Healthy Naivedya Recipes सगळीकडे उत्सवी वातावरण म्हटलं की, नैवेद्याचे विविध पदार्थ डोळ्यासमोर येतात. या नैवेद्यामागचं आहारशास्त्र उकलायला लागलं, तर आपोआप त्या- त्या सणांचा आनंद द्विगुणित होतो. तसंच काहीसं गणेशोत्सवातील नैवेद्याच्या पदार्थांबद्दल जाणून घेताना जाणवलं. साधारण ११ दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. या ११ दिवसात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे पदार्थ नैवेद्य म्हणून देवासमोर दाखविले जातात. जेवणात अनेक ठिकाणी १६ प्रकारच्या भाज्या, १६ चटण्या अशा प्रकारचे जेवण केले जाते. या १६ भाज्यांमध्ये आषाढ ते भाद्रपद महिन्यांत बाजारात रेलचेल असणाऱ्या फळभाज्या, पालेभाज्या यांचा समावेश असतो.

पोषकतत्त्वांची भाजी

इतक्या भाज्या वेगवेगळ्या करण्यापेक्षा त्या एकत्र करून एक विशेष भाजीदेखील करता येऊ शकेल असा विचार करून ऋषीपंचमीच्या निमित्ताने मिश्र भाजीदेखील नैवेद्यासाठी तयार केली जाते. गंमतीचा भाग असा की, यातील कोणतीही भाजी त्यातील पोषणतत्त्वांशी फारकत न घेता सहज आहारात एकजुटीने सामील होऊन जाते, हे विशेष!

भाजीमध्ये प्रथिनांचं संतुलन

ऋषीची भाजी लाल तांदूळ आणि दही यासोबत पानात वाढली जाते. म्हणजे लोह, पोटॅशिअम, सेलेनियम, झिंक, हरितके , जीवनसत्त्वे भाजीमध्ये आहेत. मात्र त्यातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असल्यामुळे लाल तांदूळ ज्यात तंतुमय पदार्थ मुबलक आहेत असे धान्य आणि दहीदेखील सोबत असेल तर प्रथिनांचं संतुलनदेखील राखलं जातं. या भाजीमध्ये विविध प्रकारच्या बियादेखील समाविष्ट केल्या जातात त्यामुळे शेंगदाणे, तीळ यामधून मिळणारे चांगले स्निग्धांश , कॅल्शिअम आपसूक आहारात समाविष्ट होतात.

आपल्या पिढीसमोरचं वेगेवेगळ्या भाज्या कशा आहारात समाविष्ट कराव्यात हा मोठ्ठा प्रश्न या मिश्र भाजीने सोडवलाय एवढं नक्की!

गोडधोडाचा नैवेद्य

आता विचार करूया गोडधोडाचा! नैवेद्याच्या पानात गोड पदार्थांमध्येसुद्धा वैविध्य असतं. पुरणपोळी, दिंडं , मोदक पातोळ्या यासारखे विविध पदार्थ नैवेद्य म्हणून दाखविले जातात. आपण आज असेच काही पारंपरिक पौष्टिक नैवेद्याचे पदार्थ जाणून घेऊ

खांटोळी:

तांदळापासून तयार केल्या जाणाऱ्या या गोड पदार्थामध्ये सुकामेवा आणि तांदळाचा रवा वापरला जातो. खोबरं, रवा, गूळ, वेलचीपूड सगळं एकत्र तुपात शिजवून घेतलं जातं. एका ताटात पसरवून त्यांचे चौकोनी भाग केले जातात. यालाच खांटोळी असे म्हणतात.

