Packed Juice Benefits And Disadvantages : ज्यूस पिणे आरोग्यदायी असते, असे अनेकदा आपण ऐकलेच असेल. त्यामुळे अनेकदा आपण घरीच फळांचे ज्यूस बनवतो. कारण- बाहेरून पॅकिंग असणारे ज्यूस पिणे आपल्याला धोकादायक वाटते. पण, कदाचित पुढची ओळ वाचून तुम्हाला धक्का बसेल. कारण- मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यांनी अलीकडेच रणवीर इलाहाबादिया यांच्या पॉडकास्टवर सांगितले की, की ज्यूस आणि सॉफ्ट ड्रिंक्समध्ये कोणताही फरक नसतो. दोन्हीमध्ये साखरेचे प्रमाण जास्तच असते. घरगुती असो किंवा पॅकिंग ज्यूस पिणे हे मुळात साखरेचे थेट सेवन करण्यासारखे आहे.

ज्यूस आणि सॉफ्ट ड्रिंक्स दोन्हीही एकसमान असतात. दोघांमध्येही १५ चमचे साखर असते. त्यामुळे जर कोणी तुमच्यासमोर १५ चमचे साखर ठेवली, तर ती तुम्ही खाल का? नाही ना; मग पुढच्या वेळी जेव्हा तुमच्यासमोर ज्यूस आणि सॉफ्ट ड्रिंक्स येतील तेव्हा तुम्ही डोक्यात ठेवा की, आता तुमच्या शरीरात १५ चमचे साखर जाणार आहे.

घरगुती आणि पॅकिंग असणाऱ्या ज्यूसमधील फरक स्पष्ट करताना डॉक्टर कुलकर्णी म्हणाले की, घरी बनवलेला ज्यूस कदाचित तुमच्या शरीराचे थोडे कमी नुकसान होईल. पण, पॅकेज केलेल्या ज्यूसमुळे १०० टक्के नुकसान होऊ शकते. पॅकेज ज्यूसची चव गोड करण्यासाठी त्यात साखर टाकलेली असते. पण, त्याचबरोबर त्यात प्रिझर्वेटिव्ह्ज (संरक्षक रसायनं)देखील घातलेली असतात. ही रसायने ज्यूस खराब होऊ नये म्हणून टाकली जातात;पण, शरीरासाठी ती अजिबात चांगली नसतात.

ज्यूसपेक्षा आणि सॉफ्ट ड्रिंक्स हानिकारक आहेत का हे स्पष्ट करण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली. बंगळुरू येथील एस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्सच्या सर्व्हिसेस प्रमुख एडविना डॉक्टर राज कुलकर्णी दाव्याशी पूर्णपणे सहमत नव्हत्या. त्यांच्या मते, या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही, असे देता येणार नाही.

सॉफ्ट ड्रिंक्समध्ये कोणतेही पोषण नसते. त्यातून कोणतीही जीवनसत्त्वे किंवा खनिजांशिवाय फक्त कॅलरीज मिळतात. दुसरीकडे फळांचा रस हा फळांपासून बनवला जातो आणि त्यात जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्ससह नैसर्गिक साखर असते. ही पोषक तत्त्वे आरोग्यासाठी चांगले असतात.

डॉक्टर राज कुलकर्णी यांनी ज्यूस कमी प्रमाणात पिण्याची शिफारस केली आहे. एक छोटा ग्लास ताजा, साखर न घातलेल्या ज्यूस किंवा अनस्ट्रेन्ड स्मूदी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. कारण- त्यात गर टिकून राहतो. त्यामुळे आपण त्याला आरोग्यदायी मानू शकतो. पण, त्यांचे असेही म्हणणे आहे की, फक्त तुम्ही फळ खाल्लं, तर पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं आणि त्यातून फायबर जास्त प्रमाणात मिळते. तसेच फळातील साखर हळूहळू शोषली जाते.

त्यामळे ज्यूस खरेदी करतानाही पॅक केलेले किंवा प्रिझर्वेटिव्ह्ज ज्यूस घेणे टाळा. तसेच जर प्यायचंच असेल, तर दिवसाला एक छोटा ग्लास ज्यूस पुरेसा आहे. त्याच्याबरोबर भरपूर पाणी प्या आणि शक्य असल्यास एक फळ खा. अशा प्रकारे तुम्हाला साखरेचा अतिरेक न होता फळांचे फायदे मिळतील.

घरगुती फळांच्या रसामुळे तुमच्या शरीराचे कमी नुकसान होते. पण, पॅकिंग रस नेहमीच तुमचे नुकसान करतील. त्यामुळे किती प्रमाणात साखरेचे सेवन केले त्याचा मागोवा घेणे आवश्यक आहे. कारण- कोणत्याही स्वरूपात १५ चमचे साखरेचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.