Weight loss myths: वजन वाढणे ही एक सामान्य समस्या आहे. प्रत्येक व्यक्तीला वजन वाढण्याची चिंता असते. जास्त वजनामुळे मधुमेहापासून ते रक्तदाबापर्यंत अनेक गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. वाढते वजन आणि पोटाची ढेरी ही सध्याची सर्वांत मोठी समस्या बनली आहे. वाढलेलं वजन आणि पोटाची लटकणारी ढेरी तुमचे सौंदर्य तर बिघडवतेच. सोबतच आरोग्यासाठीही ते हानिकारक असते. वाढलेल्या वजनामुळे अनेक आजार होण्याचा धोका संभवतो. वाढलेलं वजन आणि पोटाची ढेरी कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. वजन कमी करण्यासाठी आपण डाएट व एक्सरसाइज करतो. तुम्हीही पोट कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहात; पण ते होत नाहीये का? तुम्ही डाएट आणि जिममध्ये व्यायामही करून पाहिले; पण अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत?… ‘वजन कमी करणे’ म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी प्रत्येकाला या पाच गोष्टी माहीत असायलाच हव्यात.

वजन कमी करण्याआधी जाणून घ्या या गोष्टी…

१. हे आपल्या जीवशास्त्राच्या विरुद्ध आहे

१९९० च्या दशकापासून इंग्लंडमध्ये लठ्ठपणाला राष्ट्रीय आरोग्यदृष्ट्या प्राधान्य देण्यात आले आहे. आणि त्यावर उपाय म्हणून अनेक धोरणे आखण्यात आली आहेत. तरीही लठ्ठपणाचे प्रमाण कमी झालेले नाही – फ्रान्समध्ये २०२० मध्ये अतिरिक्त वजनाचे प्रमाण (जास्त वजन आणि लठ्ठपणा दोन्हीसह) ४७.३% होते, ज्यामध्ये १७% लोक लठ्ठ होते.

वजन कमी करण्याच्या पद्धती प्रभावी असल्या तरी त्यांचे परिणाम बहुतेकदा टिकाऊ नसतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, बहुतेक लोक जे वजन कमी करतात, ते काही काळानंतर पुन्हा वाढते. याचं कारण असं की, जेव्हा आपण कमी प्रमाणात कॅलरी असलेल्या आहाराचे सेवन करण्याचे उद्दिष्ट ठेवून वजन कमी करतो, तेव्हा रेलिनसारखे हार्मोन्स भूक वाढवतात. ज्यामुळे आपल्याला अधिक खाण्याची इच्छा होते आणि कमी केलेले वजन पुन्हा वाढते.

२. हा इच्छाशक्तीचा प्रश्न नाही

शरीराचे वजन अनेक घटकांद्वारे निश्चित केले जाते. उदाहरणार्थ- आपण किती लवकर कॅलरी बर्न करतो, आपल्याला किती भूक लागते आणि खाल्ल्यानंतर आपल्याला किती पोट भरल्यासारखे वाटते यावर अवलंबून असते. काही लोकांना आनुवंशिकदृष्ट्या भूक लागण्याची आणि सारखे खाण्याची सवय असते, ज्यामुळे वजन कमी करणे आणखी कठीण होते. त्यासोबतच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपला आहार, व्यायाम व पुरेशी झोप हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.

३. फक्त कॅलरीजवर सर्व काही अवलंबून नसतं

कॅलरीज मोजणे ही वजन कमी करण्यासाठी वापरली जाणारी प्रसिद्ध पद्धत आहे. मात्र, आपण अन्न कसे शिजवतो, पचवतो यावर आपल्या आतड्यांतील जीवाणूंची रचना अवलंबून असते. त्यानुसार आपण किती ऊर्जा शोषतो हेदेखील बदलू शकते. ‘कॅलरीज ही एक कॅलरी असते’ असा एक कायमचा गैरसमजदेखील आहे; परंतु आपले शरीर सर्व कॅलरीजवर सारख्याच प्रकारे प्रक्रिया करीत नाही. आपली भूक, पचन आणि ऊर्जेची पातळी यांवर खूप वेगळे परिणाम होतात. या गैरसमजांमुळे प्रोटीन शेकचा आहार किंवा काही अन्न गट पूर्णपणे काढून टाकणाऱ्या आहाराचे फॅड निर्माण झाले आहे. मात्र, दीर्घकालीन बदलांवर लक्ष केंद्रित करणे हा अधिक वास्तववादी आणि संतुलित दृष्टिकोन आहे.

४. व्यायाम आरोग्यासाठी उत्तम; पण वजन घटवण्यासाठी अनावश्यक

जितका जास्त व्यायाम करू, तितके जास्त वजन कमी होईल, असा विश्वास बऱ्याच लोकांना वाटत असतो; परंतु विज्ञान आपल्याला दाखवते की, वास्तव अधिक गुंतागुंतीचे आहे. आपले शरीर ऊर्जा वाचवण्याच्या दृष्टीने खूप चांगला प्रतिसाद देत असते. तीव्र व्यायामानंतर आपण नकळतपणे दिवसभर कमी हालचाल करतो किंवा भूक लागू शकते आणि जास्त खाऊ शकतो, ज्यामुळे बर्न झालेल्या कॅलरीज पुन्हा वाढतात. खरं तर, संशोधनातून असे दिसून आले आहे की, वाढत्या शारीरिक हालचालींमुळे एकूण दैनंदिन ऊर्जेचा वापर वाढत नाही. त्याऐवजी शरीर अधिक कार्यक्षम होऊन आणि इतरत्र त्याचा ऊर्जेचा वापर कमी करते, ज्यामुळे केवळ व्यायामाद्वारे वजन कमी करणे शक्य होत नाही. असे असले तरी व्यायामाचे अजूनही अनेक फायदे आहेत : ते हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आरोग्य, मानसिक आरोग्य सुधारते, स्नायूंचे प्रमाण राखते, चयापचय मजबूत करते, हाडे मजबूत करते आणि दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करते.

५. आरोग्य सुधारणे म्हणजे नेहमीच वजन कमी करणे असे नाही

आरोग्यदायी राहण्यासाठी तुम्हाला वजन कमी करण्याची गरज नाही. योग्य जीवनशैली योग्य आहारानं निरोगी राहता येतं. अभ्यासातून असेही दिसून आले आहे की, चांगला आहार घेणे आणि अधिक हालचाल केल्याने कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, रक्तातील साखर व इन्सुलिन संवेदनशीलता यांसारखे आरोग्य निर्देशक लक्षणीयरीत्या सुधारू शकतात, जरी तुमचे वजन समान राहिले तरीही.