धोणस/ ढोणस:

फणसाच्या गऱ्यांपासून तयार केला जाणारा हा पदार्थ तुलनेने कमी गोड़ असतो. फणसाच्या गऱ्यांचा रस, रवा, ओलं खोबरं आणि गूळ यांचे मिश्रण करून ते उकडून हा पदार्थ केला जातो. यासाठी बरका / रसाळ फणस वापरला जातो. आताच्या काळात केक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पदार्थांमध्ये फणसापासून तयार केलेला हा पदार्थ कोकणात घरोघरी सर्रास बनविला जातो. याचप्रमाणे चिबूड आणि केळ्यापासून देखील धोनीस बनविले जातात.

चिबूड-खीर:

चिबूड म्हणजेच Muskmelon हे या ऋतूंमध्ये सहजी मिळणारं फळ! चिबूड आणि दही एकत्र करून तयार केली जाणारी खीर या उत्सवी नेवैद्यामध्ये सहज केला जाणारा गोड पदार्थ आहे. चिबुडचे चौकोनी तुकडे करून त्याच्याच रसासोबत एकत्र करून त्यावर दही-साखर घालूनही हा पदार्थ खाल्ला जातो.

पातोळ्या:

पातोळ्या म्हणजे सोप्या शब्दांत सांगायचं तर उकडीच्या मोदकाचं करंजीकरण असं म्हटलं तर वावगं ठरू नये 🙂 फरक इतकाच की पातोळ्या उकडताना त्यावर हळदीचं किंवा केळीचं पान वापरलं जातं.

शिरवाळे:

तांदळाच्या पिठापासून तयार केल्या जाणाऱ्या शेवयांना शिरवाळे असे म्हणतात. या शेवया नारळाच्या दुधासोबत खायला दिल्या जातात. गोडव्यासाठी गूळ आणि वेलचीपूड एकत्र करून नारळाच्या गरम दुधामध्ये शिजवून या शेवया खायला दिल्या जातात.

आंबेडाळ:

कैरी, चणाडाळ लिंबू यांचं मिश्रण असणारी वाटली डाळ जीवनसत्त्व क आणि प्रथिनांनी भरपूर असते.

घावन घाटलं:

नारळाच्या दुधासोबत तांदळाचे लुसलुशीत घावन म्हणजे स्निग्धांश आणि कर्बोदकांची योग्य सांगड! ऊर्जेने भरपूर असणाऱ्या या नैवेद्यामध्ये प्रथिने फार कमी प्रमाणात आहेत.

कडबू:

कडबू म्हणजे कणीक वापरून केलेल्या पुरणाच्या करंज्या. प्रथिने आणि स्निग्धांशांनी भरपूर असलेला नैवेद्याचा हा पदार्थ उत्सवी उत्साहात उत्तम ऊर्जा पुरविणारा आहे .

या सगळ्या गोड पदार्थांमध्ये तांदूळ, लापशीचा रवा, गूळ, खोबरे असं या पावसाळी ऋतूमध्ये ऊर्जा म्हणजेच कॅलरीज सोबत कर्बोदके, स्निग्धांश, लोह यांचं विशेष संतुलन यात आढळून येतं. शिजवून, उकडून तयार केल्या जाणाऱ्या या पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह किंवा टेस्ट एन्हान्सर म्हणजे चव वाढविणारे रसायन वापरले जात नाही.

काही ठिकाणी गौरीसाठी मांसाहाराचा नैवेद्य दाखविला जातो. चातुर्मास संपून माशांचं प्रजोत्पादन पूर्ण झाल्याची चाहूल या भावनेतून गौरी पूजेनंतर मांसाहार करायला देखील सुरुवात केली जाते .

उत्सवाचा आनंद घेत , नाचत गात गौरी आगमन आणि त्यांचं घरात विराजमान होणं साजरं करताना आपल्या पूर्वजांनी ऋतुमानाचं भान तर ठेवलं आहेच पण त्यानुरूप सामाजिक परिस्थितीचं सुरेख भानही राखलेलं दिसून येतं.

आजच्या काळात या ताजे ,सकस, पोषक आणि लज्जतदार पदार्थ परंपरा म्हणून जपण्याची आवश्यकता आहे असं वाटत राहतं.