खराब जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि त्यामुळे सतत वाढणारे वजन, हे सध्या मोठं आव्हान अगदी तरुण पिढीसमोरही ठरतंय. वाढत्या वजनामुळे मधुमेह, रक्तदाब यांसारख्या अनेक आरोग्य समस्यांना तुम्ही बळी पडू शकता. पण, डाएट व वर्कआऊटचे रूटीन कितीही काटेकोरपणे फॉलो केले तरीही शरीराचे वजन नियंत्रणात येत नाही, अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. पण, आहारामध्ये काही पौष्टिक बदल केल्यास नक्कीच मदत मिळू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

निरोगी आहार योजनेसाठी जीवनसत्त्वे, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम व खनिजे यांनी समृद्ध असा संतुलित आपला आहार असेल याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अशा वेळी काही भाज्या आहेत, ज्यांचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहू शकते. यामध्ये पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि शरीराला योग्य पोषणही मिळते, असे भुवनेश्वर येथील केअर हॉस्पिटल्सचे वरिष्ठ आहारतज्ज्ञ गुरु प्रसाद दास यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

(हे ही वाचा: तुमच्या मुलांना कार, बसमधून प्रवास करताना उलट्या होतात का? डाॅक्टरांनी सांगितलेले करा ‘हे’ सोपे उपाय; प्रवास होईल आनंदात)

तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, “प्रत्येक भाजी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यासोबतच कोबी खाणे तुमच्या आरोग्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कोबीमध्ये असणारी पोषक घटक वजन कमी करण्यासह शरीराला पोषणही मिळवून देते. कोबीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, लोह व पोटॅशियम असते. त्यासोबतच कोबी फायबरचा चांगला स्रोतदेखील आहे. त्यामुळे जास्त वेळ भूक लागत नाही. बऱ्याच लोकांचे वजन जास्त खाण्यामुळे वाढते. हे अतिरिक्त खाणे टाळण्यासाठी कोबीचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. कोबीमध्ये अधिक मेटाबॉलिजम असल्यामुळे वजन लवकर कमी करण्यास मदत मिळते.”

कोबीमध्ये भरपूर फायबर आणि पाण्याचे प्रमाण असल्याने बद्धकोष्ठता दूर व्हायला साह्य होऊन आतडी निरोगी राहतात. कोबीमध्ये व्हिटॅमिन के, आयोडीन व अँथोसायनिन यांसारखी अँटिऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात असतात. कोबीसारख्या पोटॅशियमयुक्त पदार्थांचे सेवन वाढवल्याने उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होऊ शकते.

व्हिटॅमिन केचा स्रोत असलेला कोबी मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले आहे. कोबी तुमच्या पोटासाठीही खूप फायदेशीर आहे. कोबीमध्ये फायबर असल्यामुळे पचनास मदत होते. कोबी खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते. कोबीमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून बचाव करण्यास मदत मिळते. तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश करा. बाहेरचे पदार्थ टाळलेलेच बरे. निरोगी राहण्यासाठी तुमचा आहार योग्य असावा, असेही शेवटी दास यांनी नमूद केले.