Covid 19 : भारतात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. करोनाच्या XBB1.16 या व्हेरियंटमध्ये अचानक झालेल्या वाढीमुळे ही रुग्णसंख्या वाढतेय. हा व्हेरियंट ओमिक्रॉनचा नवा सब व्हेरियंट असून जो वेगवेगळ्या देशांमध्ये आढळला आहे. भारतात तर हजारो लोकांना याचा संसर्ग झाला असून करोना रुग्णसंख्या वाढण्यामागेही XBB1.16 हा व्हेरियंट कारणीभूत आहे. या व्हेरियंटबाबत चिंताजनक बाब म्हणजे, नव्या लक्षणांसह तो आरोग्यावर परिणाम करत आहे. शिवाय लहान मुलं आणि वयस्कर लोक XBB1.16 ची शिकार होत आहेत. त्यामुळे लहान मुलं आणि वयस्कर नागरिकांचे आरोग्य पुन्हा एकदा धोक्यात आले आहे. पण XBB1.16 या व्हेरियंटची लहान मुलांमध्ये दिसणारी नवी लक्षणे कोणती? जाणून घेऊ…

लहान मुलांमध्ये दिसतात ‘ही’ लक्षणे

लहान मुलांमध्ये तीव्र ताप, सर्दी, खोकला, ऩॉन प्युरुलेट डायरिया ही मुख्य लक्षणे दिसतात. तसेच खाज येणे, डोळे चिकट होणे ही नवीन लक्षणे दिसत आहेत.

वयस्कर लोकांमध्ये दिसणारी लक्षणे

गुरुग्राममधील सीके बिडला हॉस्पिटलचे क्रिटिकल केअर अँड पल्मोनोलॉजीचे प्रमुख डॉ. कुलदीप ग्रोवर यांनी म्हटले की, या नव्या व्हेरियंटची लक्षणे ही अधिकतर लो ग्रेड फ्लूप्रमाणे असतात. ही लक्षणे श्वसनमार्गाच्या वरच्या आणि खालच्या बाजूला दिसून येतात. श्वसन मार्गाच्या वरच्या बाजूस दिसणाऱ्या लक्षणांच्या बाबतीत, लोकांना नाकातून स्त्राव होणे, घसा खवखवणे, हळूहळू वाढणारा ताप, जो १ तो २ दिवस राहतो, शिवाय वास न येणे ही लक्षणे आढळतात. ही लक्षणे दिसल्यास कोविडची चाचणी घेण्याची शिफारस केली जाते. श्वसनमार्गाच्या खालच्या बाजूस दिसणाऱ्या लक्षणांमध्ये लोकांना तीव्र ब्राँकायटिस आणि खोकला होऊ शकतो.

हा व्हेरियंट वेगळा का आहे?

हा व्हेरियंट इतर व्हेरियंटपेक्षा वेगळा आहे कारण तो इतर व्हेरियंटपेक्षा वेगाने पसरतो. परंतु या व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचा दर कमी आहेत, त्यामुळे घरीच्या घरीच याचे व्यवस्थापन करता येते. अलीकडच्या काळात, ज्या लोकांनी लस घेतली आहे, त्यांना शेवटच्या कोविड लाटेच्या दरम्यान संसर्गास सामोरे जावे लागले आहे अशा लोकांमध्ये व्हायरसविरूद्ध मजबूत प्रतिकारशक्ती विकसित होत आहे, ज्याला हायब्रिड इम्युनिटी असे म्हणतात.

हायब्रिड इम्युनिटी म्हणजे काय?

डॉ. ग्रोव्हर यांच्या मते, हायब्रिड इम्युनिटीमध्ये शरीरात अँटीबॉडीज विकसित होतात ज्या व्हायरसच्या म्यूटेशनशी लढण्यास मदत करतात. यामुळे करोनाचे रुग्ण वाढत असतानाही हायब्रिड इम्युनिटीमुळे मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. करोनाचे नवे व्हेरियंट आणि इन्फ्लूएंझाच्या वाढीमुळे करोनासंबंधीत नियमांचे पालन करण्याची शिफारस केली जाते. कोणत्याही व्हेरियंटचा प्रसार रोखण्यासाठी लोकांनी हात धुवावे, मास्क घालावा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावेत. खोकला आणि सर्दी यांसारखी लक्षणे असल्यास लोकांच्या थेट संपर्कात येणे टाळावे जेणेकरून संसर्ग निरोगी व्यक्तींना होणार नाही.

नवा व्हेरियंट गंभीर आजाराचे कारण बनू शकतो का?

करोनाचा हा नवा सब व्हेरियंट काही महिन्यांपासून वेगाने पसरत आहे.यावर WHO च्या अधिकारी मारिया व्हॅन केरखोव्हच्या म्हणण्यानुसार, यामुळे अधिक गंभीर आजार झाल्याचे दिसत नाही. पण आपल्याला सावध राहण्याची गरज आहे.