Winter Ear Care Tips : हिवाळा ऋतू अनेकांना आवडत असला तरी यादरम्यान अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अनेकांना यादरम्यान कान दुखण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. थंडगार हवेत आरामदायी झोप लागत असली तरी या हवेमुळे अनेकांना कानदुखीचा त्रास होतो. हिवाळ्यात अनेकदा सर्दीमुळे कानदुखीचा त्रास सुरू होतो. अशा स्थितीत दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलच्या ईएनटी विभागाच्या प्रमुख सल्लागार डॉ. दीप्ती सिन्हा यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना कानदुखीपासून आराम मिळवण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत.

डॉ. दीप्ती सिन्हा यांनी सांगितले की, हिवाळ्यात कानदुखीमागे अनेक कारणं असू शकतात. ज्यात थंड, कोरडी हवा, आर्द्रतेतील बदल, सायनस इन्फेक्शन आणि श्वसन संक्रमणाचा उच्च धोका अशा काही कारणांचा समावेश होतो.

कानात होणाऱ्या जळजळीमुळे अस्वस्थता वाढू लागते. यात थंड हवामान आणि वातावरणातील सततच्या बदलांमुळे कानात कोरडेपणा येतो. सायनुसायटिस आणि श्वासोच्छवासाच्या संसर्गामुळे कानदुखीचा त्रास होऊ लागतो. यात सर्दीमुळे नाकापासून कानापर्यंत जाणाऱ्या युस्टाचियन ट्यूबमध्ये खूप समस्या येतात, परिणामी कान दुखू लागतो.

कानदुखीची समस्या सामान्य असली तरीही सतत किंवा तीव्र कानदुखीकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. कारण हे अनेकदा कानाच्या संसर्गासारख्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते, असा इशारा डॉ. सिन्हा यांनी दिला.

तसेच कानदुखीचा त्रास कायम राहिल्यास योग्य निदान आणि उपचारांसाठी वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे, असेही डॉ. सिन्हा म्हणाल्या.

खोबरेल तेलात ‘या’ तीन गोष्टी मिसळून लावल्यास पांढरे केस होतील काळे! जाणून घ्या डॉक्टरांचे मत

हिवाळ्यात कानाच्या दुखण्यापासून आराम मिळवण्याचे ८ सोपे उपाय

१) इयरमफचा वापर करा : कान सुरक्षित आणि उबदार ठेवण्यासाठी इयरमफचा वापर करा. पण, ते पुरेसे इन्सुलेटेड आणि आरामात फिट बसणारे असले पाहिजे.

२) टोपी किंवा हेडबँड वापरा : कान उबदार ठेवण्यासाठी तुम्ही टोपी किंवा हेडबँड वापरू शकता. यामुळे थंडगार वाऱ्यापासून कानांचे संरक्षण करू शकता.

३) उबदार फॅब्रिक्स निवडा : लोकर किंवा लोकरसारखेच उबदार आणि इन्सुलेट कपड्यांचा वापर करा. यात लोकरीपासून बनवलेली टोपी आणि इयरमफची निवड करा.

४) कान कोरडे ठेवा : थंड हवामानात कान आतून ओले राहिल्यास कानदुखीचा धोका वाढतो. त्यामुळे थंड किंवा बर्फाळ हवामानात कान कोरडे ठेवण्यासाठी हुड किंवा छत्री वापरा.

५) हायड्रेटेड रहा : त्वचेच्या आरोग्यासह संपूर्ण आरोग्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

६) कान मॉइश्चरायझ करा : थंड हवामानामुळे कोरडेपणा आणि जळजळ टाळण्यासाठी कानाला हलके मॉइश्चरायझर लावा.

७) कान जास्त साफ करणे टाळा : कान आतून खूप स्वच्छ असल्यास त्यातील नैसर्गिक तेल कमी होऊ शकते आणि कोरडे होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे कान स्वच्छ करण्यासाठी कापूस किंवा कोणत्याही गोष्टींचा वापर करणे टाळा.

८) डॉक्टरांचा सल्ला घ्या : जर तुम्हाला तुमच्या कानात सतत वेदना जाणवत असतील किंवा अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. हिवाळ्यात जाणवणाऱ्या या समस्येवर ते चांगल्याप्रकारे उपाय सांगू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिवाळ्यात कानदुखीकडे दुर्लक्ष करणे त्रासदायक ठरू शकते, कारण काहीवेळा यामुळे श्रवणशक्ती कमी होते. त्यामुळे कानदुखीचा त्रास सुरू झाल्यास लवकरात लवकर डॉक्टरांकडे जा.