Healthy Ageing Fall Prevention Tips वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ फिजिकल थेरपीने दिलेल्या आकडेवारीनुसार पडणं (falls) हे अनपेक्षित इजा होऊन मृत्यू होण्याचं दुसरं सर्वात मोठं कारण आहे. दरवर्षी सुमारे ३७.३ दशलक्ष लोकांना पडल्यामुळे इतकी गंभीर दुखापत होते की, त्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. विशेषतः ६० वर्षांवरील व्यक्तींमध्ये पडणं प्राणघातक ठरण्याचा धोका सर्वाधिक आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट होतं की, वृद्ध व्यक्तींमध्ये पडणं ही केवळ किरकोळ गोष्ट नसून आरोग्यावर मोठा परिणाम करणारी समस्या आहे.
पडण्यामागची कारणं

वृद्ध व्यक्तींमध्ये पडण्याची अनेक कारण असू शकतात, काही कारण ही शारीरिक बदलांशी संबंधित असतात तर काही बाह्यघटक आणि वातावरणाशी संबंधित असतात. शारीरिक बदलांमध्ये स्नायूंचा आकार आणि कार्यक्षमता कमी होणे, हाडं ठिसूळ होणे, डोळे, कान आणि स्नायू यातली सुसूत्रता कमी होणे आदी घटक महत्त्वाचे ठरतात. काही वेळा विशिष्ट औषधांच्या साइड इफेक्ट्स मुळे चक्कर येऊ शकते. यासोबतच काही बाह्यघटक जसं गुळगुळीत फरशी, सैल गालिचे, जिन्याला रेलिंग नसणं, बाथरूममध्ये ग्रॅब बार्सचा अभाव, कमी किंवा अपुरा प्रकाश, चुकीची पादत्राणे वापरणं यासारखे घटक पडण्याची शक्यता वाढवतात.

आपला पडण्याचा धोका किती आहे हे कसं ओळखावं?

कमी धोका (Lower risk):

तुमचं वय ६० किंवा त्यापेक्षा अधिक आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत कधीही पडलेले नसाल किंवा एकदाच किरकोळ पडलेले असाल आणि सद्यस्थितीत तुमची सुसूत्रता व चालणं हे नियमित असेल तर तुम्ही लोअर रीस्क फॉर फॉल्स मधे समाविष्ट होता.

मध्यम धोका (Medium risk):

तुमचं वय ६० किंवा त्यापेक्षा अधिक आहे आणि तुम्ही एकदा पडलेले आहात किंवा तुम्हाला चालण्यात किंवा तोल सांभाळण्यात अडचण जाणवते आहे; तर तुम्ही मीडियम रीस्क फॉर फॉल्स मधे समाविष्ट होता.

जास्त धोका (Higher risk):

तुमचं वय ६० किंवा त्यापेक्षा अधिक आहे, तुम्ही एकदा पडलेले आहात आणि पडण्यामुळे तुम्हाला दुखापत झालेली आहे, किंवा तुम्ही एका वर्षात २ पेक्षा अधिक वेळा तोल जाऊन पडला आहात. पडल्यानंतर तुम्हाला किमान एक तासापर्यंत मदतीशिवाय उठता आलेलं नसेल, दुखापत झाली असेल, तुम्ही बेशुद्ध झालेले असाल तर तुम्ही हाय रीस्क फॉर फॉल्स मधे समाविष्ट होता.

फिजिओथेरपीची भूमिका

फिजिओथेरपीस्ट पडण्याचा धोका तपासून व्यक्तीनुसार उपाययोजना करतात. ते पुढील गोष्टींची तपासणी करतात:

स्नायूंची ताकद, हालचाल आणि लवचिकता
चालताना किंवा दैनंदिन कामं करताना तोल किती राखता येतो
स्मरणशक्ती आणि विचारशक्ती
फिजिओथेरपिस्ट अनेकदा डॉक्टर, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि इतर आरोग्यतज्ज्ञांसोबत मिळून काम करतात. याला मल्टीडीसीप्लिनरी पद्धत म्हणतात.

उपचारांमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो:

व्यायाम: Sit-to-stand: खुर्चीतून उठणं-बसणं, Step-ups: छोट्या पायरीवर पाऊल टाकणं, Dynamic balance: बाजूला पावलं टाकणं, वेग बदलून चालणं, Floor training: जमिनीवरून उठण्याचा सराव
घर सुरक्षित करणं: गालिचे नीट बसवणं, बाथरूममध्ये ग्रॅब बार्स लावणं, जिन्याला रेलिंग बसवणं, पुरेसा प्रकाश ठेवणं
योग्य पादत्राणे घसरट न होणारी, पायाला घट्ट बसणारे शूज वापरणं.

पडणं आणि मानसिक आरोग्य

पडल्यावर वृद्ध व्यक्तींमध्ये भीती, आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होते. त्यांचा सामाजिक सहभाग कमी होतो. ही भीती हालचाल कमी करते, ज्यामुळे स्नायू आणखी कमकुवत होतात आणि पडण्याचा धोका पुन्हा वाढतो. फिजिओथेरपीमुळे हे दुष्टचक्र मोडता येतं.

थोडक्यात,
• वाढत्या वयासोबत पडण्याची शक्यता वाढते हे जरी खरं असलं तरी फिजिओथेरपी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपाय केले तर पडण्याची शक्यता कमी होते.
• आंतरिक आणि बाह्य जोखीम घटक ओळखणं आणि त्यावर उपाय करणं आवश्यक आहे.
• फिजिओथेरपीमुळे स्नायू मजबूत होतात, संतुलन सुधारतं आणि घर सुरक्षित करता येतं.

• पडणं टाळलं तर वृद्ध व्यक्तींचा आत्मविश्वास वाढतो, ते अधिक स्वावलंबी अर्थपूर्ण वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य जगू शकतात.