Benefits Of Starting Your Mornings With Gut Cleansing Morning Detox Water : अनेकदा मालिका, चित्रपट, वेब सिरीजमधील अभिनेते किंवा अभिनेत्री त्यांच्या दिवसभरातील आहार, मेकअप प्रोडक्टस आणि त्यांच्या फायद्याबद्दल चाहत्यांना सांगत असतात. अलीकडेच अभिनेत्री अलाया एफने सुद्धा तिच्या मॉर्निंग ड्रिंक बद्दल सांगितले आहे. अभिनेत्री अलाया तिच्या ग्लॅमरस लूकमुळे मात्र कायम चर्चेत असते. तर अलीकडील इंस्टाग्राम पोस्टमध्ये, अभिनेत्रीने तिचे मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक शेअर केले आहे, जे खूप फायदेशीर आहे असे तिने सांगितले आहे.
“एक मॉर्निंग ड्रिंक जे आतड्यांना मदत करते, त्वचा स्वच्छ करते, चयापचय वाढवते आणि पोटफुगी कमी करते? आणि ते बनवायला फक्त २ मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो” ; असे तिने एका व्हिडीओत सांगितले आहे.
मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंकसाठी साहित्य:
- कोमट पाणी
- २ चमचे भिजवलेले चिया सीड्स
- १ चमचा ताज्या लिंबाचा रस
- २ चमचे ॲपल सायडर व्हिनेगर
- १ चमचा मध
मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक कसे बनवायचे?
एका ग्लासमध्ये थोडे कोमट पाणी घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस, २ चमचे ॲपल सायडर व्हिनेगर, २ चमचे भिजवलेले चिया सीड्स आणि एक चमचा मध घाला. ढवळून घ्या आणि प्या.
मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंकबद्दल महत्वाचे तीन मुद्दे पुढीलप्रमाणे…
- मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक सकाळी उठल्यावर आधी रिकाम्या पोटी घ्या.
- पाणी उकळत नाही तर कोमट आहे ना याची खात्री करा.
- सर्वोत्तम परिणामांसाठी हे नियमितपणे घ्या.
मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक पिण्यापूर्वी त्यांचे फायदे समजून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने आरोग्य तज्ज्ञांशी संपर्क साधला…
मध आणि लिंबू
कन्सल्टंट डायटिशियन आणि प्रमाणित मधुमेह शिक्षिका कनिक्का मल्होत्रा यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, सकाळी मध-लिंबू पाणी पिल्याने वजन कमी होण्यास, पचन होण्यास मदत होते आणि हायड्रेशन वाढते. उच्च-कॅलरी पेयांच्या जागी मध-लिंबू पाणी प्यायल्याने एकूण कॅलरीजचे प्रमाण कमी होऊ शकते, ज्यामुळे वजन कमी होते. पाण्याचे सेवन वाढल्याने चयापचय वाढू शकते आणि पोट भरल्याची भावना निर्माण होऊ शकते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
कनिक्का मल्होत्रा यांच्या मते, लिंबाचा रस पाचक रसांच्या निर्मितीला प्रोत्साहन देतो, मध प्रीबायोटिक म्हणून काम करतो आणि आपल्या पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना वाढण्यास मदत करतो. शिवाय, या पेयाचे हायड्रेटिंग गुणधर्म बद्धकोष्ठता टाळू शकतात आणि नियमित आतड्यांच्या हालचालींना प्रोत्साहन देऊ शकतात.
एम्सचे माजी सल्लागार आणि SAAOL हार्ट इन्स्टिट्यूटचे संस्थापक, हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर बिमल छाजेर यांच्या मते, साखरेऐवजी कच्च्या मधाचे सेवन केल्याने रक्तातील ग्लुकोज आणि रक्तातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. कारण मध हा निसर्गात आढळणारा एक नैसर्गिक पदार्थ आहे. तो प्रक्रिया न केलेला आहे. त्यामुळे कोणत्याही संरक्षक किंवा रसायनांशिवाय. दिवसातून ३५-४५ ग्रॅम प्रक्रिया न केलेला मध, चहाद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे सेवन केल्याने मानवी शरीरावर अनेक फायदेशीर परिणाम होऊ शकतात.
चिया सीड्स
कनिक्का मल्होत्रा म्हणाल्या की, चिया सीड्स फायबरने समृद्ध असतात, ज्यामुळे पोट निरोगी राहण्यास मदत होते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दररोज चिया सीड्स खाल्ल्याने तुमच्या आतड्यांसंबंधी हालचाली नियंत्रित होण्यास मदत होते. चिया सीड्स शरीरात हळूहळू ऊर्जा सोडतात; ज्यामुळे तुम्ही दिवसभर सक्रिय राहता.त्यात प्रथिने, निरोगी चरबी आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे उर्जेची पातळी राखण्यास मदत करतात. या सीड्समुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे जास्त खाणे टाळता येते आणि वजन सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते.
अॅपल सायडर व्हिनेगर
तुमच्या दिवसाची सुरुवात अॅपल सायडर व्हिनेगरने करणे नेहमीच चांगले असते. जे आतड्यांचे पीएच संतुलित करण्यास आणि पचन सुधारण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास देखील मदत करतात. तसेच मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंकमध्ये चिमूटभर मध घातल्याने पेयाची चव आणि पौष्टिक फायदे आणखीन वाढतात.