Colorectal Cancer: बदलती जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि वाढत्या ताणतणावामुळे पूर्वीपेक्षा कमी वयात अनेक गंभीर आजार दिसून येत आहेत. कर्करोग हा अशा आजारांपैकी एक आहे ज्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता महिना साजरा केला जातो.
कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे कोलन कर्करोग. पूर्वी हा आजार ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये आढळत होता. मात्र, आता २० ते ४० वयोगटातील तरूणांमध्ये याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सुरूवातीची लक्षणे ओळखणे आणि त्वरित चाचणी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण उपचारांना विलंब करणे महागात पडू शकते. सुरूवातीला काही लक्षणे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तर मग जाणून घेऊ की, कोलन कर्करोगाची नेमकी कोणती लक्षणे आहेत…
- सतत पोटदुखी आणि पेटके- वारंवार पोटदुखी, गॅस किंवा पेटके येणे ही समस्या वाटू शकते, मात्र ती कोलन कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकते.
- पोट रिकामे करण्यात अडचण- जर तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठता, अतिसार किंवा पोट रिकामे करण्यात अचानक बदल जाणवत असेल तर ते हलक्यात घेऊ नका.
- मलमध्ये रक्त येणे- रक्तस्त्राव किंवा काळा मल हा एक गंभीर धोक्याचा इशारा आहे.
- अचानक वजन कमी होणे- कोणत्याही कारणाशिवाय जलद वजन कमी होणे हे शरीरात गंभीर आजार असल्याचे दर्शवते.
- सतत थकवा आणि अशक्तपणा- पुरेशी झोप घेतल्यानंतरही शरीरात अशक्तपणा येणे हे लोहाच्या कमतरतेचे आणि कर्करोगाचे लक्षण अशू शकते.
- पोट फुगणे- बराच काळ पोटात फुगणे किंवा जडपणा जाणवणे हे देखील एक लक्षण आहे.
- भूक न लागणे- जेवताना नियमितपणे भूक न लागणे आणि लवकर पोट भरल्यासारखे वाटणे हे लक्ष देण्यासारखे आहे.
- कोलन कर्करोग रोखण्यासाठी जीवनशैली आणि आहाराकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी काही पथ्य पाळणं गरजेचं आहे.
कोलन कर्करोगाची लक्षणे जाणवल्यास आहारात काय बदल करावेत?
- फायबरयुक्त आहार- तुमच्या रोजच्या आहारात संपूर्ण धान्य, हिरव्या भाज्या आणि फळे समाविष्ट करा.
- लाल मांस आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून दूर रहा. याचे जास्त सेवन केल्याने कोलन कर्करोगाचा धोका वाढतो.
- पुरेसं पाणी प्या. शरीर हायड्रेट ठेवल्याने पचनसंस्था निरोगी राहते.
- दररोज किमान ३० मिनिटे योगा, चालणे किंवा कोणतीही शारीरिक हालचाल करा.
- धूम्रपान आणि मद्यपान टाळा. या सवयी कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढवतात.
- जर कुटुंबात कर्करोगाचा इतिहास असेल, तर वेळोवेळी कोलोनोस्कोपी आणि इतर चाचण्या करायला विसरू नका.
- ध्यान, प्राणायम आणि पुरेशी झोप यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते आणि आजारांचा धोका कमी होतो. ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.
