Height Of Your Shadow Effect on Vitamin D: तुम्हाला माहित आहे का, भारतात प्रत्येकी चार पैकी तीन जण हे ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेने त्रस्त आहेत. टाटा १ एमजी ने २०२३ मध्ये २७ शहरांमधील २.२ लाखांहून अधिक लोकांच्या आरोग्य स्थितीचा अभ्यास केला होता. यापैकी ७६% लोकांमध्ये या अत्यावश्यक जीवनसत्त्वाची कमतरता आढळून आली होती. व्हिटॅमिन डी हे हाडांचे आरोग्य, रोगप्रतिकारक कार्य आणि एकूणच तंदुरुस्तीसाठी आवश्यक असते. आपलं शरीर जेव्हा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा शरीरात नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी तयार होते. अलीकडेच डॉ विशाखा शिवदासानी, राज शामानी यांनी होस्ट केलेल्या पॉडकास्टमध्ये आपले शरीर पुरेसा सूर्यप्रकाश शोषत आहे का हे कसे ओळखावे हे सांगितले आहे. डॉ. विशाखा सांगतात की, तुमच्या सावलीवरून तुमच्या शरीराला पुरेसं व्हिटॅमिन डी मिळतंय की नाही याचा अंदाज येऊ शकतो, ते कसं हे आता आपण पाहणार आहोत.

तुम्ही घराबाहेर असताना तुमची सावली तुमच्या उंचीपेक्षा लहान असल्यास, याचा अर्थ असा होतो की तुमचे शरीर व्हिटॅमिन डी प्रभावीपणे शोषत आहे. पण, जर तुमची सावली तुमच्यापेक्षा उंच दिसली, तर मात्र तुमचे शरीर पुरेसे व्हिटॅमिन डी शोषत नाही हे दिसते.

मी घराबाहेर असताना माझी सावली माझ्या उंचीपेक्षा कमी असेल तर..

GVG Invivo हॉस्पिटलमधील ज्येष्ठ सौंदर्यशास्त्र आणि प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. गुणसेकर वुप्पलापती यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “तुमच्या उंचीच्या तुलनेत तुमच्या सावलीची उंची आकाशातील सूर्यकिरण किती अंशात तुमच्यापर्यंत पोहोचतात हे अप्रत्यक्षपणे सांगू शकते. जेव्हा तुमची सावली तुमच्या उंचीपेक्षा लहान असते, तेव्हा याचा अर्थ सामान्यतः सूर्य आकाशात उंच असतो, विशेषत: क्षितिजापासून ४५-अंश कोनात वर असतो. सूर्यप्रकाशातील UVB किरण वातावरणात प्रवेश करण्यासाठी आणि तुमच्या त्वचेपर्यंत पोहोचण्यासाठी ही स्थिती महत्त्वपूर्ण आहे, जी व्हिटॅमिन डीच्या शोषणासाठी आवश्यक आहे.

हे ही वाचा<< चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?

जेव्हा तुमची सावली तुमच्या उंचीपेक्षा लहान असते, तेव्हा तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी चांगल्या प्रकारे तयार होण्याची शक्यता जास्त असते कारण सूर्याचे UVB किरण त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या स्थितीत असतात. विशेषत: मध्यान्हाच्या वेळेत सकाळी १० ते दुपारी ३ मध्ये सूर्याची ही स्थिती असते. अर्थात व्हिटॅमिन डी शोषण्यासाठी तुम्ही किती वेळ सूर्यप्रकाशात असता आणि शरीराचा किती भाग सूर्यप्रकाशात असतो हे पाहणे आवश्यक असते.

घराबाहेर असताना सावली उंचीपेक्षा उंच असेल तर..

जर तुमची सावली तुमच्या उंचीपेक्षा उंच दिसली, तर त्यावेळी सामान्यत: सूर्य 45 अंशांच्या खाली असतो. डॉ वुप्पलापती म्हणतात की, अशावेळी तुमच्या त्वचेपर्यंत पोहोचण्यासाठी UVB किरणोत्सर्गाची परिणामकारकता कमी होते, ज्यामुळे व्हिटॅमिन डी कमी शोषला जाऊ शकतो. अर्थात हा निश्चित निकष नाही कारण अनेकदा सूर्याची स्थिती ढग, वायू प्रदूषण आणि अन्य भौगोलिक घटक याचा प्रभाव असू शकतो. तसेच, त्वचेचा प्रकार, वय आणि सूर्यप्रकाशात घालवलेला वेळ हे सुद्धा निकष महत्त्वाचे ठरतात.