Heart attack: दिल्लीच्या लाजपतनगर येथील रहिवासी मोहित सचदेवा यांच्यासाठी ९ जुलै ही एक नेहमीची सकाळ होती. गेल्या २० वर्षांपासून ते ७.१५ वाजता जिमला जायचे तसेच ते जिमला गेले. पण, ८.४५ वाजता फक्त अर्ध्या तासानंतर त्यांचे आयुष्य बदलले. व्यवसायाने रिअल इस्टेट एजंट असलेले मोहित १८० किलो वजनाचे लेग प्रेस करत असताना चक्कर येऊ लागल्याने कोसळले. त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. मात्र, सुदैवानं आठ मिनिटांच्या आत मदत उपलब्ध झाली अन् अवघ्या आठ मिनिटांत डॉक्टरांनी त्यांचा जीव वाचवला. या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना डॉ. अब्बास आणि डॉ. तरुण यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
मोहित यांच्या पत्नी रूबी सचदेवा यांना त्यांच्या जिममधील मित्रांनी फोन करून सांगितले की, मोहित यांना मेदांता-मूलचंद हार्ट सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. पत्नी रूबी यांनी सांगितले की, मोहित यांना “जिममधील कोणीतरी दिलेल्या सीपीआरमुळे त्यांचा जीव वाचू शकला.” छातीवर दाब आणि तोंडातून ऑक्सिजन देण्याची ही प्रक्रिया हृदयविकाराच्या वेळी जीव वाचवण्यास मदत करू शकते, जेव्हा हृदय धडधडणे थांबते किंवा मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा करण्यास अडथळा निर्माण होतो.
सुरुवातीला दिलेल्या सीपीआरमुळे कसा फायदा झाला

“अचानक हृदयविकाराचा झटका आल्यानंतर येणारे प्रत्येक मिनिट हे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण ऑक्सिजनयुक्त रक्तप्रवाहाच्या अभावी मेंदू मरायला लागतो. त्यानंतर अवयव एक एक करून बंद पडतात,” असे इर कन्सल्टंट डॉ. अब्बास अली खटाई म्हणतात. जेव्हा मोहितला रुग्णालयात आणण्यात आले, तेव्हाही त्याची नाडी थांबली नव्हती. यावेळी त्याला अॅडव्हान्स्ड सीपीआर, इलेक्ट्रिक शॉक द्यावे लागले आणि मॉनिटरवर नाडी दिसली तेव्हा व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले, असेही त्यांनी सांगितले.

हृदयाचे ठोके स्थिर झाल्यानंतर मेदांता मूलचंद हार्ट सेंटरमधील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. तरुण कुमार यांनी रक्तदाब वाढवण्यासाठी औषधे दिली. नंतर इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG) केल्यानंतर, डॉक्टरांनी अँजिओग्राफी केली आणि त्यांच्या हृदयाच्या तीन रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्याचे आढळले. “दोन रक्तवाहिन्या पूर्णपणे ब्लॉक झाल्या होत्या. आम्ही प्रथम अलीकडेच ब्लॉक झालेल्या धमनीवर अँजिओप्लास्टी केली, रक्तवाहिन्या रुंद करण्यासाठी हे आवस्यक होते, असं डॉ. कुमार म्हणाले. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाह पुनर्संचयित झाल्यानंतर रुग्णाला आयसीयूमध्ये हलवण्यात आले, जिथे तो शुद्धीवर आला.

मोहित यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा झाली. २४ तासांच्या आतच व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आला आणि रक्तदाबाची औषधे सुरू करण्यात आली. तीन दिवसांनंतर ते घरी जाण्यासाठी पुरेसे स्थिर झाले.

हृदयाच्या ब्लॉकेजमळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का?

कोरोनरी धमनीमध्ये हृदयविकारामुळे हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा विस्कळीत होतो, ज्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि शेवटी ते बंद पडतात. डॉ. कुमार म्हणतात, “मोहित यांच्या बाबतीत या ब्लॉकेजमुळे त्यांचे हृदय बंद पडले.”

कोणतेही व्यसन नसताना, २० वर्ष व्यायाम करूनही हॉर्ट अटॅकचं कारण काय ?

