोरोनरी धमन्यांच्या संभाव्य अरुंदतेबाबत अप्रत्यक्ष माहिती मिळते. ही चाचणी हृदयात जळजळ होण्याचे कारण दर्शवत नाही, पण ज्या लोकांना पुढील १० वर्षांत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता १० ते २० टक्के आहे, त्यांच्यासाठी योग्य अंदाज दर्शवते. सीआरपी पातळी जितकी जास्त असेल तितके इन्फेक्शन अधिक असते.
लिपोप्रोटीन
हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासाठी लिपोप्रोटीन चाचणी केली जाते. हाय लिपोप्रोटीनसाठी अद्याप कोणतेही औषध नाही. परंतु, जर त्याची पातळी ५० mg/dl पेक्षा जास्त असेल तर हृदयविकाराचा धोका जास्त असतो. हे सहसा हृदयविकारासंबंधित फॅमिली हिस्ट्री असलेल्यांमध्ये जास्त असल्याचे आढळून येते. यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये प्लेक तयार होते. अशा स्थितीत वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे. धूम्रपान टाळावे, निरोगी आहार खावा आणि नियमित शारीरिक हालचाली कराव्यात.
हिमोग्लोबिन
हिमोग्लोबिनची सामान्य पातळी पुरुषांसाठी १३.५ g/dL ते १८ g/dL, महिलांसाठी १२ g/dL ते १५ g/dL आणि मुलांसाठी ११ g/dL ते १६ g/dL आहे. यात सामान् चढ-उतार ठीक आहेत, परंतु जर हिमोग्लोबिनची पातळी कमी झाली, तर निरोगी अभिसरणासाठी आवश्यक असलेल्या रक्ताच्या प्रमाणावर परिणाम होतो. जर ते खूप कमी असेल तर ‘अँजायना’ होण्याचा धोका असतो.
लिव्हर एंझाइम टेस्ट
या टेस्टमध्ये एन्झाइमची उच्च पातळी, तसेच यकृत आणि हृदयाच्या धमन्यांमध्ये जमा झालेल्या चरबीचे प्रमाण दर्शवते. लिव्हर एंझाइम टेस्ट ही ALT आणि AST म्हणून ओळखली जाते, जी प्रति लिटर युनिटमध्ये मोजली जाते. ALT साठी एक मानक श्रेणी पुरुषांसाठी २९-३३ आणि महिलांसाठी १९-२५ आहे. तर AST पातळी ३५ पेक्षा कमी असणे गरजेचे असे.
क्रिएटिनिन टेस्ट
ही चाचणी रक्त आणि मूत्रातील क्रिएटिनिन पातळी मोजते. रक्तातील क्रिएटिनिनच्या पातळीत झालेले कोणतेही बदल मूत्रपिंडांशी संबंधित असतात, कारण मूत्रपिंड आपल्या रक्तातील क्रिएटिनिन फिल्टर करते आणि मूत्रमार्गे शरीराबाहेर पाठवते. लघवीतील क्रिएटिनिन कमी झाल्यास मूत्रपिंडासंबंधित समस्या जाणवतात. जर रक्त आणि लघवीतील क्रिएटिनिनचे प्रमाण सामान्य नसेल, तर ते मूत्रपिंडाच्या आजाराचे लक्षण असू शकतात. अशाने क्रॉनिक किडनी डिसीज (CKD)चाही धोका असतो. या स्थितीत रुग्णाला मूत्रपिंडापर्यंत रक्त पोहचण्यासाठी हृदयाला अधिक पंप करावे लागते. यामुळे हृदयावर जास्त दबाव येतो आणि रक्तदाबही (BP) वाढतो. जर सुरुवातीलाच याची लक्षणे समजली तर योग्य उपचार करता येतात. याचे पुरुषांमधील सामान्य प्रमाण 0.7 ते 1.3 mg/dL (61.9 ते 114.9 μmol/L आणि महिलांमधील 0.6 ते 1.1 mg/dL (53 ते 97.2 μmol/L इतके आहे. महिलांमध्ये पुरुषांपेक्षा कमी स्नायूंचे प्रमाण असते म्हणून स्त्रियांमध्ये क्रिएटिनिनची लेव्हल कमी असते.