अनेक प्रौढांसाठी, खास करून जे नवीन पालक झाले आहेत, चांगली झोप घेणे हे सर्वात मोठे आव्हान ठरते. काम, कुटुंब आणि वैयक्तिक वेळ यांच्यात संतुलन राखताना पुरेशी झोप मिळत नाही. पण, अभिनेत्री आलिया भट्टसाठी झोप ही एकमेव गोष्ट आहे, ज्याबाबत ती तडजोड करत नाही.
अमॅझॉन प्राइम व्हिडीओवरील ‘टू मच’ या टॉक शोमध्ये, होस्ट काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्याबरोबर नुकताच आलियाने संवाद साधला. आई झाल्यानंतर आलियाने अनुभवलेल्या जीवनशैलीतील बदलांबद्दल यावेळी खुलासा केला. आलियाची मुलगी राहा जवळपास तीन वर्षांची झाली आहे. दरम्यान, बाळ झाल्यानंतर बदलणाऱ्या झोपेच्या सवयींबद्दल बोलताना आलियाने सांगितले की, “जेव्हा तुम्ही बाळाला जन्म देता, त्यानंतर तुमच्या शरीराचे झोपण्याचे अन् उठण्याचे घड्याळ बदलते. तुम्हाला उठायचे नसेल तरी तुम्हाला उठावे लागते.”
पालक म्हणून येणाऱ्या आव्हानांबाबत आलियाने सांगितले की, ती नेहमीच ‘लवकर झोपणारी, लवकर उठणारी व्यक्ती आहे. “मला झोप खूप आवडते. कधी कधी मी रात्री ९:३० वाजता झोपते आणि मला झोपलेले तास मोजताना खूप आनंद होतो,” असे तिने सांगितले. पुढे ती म्हणाली, तिचा पती म्हणजेच अभिनेता रणबीर कपूरसुद्धा याच सवयी पाळतो. “रणबीर आणि माझे झोपेचे वेळापत्रक एकसारखेच आहे, तो माझ्यापेक्षा कदाचित ३० मिनिट उशिरा झोपतो, पण तरीही तो लवकर उठतो.”
बाळ झाल्यानंतर पालकांच्या झोपेवर होणारा परिणाम
पीएसआरआय हॉस्पिटलच्या मानसशास्त्रज्ञ आणि सल्लागार अर्पिता कोहली द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगतात, “बाळ झाल्यानंतर पालकांच्या झोपेच्या चक्रामध्ये मोठे बदल होतात, खास करून बाळ जन्मल्याच्या सुरुवातीच्या महिन्यांत. बाळाचे रात्रीचे जेवण, डायपर बदलणे आणि बाळाच्या अनियमित झोपेच्या वेळा, यामुळे नवीन पालकांच्या झोपेचे वेळापत्रक कोलमडते. या सततच्या झोपेच्या कमतरतेमुळे थकवा, चिडचिड आणि दिवसभरात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते.”
कोहली सांगतात की, पालकांनी शक्य तितक्या वेळेस झोपेला प्राधान्य द्यावे. बाळ झोपताना थोड्या वेळेस झोप घेणे, रात्रीच्या जबाबदाऱ्यांचे विभागून घेणे आणि नियमित झोपेची सवय राखणे हे शरीराला बदल करण्यास मदत करू शकते. संध्याकाळी कॅफिन टाळणे, खोली अंधारी आणि शांत ठेवणे आणि झोपेच्या आधी आरामदायक तंत्रे वापरणे ही झोपेची गुणवत्ता वाढवू शकतात. हळूहळू बाळाच्या झोपेचे वेळापत्रक ठरल्यानंतर पालकांचे झोपेचे वेळापत्रकही सुसंगत होऊ लागते.
लवकर झोपण्याचे मानसिक आणि शारीरिक फायदे
कोहली सांगतात की, लवकर झोपणे शरीराला नैसर्गिक सर्केडियन रिदमशी (झोपेच्या चक्राशी) जुळवून घेण्यास मदत करते, ज्यामुळे हार्मोन्सचे संतुलन, पचन आणि मानसिक कार्यक्षमता सुधारते. लवकर झोपणारे लोक गाढ झोप अनुभवतात आणि ज्यात शरीर आणि मेंदू संपूर्णपणे आराम करतात आणि पुन्हा ऊर्जा मिळवतात, ज्यामुळे मूड स्थिर राहतो, ऊर्जा पातळी वाढते आणि दिवसात लक्ष केंद्रित करणे सोपे होते.
“मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून लवकर झोपणे आणि ताजेतवाने होऊन उठल्यास तणाव, चिंता आणि चिडचिड कमी होऊ शकते. यामुळे भावनिक नियंत्रण आणि कार्य करण्याची क्षमता सुधारणे शक्य होते, कारण मेंदू पूर्ण रात्रीच्या विश्रांतीनंतर सर्वोत्तम कार्य करतो. नियमितपणे लवकर झोपल्यास दीर्घकालीन आरोग्याच्या समस्यांचा धोका, जसे की लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि नैराश्य कमी होते,” असेही कोहली सांगतात.
जोडप्यांसाठी एकाच वेळी झोपण्याच्या सवयीचे महत्त्व
एकाच वेळी झोपण्याची सवय जोडप्यांसाठी खूप फायदेशीर ठरते, असे कोहली सांगतात. जेव्हा दोघे जवळजवळ एकाच वेळी झोपतात, तेव्हा भावनिक जवळीक वाढते, एकत्र आराम करण्याचा वेळ मिळतो आणि नातेसंबंध मजबूत होतात.
वेगळ्या झोपेच्या सवयी असतील तर काय करावे?
जर जोडप्यांचे झोपण्याचे वेळापत्रक किंवा सवयी खूप वेगळ्या असतील, तर त्यातून झोपेत अडथळा, चिडचिड किंवा भावनिक अंतर निर्माण होऊ शकते. अशावेळी जोडप्यांनी थोडा समतोल साधावा — उदाहरणार्थ, झोपण्यापूर्वी एकत्र शांत वेळ घालवणे किंवा स्वतंत्रपणे शांत क्रियाकलाप (अॅक्टिव्हिटी) करणे, ज्यामुळे दोघांनाही आराम मिळतो. एकमेकांना समजून घेणे आणि छोटे बदल दोघांनाही चांगली झोप आणि नातेसंबंध टिकवण्यासाठी मदत करतात.