डॉक्टरांच्या मते, बहुतेक तंदुरुस्त तरुण त्यांच्या हृदयाच्या आजारांची तपासणी करून घेण्याकडे दुर्लक्ष करतात. हृदयाच्या स्नायूची जाडी किंवा हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथीसारखे काही आजार अनुवांशिकरित्या आढळतात, तर काहींमध्ये रक्त गोठण्याची शक्यता जास्त असते आणि काहींमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलचा कौटुंबिक इतिहास असू शकतो, “म्हणूनच सर्व भारतीयांनी २५ वर्षांनंतर दरवर्षी त्यांच्या हृदयविकाराच्या चाचण्या करून घेतल्या पाहिजेत, विशेषतः कौटुंबिक इतिहास असलेल्यांना. तसेच जिममध्ये जाण्यापूर्वी प्रत्येकाने संपूर्ण हृदयरोग चाचणी करून घेतली पाहिजे,” असे डॉ. कुमार म्हणतात.

मोहित यांनी ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते ती म्हणजे ते व्यायाम करताना त्यांच्या डाव्या हाताला होणारा त्रास. “आम्हाला आढळले की गेल्या दोन वर्षांपासून त्यांना व्यायामादरम्यान मंद वेदना जाणवत होत्या आणि स्नायूंचा ताण समजून त्यांनी दुर्लक्ष केले होते. गेल्या वर्षी वैष्णो देवीला गेले तेव्हा त्यांना अशाच प्रकारची वेदना जाणवली. पण, ट्रेकमुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. हृदयात रक्त प्रवाह कमी झाल्याचे हे पहिले लक्षण आहे. पण, त्यांनी कधीही कोणाचा सल्ला घेतला नाही,” असे डॉ. कुमार म्हणतात. तसेच त्यांना हेही माहीत नव्हते की, त्यांना उच्च रक्तदाब होता. “जर त्यांनी आधीच तपासणी केली असती तर ते या संकटाच्या टप्प्यावर पोहोचले नसते,” असे डॉक्टर सांगतात.

डाव्या बाजूला वेदना, गुदमरणे किंवा जळजळ होणे आणि जास्त थकवा येणे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

जिमला जाणारे लोक प्रथिनांसाठी घेणाऱ्या पावडरमुळे ब्लॉकेजचा धोका वाढतो का?

मोहित यांची पत्नी रूबी म्हणते की, मोहित गेल्या २० वर्षांपासून जिममध्ये जातात, ते तंदुरुस्त होते आणि म्हणूनच त्यांनी कधीही हृदय तपासणी किंवा मूल्यांकन केले नव्हते. “आम्हाला कधीही गरज वाटली नाही, कारण मोहितने शिस्तीचे पालन केले. ते कधीही जंक फूड खात नव्हते किंवा बाहेरून अन्न मागवत नव्हते. कधीही धूम्रपान करत नव्हते आणि मर्यादेत मद्यपान करत होते. आम्ही महिन्यातून एकापेक्षा जास्त वेळा कधीही रेस्टॉरंटमध्ये गेलो नाही,” असंही त्या म्हणाल्या. त्यांच्या हृदयविकाराच्या घटनेनंतरच चाचण्यांमधून असे दिसून आले की मोहित यांना उच्च रक्तदाब होता, त्यांना कोलेस्ट्रॉल आणि फॅटी लिव्हरची सीमा होती, “पण यापैकी कोणतीही लक्षणे त्यांना दिसली नाही,” असे पत्नी रूबी म्हणाल्या.

दरम्यान, जास्त प्रमाणात प्रोटीनचे सेवन, विशेषतः सप्लिमेंट्समधून, मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो आणि डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच एका अभ्यासानुसार, संशोधकांना असे आढळून आले की, उच्च चरबीयुक्त, उच्च प्रथिनेयुक्त आहार घेतल्यानंही ब्लॉकेज आणि संभाव्यतः हृदयविकाराचा धोका वाढतो. म्हणून जर तुम्ही जिमला जात असाल तर सूक्ष्म लक्षणे असतानाही प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या, असा सल्ला डॉ. कुमार देतात. त्यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो,” असे डॉ. कुमार म्हणतात.

सीपीआर का?

डॉ. अब्बास म्हणतात की, जीव वाचवण्यासाठी सीपीआर देणे शिकवले पाहिजे. “मोहित यांच्या जिम मित्रांनी वेळेवर सीपीआर दिल्याने त्यांना मदत झाली.

हृदयविकारानंतर कशी काळजी घ्यावी?

उपचार पूर्ण झाल्यानंतर डॉ. तरुण म्हणतात की, हृदयविकारानंतरच्या रुग्णाने १०-१५ मिनिटे चालायला सुरुवात करावी आणि सहा आठवडे किंवा त्याहून अधिक कालावधीत हळूहळू २०, ३० आणि ४० मिनिटे चालायला सुरुवात करावी. शारीरिक हालचालीमुळे मदत होते, शरीराचे वजन नियंत्रित करण्यास मदत होते”, असे डॉ. कुमार म्हणतात.