कर्करोग हा जगातील सर्वांत प्राणघातक आजारांपैकी एक आहे. बदलती जीवनशैली, अयोग्य खाण्याच्या सवयी, ताणतणाव इत्यादी यासाठी जबाबदार आहेत. मात्र, जर आपण वेळीच काही गोष्टींकडे लक्ष दिले आणि आपली जीवनशैली बदलली, तर कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. असे म्हटले जाते की, लहान सवयी मोठ्या आजारांना रोखण्यास मदत करू शकतात. त्याचप्रमाणे कर्करोगासारख्या प्राणघातक आजारापासून बचाव करण्यासाठी लहान सवयींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

अलीकडेच “चला कॅन्सरला पळवूया” म्हणत सेलिब्रिटी मॅक्रोबायोटिक कोच डॉ. शिल्पा अरोरा इन्स्टाग्रामवर ‘कॅन्सर-फायटिंग शॉट’ कसा बनवायचा हे दाखवले. कच्ची हळद, आवळा, लसूण आणि आले, काळी मिरी व एक कप पाण्याचे सेवन कर्करोगापासून आपला बचाव करते, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, हे शक्य आहे का, या संदर्भात बंगळुरू येथील एस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या मेडिकल ऑन्कोलॉजी व हेमॅटो ऑन्कोलॉजीच्या सल्लागार डॉ. वैष्णवी जोशी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. डॉक्टरांनी सांगितले की, हळद, आले, लिंबू, लसूण, बीट किंवा ग्रीन टीच्या अर्कांपासून बनवलेल्या या पेयामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे हे घटक व दाहकविरोधी संयुगे समृद्ध असतात. जरी ते एकूण आरोग्याला फायदेशीर असले तरी हे एकच पेय कर्करोग बरा करू शकते किंवा थेट लढू शकते याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. कर्करोगाच्या उपचारांसाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन किंवा लक्ष्यित थेरपीसारख्या वैद्यकीय काळजीची आवश्यकता असते.

कर्करोग बरा करू शकत नाही मात्र कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो

मात्र एकत्रितपणे, हे रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास, पचनास समर्थन देण्यास व ऊर्जेची पातळी वाढविण्यास मदत करू शकतात. हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासदेखील मदत करू शकतात, जो कर्करोगासह अनेक जुनाट आजारांशी संबंधित आहे; परंतु तो वैद्यकीय उपचारांना पर्याय नाही.

इन्स्टाग्राम रीलमध्ये दाखवलेल्या या विशिष्ट मिश्रणाचे आरोग्यदायी फायदे सहसा त्यातील पोषक तत्त्वांमुळे येतात. “उदाहरणार्थ- हळदीमध्ये कर्क्युमिन असते, जे जळजळ कमी करू शकते, आले मळमळ कमी करू शकते, लिंबू व्हिटॅमिन सी प्रदान करते व बीटरूट रक्तप्रवाहात सुधारणा करू शकते,” असे डॉ. जोशी म्हणाले.

तुम्ही तुमच्या आहारात हे पेय किती वेळा समाविष्ट करू शकता?

डॉ. जोशी म्हणाले की, तुम्ही सकाळी आणि जेवणापूर्वी हे पेय तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. नैसर्गिक घटकांचा वापर करून घरी ताजे पेय तयार करणे चांगले; मात्र खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. डॉ. जोशी यांनी निदर्शनास आणून दिले की, जास्त हळदीमुळे पोट बिघडू शकते. जास्त आल्यामुळे आम्लपित्त किंवा छातीत जळजळ होऊ शकते आणि लिंबू संवेदनशील दातांना त्रास देऊ शकते. “दीर्घ आजार असलेल्या किंवा कर्करोगावर उपचार घेत असलेल्या लोकांनी अशी पेये घेण्यापूर्वी नेहमीच त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.”

आपल्या आहारातील निवडी शरीरातील हार्मोन्सच्या पातळीवर परिणाम करू शकतात. उदाहरणार्थ- प्रक्रिया केलेले अन्न व साखरेचे जास्त सेवन केल्याने इन्सुलिन प्रतिरोधकता निर्माण होऊ शकते आणि इन्सुलिनसारख्या वाढीच्या घटकाची (IGF) पातळी वाढू शकते, जी काही विशिष्ट कर्करोगांशी संबंधित आहे. कर्करोग रोखण्यासाठी आहार हा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण- तो आपल्या आरोग्याच्या विविध पैलूंवर लक्षणीय परिणाम करतो, ज्यामध्ये कर्करोग होण्याचा धोकादेखील समाविष्ट आहे. संतुलित आणि पोषक तत्त्वांनी समृद्ध आहार घेतल्याने केवळ एकूणच आरोग्यालाच मदत होत नाही, तर कर्करोगाची शक्यता कमी करण्यातदेखील महत्त्वाची भूमिका बजावली जाते.