Firecrackers effect on health: देशभरात दिवाळी २०२५ मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. प्रकाशमयी आणि आनंदीदायी वातावरण असणाऱ्या या सणाची लहान मुले तसंच मोठेही वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. गोड पदार्थ आणि फटाक्यांचा आवाज याशिवाय दिवाळी अपूर्ण वाटत असली तरी, या सणात तुमच्या घरी आजारपण मात्र येऊ देऊ नका. आणि त्यासाठी काही मर्यादा आपणच आपल्या पाळल्या पाहिजेत. फटाक्यांच्या धुरामुळे केवळ पर्यावरणावरच नाही, तर आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. फटाक्यांमुळे हवेत धूळ आणि प्रदूषकांचे प्रमाण वाढते, त्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. फटाक्यांच्या धुरामुळे कोणते गंभीर परिणाम होऊ शकतात याबाबत जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते टाळता येईल.
फटाक्यांमध्ये धोकादायक रसायने
फटाक्यांच्या धुरामध्ये सल्फर, जस्त, तांबे आणि सोडियमसारखी अनेक धोकादायक रसायने असतात. ती हवेतून पसरतात आणि श्वासोच्छवासाद्वारे आपल्या फुप्फुसात प्रवेश करतात. ही रसायने पर्यावरणाला तसंच आपल्या आरोग्यालाही गंभीर नुकसान पोहोचवतात.
WHOचा अहवाल काय सांगतो?
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दरवर्षी जगभरात अंदाजे ७० लाख लोक वायू प्रदूषणामुळे मृत्यूमुखी पडतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या २०१८च्या अभ्यासानुसार, फटाक्यांचा हवेच्या गुणवत्तेवर भयंकर परिणाम होतो. याचा थेट परिणाम माणसाच्या फुप्फुसांवर आणि एकूणच आरोग्यावर होतो.
फटाक्यांमुळे होणारा त्रास
- श्वसन समस्या
फटाक्यांचा धूर फुप्फुसांसाठी धोकादायक असतो. दमा, ब्राँकायटिस आणि श्वास घेण्यास त्रास यासारख्या समस्या निर्माण करू शकतो. फटाक्याच्या धुरात असलेले पीएम२.५ चे सूक्ष्म कण आणि सल्फर डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइडसारखे विषारी वायू फुप्फुसांमध्ये खोलवर जाऊ शकतात, त्यामुळे जळजळ आणि इतर अनेक आरोग्यासंदर्भात तक्रारी उद्भवतात. - अॅलर्जी आणि त्वचेच्या समस्या
फटाक्याच्या धुरातील रसायनांमुळे त्वचेवर जळजळ, खाज सुटणे किंवा अॅलर्जी होऊ शकते. सोडियमसारख्या घटकांसह ही रसायने त्वचेवर जळजळ निर्माण करू शकतात. - हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी धोका
फटाक्यांमधला धूर आणि मोठा आवाज हृदयरोगांना गंभीर धोका निर्माण करू शकतो. कारण ते रक्तदाब आणि हृदय गती वाढवू शकतात. त्यामुळे ह्रदयविकाराचा धोका वाढतो. फटाक्यांचा धूर फुप्फुसांना नुकसान करतो आणि श्वास घेण्यात अडथळा निर्माण करतो, तसंच मोठा आवाज ह्रदयावर दबाव आणतो.
- डोळ्यांची जळजळ
फटाक्यांच्या धुरामुळे डोळ्यांना जळजळ, लालसरपणा आणि डोळ्यांतून पाणी येणे असे प्रकार होतात. फटाक्यांच्या धुरात अनेक हानिकारक रसायने असतात, त्यामुळे डोळ्यांमध्ये अॅलर्जी आणि जळजळ होऊ शकते. ही रसायने डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाला त्रास देतात. त्यामुळे खाज सुटते आणि किरकोळपणा जाणवतो. - कानाच्या पडद्याला नुकसान
मोठ्या आवाजाचे फटाके कानाच्या पडद्याला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे श्रवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. फटाके १५० डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करू शकतात. हा आवाज माणसाच्या कानासाठी सुरक्षित पातळीपेक्षा खूप जास्त आहे. या मोठ्या आवाजामुळे अचानक श्रवणशक्ती कमी होऊ शकते, कानात आवाज येऊ शकतो आणि कानाचा पडदा फाटू शकतो.
काय काळजी घ्यावी?
- फटाके वाजवताना मास्क आणि संरक्षक चष्मा वापरा
- लहान मुले आणि वृद्धांना धुरापासून दूर ठेवा
- सुरक्षित अंतरावरून फटाके वाजवा
- सण साजरा करण्यासाठी इको-फ्रेंडली फटाक्यांचा वापर करा