Thyroid cancer in younger women: थायरॉईड कर्करोग हा जगभरात सर्वात वेगाने वाढणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे. या कर्करोगाची लक्षणे बऱ्याचदा दिसून येत नाहीत, मात्र शांतपणे तो वाढत असतो. त्यांमुळे याबाबतची जागरूकता आणि लवकरात लवकर निदान महत्त्वाचे आहे. भारतात थायरॉईड कर्करोग तरूणींमध्ये वाढत असल्याचे समोर आले आहे. मानेतील गाठ, आवाजात कर्कशपणा किंवा गिळण्यास त्रास होणे यासारख्या साध्या लक्षणांकडेही दुर्लक्ष करू नये असे तज्ज्ञ सांगतात.

थायरॉईड कर्करोग ओळखण्यासाठी काही शारीरिक लक्षणे आहेत ज्यांच्याकडे लक्ष ठेवावे. तुमच्या मानेच्या पुढच्या आणि खालच्या भागात एक लहान, वेदनारहित गाठ किंवा सूज, सतत कर्कशपणा, गिळण्यास किंवा श्वास घेण्यास त्रास होणे आणि सतत घशात दुखणे. मानेतील दिसत असलेली सूज किंवा वाढलेले लिम्फ नोड्स नेहमीच ओळखता येऊ शकतात, असे हेड अँड नेक सर्जन डॉ. रेबेका गाओ यांनी सांगितले आहे.

सुरूवातीची लक्षणे

थायरॉईड कर्करोगाची काही सुरूवातीची लक्षणे आहेत, ज्यांच्याकडे लक्ष ठेवता येऊ शकते. मानेमध्ये वेदनारहित गाठी, सतत आवाजात बदल, गिळण्यास त्रास, कान किंवा जबड्यात पसरणारे मानदुखी आणि सुजलेल्या लिम्फ नोड्स ही काही सुरूवातीची लक्षणे आहेत.

“बहुतेक थायरॉईड गाठी या सौम्य असतात. मात्र, कोणत्याही कठीण किंवा वाढत्या गाठीसाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे. प्रत्येकासाठी तपासणीची शिफारस केली जात नाही, मात्र ज्यांना थायरॉईड कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास आहे किंवा डोके आणि मानेला पूर्वी रेडिएशनचा संपर्क आलेला आहे तसंच अनुवांशिक स्थिती आहे; त्यांनी जास्त सतर्क राहणे गरजेचे आहे”, असा सल्लाही त्यांनी दिला.

तरूणींमध्ये का वाढत आहे थायरॉईड कर्करोग?

जैविक आणि जीवनशैली घटक यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. इस्ट्रोजेनसह हार्मोनल घटकांमुळे प्रजनन काळात महिला अधिक असुरक्षित असतात. गर्भधारणेशी संबंधित थायरॉईड बदल नोड्यूलच्या वाढीला कारणीभूत ठरतात. अनुवांशिक स्थिती, आयोडीन असंतुलन आणि भूतकाळातील रेडिएशन एक्सपोजर हे घटकदेखील जबाबदार आहेत. यासाठी जागरूकता असणे महत्त्वाचे आहे.

जीवनशैली आणि पर्यावरणीय प्रभाव

थायरॉईड कर्करोगाचा धोका जीवनशैली, आहार आणि पर्यावरणीय घटकांच्या संयोजनामुळे प्रभावित होतो असं तज्ज्ञांचं मत आहे. अपुरी झोप, सततचा ताण आणि वाढलेले कॉर्टिसोल थायरॉईडच्या कार्यात व्यत्यय आणू शकते. त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते. वायू प्रदूषण, इमेजिंग चाचण्या कंवा एक्स-रेमधून होणारे रेडिएशन आणि रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशाचा संपर्कदेखील हार्मोनल संतुलन आणि थायरॉईड आरोग्यावर परिणाम करू शकतो. खराब आहार, व्यायामाचा अभाव आणि अति ताण असलेले व्यवसाय यासारखे घटक यासाठी कारणीभूत आहेत.

दुसरीकडे, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, कॅल्शियमयुक्त आहार, दुग्धजन्य पदार्थ, क्रूसिफेरस भाज्या आणि योग्य प्रमाणात आयोडीन सेवन यामुळे थायरॉईड आरोग्याचे रक्षण होण्यास मदत होऊ शकते. निरोगी सवयी आणि नियमित तपासणी केल्यास धोका लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. थायरॉईड कर्करोगाच्या रूग्णांचा दृष्टिकोन सहसा सकारात्मक असतो. कारण हा कर्करोग उपचार करण्यायोग्य कर्करोगांपैकी एक आहे. ९० टक्क्यांहून अधिक केसेस पॅपिलरी आणि फॉलिक्युलर थायरॉईड कर्करोगाची आहेत, याचे लवकर निदान झाल्यास जगण्याचा दर ९५ टक्क्यांपेक्षा जास्त असतो. उपचार हे शस्त्रक्रियेपासून सुरू होतात. तसंच पुनरावृत्तीचा धोका कमी करण्यासाठी रेडिओअॅक्टिव्ह आयोडीन थेरपीचा वापर केला जाऊ शकतो.

ज्या रूग्णांना पूर्णपणे थायरॉईड काढून टाकण्याची आवश्यकता असते, त्यांना ऊर्जा संतुलन आणि चयापचय राखण्यासाठी आयुष्यभर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीची आवश्यकता असते. मात्र नियमित तपासणीसह हे रूग्ण सामान्य आयुष्य जगू शकतात. थायरॉईड कर्करोग बहुतेकदा स्पष्ट लक्षणांशिवाय होतो यावर तज्ज्ञांचे एकमत आहे, मात्र लवकर निदान हा सर्वोत्तम बचाव आहे.