Black Raisins To Strenghthen Bones: सुकामेवा हा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. असं असलं तरी काही पदार्थ तुमची हाडे आतून मजबूत करू शकतात हेही खरं आहे. असाच एक पदार्थ म्हणजे काळे मनुके. हे दिसतात तर एवढेसे पण यांचे फायदे आभाळाएवढे आहेत. काळे मनुके एक गोड आणि पोषक तत्वांनी समृद्ध सुपरफूड आहे. यामध्ये असलेले कॅल्शियम, बोरॉन, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स तुमची हाडे मजबूत करण्यास, सांध्यांची लवचिकता राखण्यास आणि तुमचे शरीर उतार वयात सक्रिय ठेवण्यास मदत करतात.
पुढच्या जेव्हा पण तुम्हाला गोड पदार्थाची इच्छा असेल तेव्हा मूठभर काळे मनुके खा. त्याची चव चांगली तर असतेच शिवाय तुमची हाडे निरोगी आणि मजबूत राहतात. तर मग एवढ्याशा मनुक्यांनी तुमच्या हाडांची मजबूती कशी राखली जाते याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
हाडांचे आरोग्य का महत्त्वाचे आहे?
आपली हाडे केवळ आपल्या शरीरालाच आधार देत नाहीत, तर आपल्या अवयवांचे संरक्षणदेखील करतात. ती कॅल्शियमसारखी आवश्यक खनिजे साठवतात आणि आणि शरीराला हालचाल करण्याची शक्ती देतात. असं असताना वयानुसार त्यातही वयाच्या तिशीनंतर हाडांची ताकद कमी होऊ लागते. रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये ही समस्या वाढते, कारण कॅल्शियमची पातळी कमी होते. म्हणून तुमच्या आहारात असे पदार्थ समाविष्ट करणे गरजेचे आहे, जे तुमची हाडे आतून मजबूत करतात आणि काळे मनुके यासाठी सर्वोत्तम उपाय आहेत.
काळे मनुके हाडांसाठी का फायदेशीर?
काळे मनुके हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. त्यात आढळणारे बोरॉन नावाचे खनिज हाडांच्या वाढीस आणि देखभालीत महत्त्वाची भूमिका बजावते. एक छोट्या मूठभर म्हणजे सुमारे ३० ग्रॅम काळ्या मनुक्यांमध्ये कॅल्शियम, बोरॉन, पोटॅशियम, मॅग्नेशियमस लोह, तांबे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे पोषक घटक काळ्या मनुक्यांना हाडे आणि सांध्यासाठीचा रामबाण उपाय ठरवतात.
काळ्या मनुक्यांमध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करते आणि त्यांना कमकुवत होण्यापासून रोखते. बोरॉन शरीराला कॅल्शियम चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत करते, त्यामुळे हाडांची घनता टिकते. पोटॅशियम शरीरातील आम्लता कमी करते, कारण जास्त आम्लता हाडांमधून कॅल्शियम बाहेर काढू शकते. मॅग्नेशियम कॅल्शियमसोबत काम करून हाडांची रचना मजबूत करते. शिवाय लोह आणि तांबे कोलॅजन तयार करण्यास मदत करतात. प्रथिने सांधे लवचिक आणि निरोगी ठेवतात. काळ्या मनुक्यांमधील अँटीऑक्सिडंट्स हाडांना जळजळ आणि नुकसानापासून वाचवतात, त्यामुळे ते जास्त काळ मजबूत आणि सक्रिय राहतात.
काळ्या मनुक्याचे फायदे
- काळ्या मनुक्यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. ते हाडांची ताकद राखते आणि वयानुसार त्यांना कमकुवत होण्यापासून रोखते.
- बोरॉन नावाचे खनिज शरीराला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम योग्यरित्या शोषण्यास मदत करते आणि हाडांचे क्षय रोखते.
- काळ्या मनुक्यामध्ये असलेले तांबे आणि लोह कोलॅजन तयार करतात, त्यामुळे हाडे लवचिक राहतात आणि सांधेदुखी कमी होते.
- काळ्या मनुक्यात असलेले रेझवेराट्रोल आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे अँटीऑक्सिडंट्स हाडांना जळजळ आणि तणावापासून वाचवतात.
- पोटॅशियम आणि मग्नेशियम शरीराच्या पीएच पातळीला संतुलित करतात आणि कॅल्शियमचे नुकसान टाळतात. त्यामुळे हाडे मजबूत राहतात.
- लहान मुलांना खोकला झाला असल्यास लोखंडी तव्यावर ७ ते ८ काळे मनुके थोडेसे गरम करून रोज सकाळी खायला द्यावे. याने खोकल्याला आराम मिळतो.
काळ्या मनुक्याचे सेवन कसे करावे?
नाश्त्यामध्ये दररोज ८ ते १० काळे मनुके समाविष्ट करा
रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाणे अधिक फायदेशीर आहे
काळे मनुके ओट्स, दही, स्मूदी किंला सॅलडमध्ये देखील घालू शकता.
चव वाढवण्यासाठी आणि आरोग्यासाठी फायदे मिळवण्यासाठी मिष्टान्नांमध्ये साखरेऐवजी मनुक्यांचा वापर करा.
