Cucumber Benefits For Health : विविध आजारांची वाढती तीव्रता पाहता रोगप्रतिकारशक्ती वाढवणे महत्त्वाचे आहे. त्यात बैठी जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या सवयी यांमुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. या आजारांचा सामना करण्यासाठी अनेक जण नैसर्गिक उपाय शोधत आहेत. पण, शरीरातील अतिरिक्त चरबी आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांविरोधात लढण्यासाठी काकडी एक उत्तम उपाय असल्याचे म्हटले जाते. या सुपर फूडमध्ये असंख्य आरोग्य फायदे आहेत; जे निरोगी जीवनशैली प्राप्त करण्यास मदत करू शकतात. अपोलो रुग्णालयाच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला काकडीच्या फायद्यांसंदर्भात माहिती दिली आहे.

कमी कॅलरीज असलेले सुपर फूड

काकडी बऱ्याचदा फक्त सॅलडमध्ये खाल्ली जाते. त्यामध्ये वजन कमी करण्यास आणि संपूर्ण आरोग्यास चालना देण्यासाठी पुरेसे घटक आहेत. मुख्यतः काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त (सुमारे ९६ टक्के) आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने वजन कमी करण्यासाठी ती फायदेशीर ठरते. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात काकडीचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. कारण- यातील पाण्याचे प्रमाण शरीर हायड्रेशन ठेवण्यास मदत करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. त्यामुळे चयापचय क्रिया सुधारते.

याशिवाय काकडीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते; जे पचनास मदत करते आणि तृप्तीची भावना वाढवते. काकडीच्या सेवनामुळे भूक कमी लागते. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाणही रोखले जाते. वजन कमी करण्यासाठी काकडी हा एक उत्तम पर्याय आहे. काकडीत व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते; जे शरीरातील पोषक तत्त्वे वाढवण्यासह कॅलरीचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात.

काकडी खाण्याचे फायदे

१) काकडीत चरबी घटवण्यासह भरपूर पौष्टिक गुणधर्म आहेत. त्यामुळे ते निरोगी जीवनशैलीचा एक महत्त्वाचा घटक बनतात.

२) आरोग्यासाठी योग्य हायड्रेशन महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरातील रोजची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी काकडी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यात नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन गुणधर्म ही आहेत; ज्यामुळे शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.

३) काकडीत दाहकविरोधी गुणधर्म असतात आणि त्यात पोटॅशियम व मॅग्नेशियम यांसारखी संयुगे असतात; जी निरोगी रक्तदाब पातळी राखण्यासाठी फायदेशीर असतात. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या रोगांचा धोका ती कमी करतात. फायबर कोलेस्ट्रॉलचे व्यवस्थापन करते. बऱ्याच अभ्यासांमध्ये काकडी आणि रक्तदाब यांच्यात संबंध आढळला आहे. कारण- काकडी रक्तवाहिन्यांची रुंदी (व्हॅसोडिलेशन) वाढवते. २०१७ च्या इंडोनेशियन अभ्यासात, उच्च रक्तदाब असलेल्या २० वृद्ध व्यक्तींनी १२ दिवस काकडीचा रस प्यायल्याने त्यांच्या रक्तदाबाच्या पातळीत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले.

४) काकडीत आढळणारे सिलिका द्रव्य कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते; ज्यामुळे त्वचा निरोगी आणि तेजस्वी होते. काकडीच्या सेवनामुळे डोळ्यांभोवतालचा फुगीरपणा आणि काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.

५) काकडीमधील व्हिटॅमिन के हे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते; शिवाय फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करते.

६) काकडीत ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो; ज्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी किंवा रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी ती योग्य मानली जाते. एक कप काकडीत कॅलरीजचे प्रमाण १६ टक्के असते. काकडीमधील क्युकरबिटासिन्स इन्सुलिनचे उत्पादन आणि यकृतातील ग्लायकोजेनचे चयापचय नियंत्रित करण्यास मदत करतात.

७) काकडी ही फायटोन्यूट्रिएंट्सचे चांगला स्रोत आहे. त्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स, लिग्नॅन्स व ट्रायटरपेन्स आहेत; ज्यात अँटिऑक्सिडंट्स, दाहकविरोधी तत्त्व आणि कर्करोगविरोधी फायदे आहेत. ‘सायंटिफिक वर्ल्ड जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या २०१० च्या संशोधनानुसार काकडीमधील क्युकरबिटासिन्स कर्करोगाच्या पेशींचा प्रसार आणि जगण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या

काकडी कशी खावी?

१) फायबरचे प्रमाण राखण्यासाठी काकडी न सोलता चांगली धुवून खावी. काकडीच्या साल आणि बियांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. एका पाकिस्तानी अभ्यासात असे आढळून आले आहे की, काकडीच्या बिया खनिजे, विशेषतः कॅल्शियमचा चांगला स्रोत आहेत.

२) भूक कमी करण्यासाठी काकडी उपयुक्त मानली जाते.

३) सॅलड, स्मूदी व कोल्ड सूपमध्ये काकडीचा वापर करा.

४) तुम्ही प्रोटीन, कार्बोहायड्रेट्ससारख्या इतर मॅक्रो पोषक घटकांसह काकडीचे सहज सेवन करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुपर फूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काकडीचा आहारात समावेश करा. तसेच निरोगी आणि आनंदी जीवनशैलीच्या दिशेने वाटचाल करा.