Heart diseases and diabetes killing Indians: भारत आरोग्य संकटाच्या नजीक जात आहे असं एका संशोधनातून समोर आलं आहे. जगातील आघाडीच्या मेडिकल जर्नल्सपैकी एक असलेल्या द लॅन्सेटच्या एका नवीन अभ्यासात दीर्घकालीन आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भारतात मधुमेह, कर्करोग आणि ह्रदयरोगांमुळे मृत्यू होण्याची शक्यता वाढल्याचे या संशोधनातून दिसून आले आहे. त्यामुळे देशातील आरोग्य सेवेसाठी ही धोक्याची घंटा आहे.
“भारतात दीर्घकालीन आजारांच्या कारणांमध्ये बहुतांश मृत्यूमागे ह्रदयरोग आणि मधुमेह हे आजार कारणीभूत आहेत असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यातही भारतातील पुरूष आणि महिलांच्या तुलनेत महिलांना सर्वाधिक धोका आहे. हे संशोधन इम्पिरियल कॉलेज लंडन आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांनी केले आहे.
जुनाट आजारांचा शरीरावर परिणाम
ह्रदयरोग, मधुमेह, कर्करोग आणि श्वसनाचे गंभीर आजार हे दीर्घकालीन परिणाम शरीरावर करतात. हे अनुवांशिक, पर्यावरणीय आणि जीवनशैलीशी संबंधित घटकांमुळेही उद्भवतात. अल्कोहोलचे सेवन, व्यायामाचा अभाव, अयोग्य आहार आणि विचित्र जीवनशैली यामुळे परिस्थिती आणखी बिकट होते.
लॅन्सेटच्या अभ्यासात दीर्घकालीन आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूदरांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यात कर्करोग, ह्रदयरोग, श्वसनाचे जुनाट आजार आणि मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य आजारांशी संबंधित मृत्यूदरांचा अभ्यास करण्यात आला. गेल्या ३० वर्षांत भारतात दीर्घकालीन आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
उच्च रक्दाब, लठ्ठपणा, मधुमेह आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींशी संबंधित ह्रदयरोग हे भारतीयांमध्ये मृत्यूचे प्रमुख कारण आहे. कर्करोगाशी संबंधित मृत्यूच्या संख्येतही वाढ झाली आहे. यामध्ये फुप्फुस, स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. लठ्ठपणा आणि व्यायामाच्या अभावामुळे मधुमेहाचे प्रमाणही वाढत आहे. धूम्रपान आणि वायू प्रदूषणामुळे होणारे श्वसनाचे आजार देशातील चिंताजनक बाब आहे असे या अभ्यासात म्हटले आहे.
केवळ वृद्धच नाही तर तरूण पिढीही दीर्घकालीन आजारांमुळे प्रभावित होते. लॅन्सेटच्या अभ्यासातून असे दिसून आले की, दीर्घकालीन आजारांमुळे होणाऱ्या मूत्यूदरात वाढ झाली आहे. महिलांमध्ये ही वाढ ६८ टक्क्यांनी झाली आहे, तर पुरूषांमध्ये ५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ह्रदयाच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना ह्रदयरोग होण्याची शक्यता जास्त असते.
भारतात अधिकाधिक लोक बैठी जीवनशैली अगदी सहजपणे स्वीकारतात. हेदेखील दीर्घकालीन आजारांचे प्रमुख कारण ठरते. याला अयोग्य आहार आणि शून्य व्यायामाची जोड मिळाली तर ते मन आणि शरीर दोन्हीवर परिणाम करणाऱ्या दीर्घकालीन आजारांना निमंत्रित करतात.