Kalabati Black Rice: शरीराला आवश्यक असलेले पोषण न मिळाल्याने शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटते, ज्यामुळे कुपोषणाचा सामना करावा लागतो. या कुपोषणाचा सामना करण्यासाठी कालाबाती नावाचा काळा तांदूळ फायदेशीर ठरू शकतो. आवश्यक पोषक तत्त्वे, व्हिटॅमिन्सयुक्त कालाबाती तांदूळ अतिशय पौष्टिक मानला जातो, जो लहान मुलांना कुपोषणापासून दूर ठेवण्यास मदत करतो. संबलपूर विद्यापीठाच्या फूड सायन्स टेक्नोलॉजी अँड न्युट्रिशन विभागातील पीएचडी स्कॉलर पायल शर्मा यांनी अलीकडेच केलेल्या एका संशोधनातून असे समोर आले की, कालाबाती काळा तांदूळ फायदेशीर आहे. त्यांनी संशोधन करताना उंदरांना पोषक मिश्रण खायला दिले आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसले.
संशोधनात वापरलेल्या एकत्रित न्युट्रिशन पदार्थांना ‘न्युट्री नेस्ट’ असे नाव देण्यात आले आणि कालाबाती काळा तांदूळ या ‘न्युट्री नेस्ट’चा प्रमुख घटक होता. त्यात शेंगदाणे, नाचणी, सोयाबीन, गूळ आणि दुधाच्या पावडरचासुद्धा समावेश होता. पायल शर्मा सांगतात, “निरीक्षणानंतर आम्हाला असे दिसून आले की, ‘न्युट्री नेस्ट’ देण्यात आलेले उंदीर इतर गटांतील उंदरांपेक्षा जास्त तंदुरुस्त आणि वजन वाढलेले दिसले. पण, आम्ही आतापर्यंत माणसांवर ही चाचणी केलेली नाही.”
डेक्कन क्रॉनिकलच्या मते, “शर्मा यांच्या एका वर्षाच्या अभ्यासातून असे उघड झाले आहे की, कालाबाती काळा तांदूळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यातील पौष्टिकतेमुळे आणि विशेषतः लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या कुपोषणाचा सामना करण्यासाठी हा तांदूळ अत्यंत महत्त्वाचा आहे.
ओडिशा टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, संशोधकांना आशा आहे की या तांदळाच्या शोधाचे पेटंट मिळेल आणि लवकरच बाजारात हा काळा तांदूळ उपलब्ध होईल.
कालाबती काळा तांदूळ इतर तांदळापेक्षा वेगळा कसा आहे आणि आपल्या दैनंदिन आहारात त्याचा समावेश केला जाऊ शकतो का?
द इंडियन एक्स्प्रेसनी आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा यांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे. कनिक्का मल्होत्रा सांगतात, “कालाबाती काळ्या तांदळाची रचना त्याला इतर तांदळापेक्षा वेगळे ठरवते, ज्यामुळे तो अधिक पौष्टिक असतो. या तांदळामध्ये असलेले चांगले अँटिऑक्सिडंट्स घटक त्याच्या गडद रंगाद्वारे दिसतात, जे अँथोसायनिन रंगद्रव्यांपासून (Pigments) निर्माण होतात. हे रंगद्रव्य पचनासाठी फायदेशीर असतात, साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात आणि दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात.”
संतुलित आणि निरोगी आहार घेण्याचा विचार करत असाल तर कालाबाती काळा तांदूळ हा एक उत्तम पर्याय आहे, कारण त्यात फायबर, अँटिऑक्सिडंट्स याशिवाय लोह, प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन बीसारख्या प्रमुख मिनरल्सचा चांगला स्त्रोत आहे, असे मल्होत्रा सांगतात.
या तांदळाची पौष्टिकता फायटोकेमिकल्सनी आणखी वाढवली आहे, ज्यामुळे छातीत जळजळ कमी होणे, हृदयाचे आरोग्य चांगले राहणे, इत्यादी फायदा दिसून येतो.
मल्होत्रा पुढे सांगतात, “सर्व गोष्टींचा विचार केला तर कालाबाती काळा तांदूळ हा अतिशय पौष्टिक आहे, ज्यामध्ये अँटिऑक्टिडंट्स, फायबर, महत्त्वाचे पोषक तत्त्वे आणि फायटोकेमिकल्सचे विशेष मिश्रण आहे, ज्यामुळे ते एक उत्तम धान्य म्हणून ओळखले जाते.
कालाबाती काळ्या तांदळाचा रोजच्या आहारात कसा समावेश करावा? आणि सर्व वयोगटातील लोकांसाठी हा तांदूळ कसा योग्य आहे?
मल्होत्रा सांगतात, कालाबाती काळ्या तांदळाचे जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी रोजच्या आहारात तुम्ही याचा समावेश करू शकता.
त्यांनी काही खालील टिप्स सांगितल्या आहेत.
मुख्य आहार : तुमच्या आवडत्या पदार्थांसह पांढऱ्या तांदळाऐवजी कालाबाती काळ्या तांदळाचा समावेश करा.
सॅलेडमध्ये समावेश करा : पोषण आणि चव वाढविण्यासाठी शिजवलेला कालाबाती काळ्या भातामध्ये सॅलेडचा समावेश करा.
नाश्ता : निरोगी आणि पोटभर नाश्त्यासाठी कालाबाती भातामध्ये ताजी फळे, काजू किंवा मध टाकून खाऊ शकता.
सूप आणि स्टूम : पौष्टिक आहारासाठी सूप आणि स्टूममध्ये कालाबाती काळा भात टाका.
स्नॅक : शेंगा, भाज्या किंवा चवदार सॉससह कालाबाती भात स्वादिष्ट वाटतो.
मल्होत्रा सांगतात, “कालाबाती भात हा सर्व वयोगटासाठी चांगला आहे. ज्यामध्ये मुल, प्रौढ आणि वृद्धांचा समावेश आहे. पण, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की लहान मुलांना कमीत कमी सहा महिन्यांचे होईपर्यंत नवीन पदार्थांचे सेवन करू देऊ नये.”