ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात खाण्याजोगा एक गोड पदार्थ म्हणजे कोहळ्याचा पेठा. आग्र्याचा ताजमहाल जसा प्रसिद्ध आहे, तसाच गोड-खवय्यांमध्ये प्रसिद्ध आहे आग्र्याचा पेठा! कोहळा (Ash Gourd) या वेलीवरील फळापासून तयार केलेला हा पेठा उन्हाळ्यामधील उष्ण वातावरणाला अनुरूप आहे, कारण कोहळा ’शीत’ आहे. कोहळ्याचा हा शीत गुण रक्तामधील उष्णता कमी करण्यास सुद्धा लाभदायक आहे. नाकामधून रक्त पडण्यावर कोहळा उपयुक्त आहे. चवीला गोड असणारा कोहळा एकंदरच विविध पित्त आणि रक्तसंबंधित विकारांमध्ये उपयुक्त आहे.
कोहळ्यामुळे मूत्राशय स्वच्छ होऊन लघवी साफ होते आणि मूत्रविसर्जन करताना होणारी जळजळ सुद्धा कमी होते. कोहळ्यामधून ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात आवश्य़क असणारा ओलावा ९६.५% इतक्या प्रमाणात मिळतो. मात्र त्यासाठी कोहळ्याचा रस पिणे अपेक्षित आहे. कारण कोहळ्याचा पेठा तयार करताना त्यामधील पाणी बाहेर काढले जाते. कोहळ्यामुळे निद्रानाशाचा व वाईट स्वप्ने पडण्याचा त्रास कमी होतो. कोहळा मलभेदक असल्याने शरीरामध्ये जमलेल्या कठीण मलाचे भेदन करुन मलविसर्जनास साहाय्य करतो.

कोहळा बलवर्धक व वीर्यवर्धक असून शरीरधातूंसाठी विशेषतः हृदयाच्या स्नायूंसाठी आणि केसांसाठी पोषक आहे. कोहळ्याचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे वात-पित्त आणि कफ या तिन्ही दोषांसाठी शामक असलेल्या मोजक्या पदार्थांमध्ये कोहळ्याचा समावेश होतो. हा स्वादिष्ट पेठा गुलाब पाकळ्यांबरोबर खाण्याची पद्धत उत्तर भारतामध्ये आहे ,जी शरीरामध्ये थंडावा वाढवण्यासाठी उपयोगी आहे.
टीप- पेठ्यामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त आहे आणि साखर आरोग्यासाठी वाईट आहे हे मात्र ध्यानात ठेवा.