तुम्ही अनेक लोकांकडून ऐकले असेल की, जेवण केल्यानंतर चालायला हवे; जे पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, तुम्ही जेवणानंतर योगादेखील करू शकता? पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली काही योगासने जाणून घेऊ या. वज्रासन हे एकमेव असे आसन आहे की, जे जेवणानंतरही करता येते. खरे तर, पचनसंस्था व्यवस्थित राहावी यासाठी किंवा संसर्ग, गॅस्ट्रोएन्टेरिटिस इत्यादींवर मात करण्यासाठी याची शिफारस केली जाते. तुमची पचनसंस्था मजबूत करण्यासोबतच मणक्याशी संबंधित समस्यांवरही ते उपयुक्त आहे, असे योगतज्ज्ञ कामिनी बोबडे सांगतात..
पावसामुळे उष्णतेपासून आराम मिळतो; पण पावसाळ्यात रोगराईमुळे पचनसंस्थेवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे पाचन तंत्रे मंदावतात. यावेळी तुम्ही काही योगासने करून तुमची पचनक्रिया सुधारू शकता. जेवल्यानंतर लगेच बसू नये किंवा झोपू नये. अन्न पचायला थोडा वेळ लागतो. एवढेच नाही, तर जेवण केल्यानंतर फिरायला जाण्याचा सल्ला दिला जातो; जेणेकरून अन्नाचे पचन व्यवस्थित होईल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. जेवण झाल्यावर आपण व्यायाम करू शकत नाही; पण योगासने नक्कीच करू शकतो.
पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त योगासन
१. वज्रासन
रात्रीच्या जेवणानंतर वज्रासन हे सर्वोत्तम योगासनांपैकी एक आहे. हे आसन प्रामुख्याने शरीराचा वरचा भाग आणि पोट ताणण्यावर लक्ष केंद्रित करते; ज्यामुळे तुमचा श्वासोच्छवास आरामशीर होऊन पचनास मदत होते. हे आसन रात्रीच्या जेवणानंतर सहज करता येते. कारण- ते पचनाला चालना देते. हे योगासन करण्यासाठी तुम्ही तुमचे दोन्ही पाय दुमडून नितंबांवर आणि हात गुडघ्यावर ठेवा. तुमची पाठ सरळ ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या. किमान १०-१५ मिनिटे या आसनात राहा.
करण्याची पद्धत
- आपले पाय वाकवा आणि आपल्या गुडघ्यावर बसा. तुमच्या पायांचे पंजे उलट्या स्थितीत मागे खेचा. त्यांना एकत्रीत जोडा आणि पायाचे अंगठे एकमेकांवर क्रॉस करून ठेवा.
- हळूहळू तुमचे शरीर अशा प्रकारे खाली करा की तुमचे नितंब पायाच्या घोट्यावर राहील आणि तुमच्या मांड्या तुमच्या पोटरीच्या स्नायूंवर स्थिरावतील.
- तुमचे दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा, डोके सरळ ठेवा आणि तुमची नजर एकदम समोर असेल.
- तुमचे लक्ष तुमच्या श्वासांच्या हालचालीवर केंद्रित करा. तुम्ही श्वास कसा घेत आहात याकडे लक्ष द्या. श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना श्वासांवर काळजीपुर्वक लक्ष ठेवा.
- आपले डोळे बंद करा आणि आपल्या श्वासांच्या हालचालीकडे लक्ष द्या. हळू हळू आपले मन, मस्तिष्कमधून सर्व गोष्टी काढून टाकून, फक्त श्वास आत घेण्यावर आणि श्वास बाहेर सोडण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.
हे आसन सुरुवातीला किमान 5 मिनिटे आणि जास्तीत जास्त १० मिनिटे करता येते. एकदा तुम्हाला याची सवय झाली की तुम्ही ३० मिनिटांपर्यंत वेळ वाढवू शकता.
२. अग्निसार
अग्निसार हा प्राणायामाचा एक प्रकार आहे. हा प्राणायाम नियमित केल्याने नाभीच्या भागावर सर्वाधिक परिणाम होतो. त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि विविध रोगांपासून आपला बचाव होतो. यामुळे पोटाची चरबी कमी होते.
करण्याची पद्धत
- आपले दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा.
- नंतर तोंडातून खोल श्वासोच्छ्वास बाहेर टाकत पोट आतल्या बाजूला ओढा. आता शक्य तितका श्वास थांबवा आणि पोट आत बाहेर ओढा.
- आपले लक्ष नाभीवर केंद्रित करा. २० ते ४० वेळेस असे करा. पुन्हा सामान्य स्थितीत या.
- श्वास सामान्य झाल्यानंतर ही क्रिया दोन ते तीन वेळा पुन्हा करा.
- उभे राहून किंवा बसूनही आपल्या सोयीनुसार कोणत्याही प्रकारे ही क्रिया करू शकता.
३. पवनमुक्तासन
या आसनाच्या नावावरूनच स्पष्ट होते की, हे आसन शरीरातील पचनक्षमतेमधून गॅसेसना बाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळे याला इंग्रजीमध्ये हवा बाहेर काढण्याचे आसन असे म्हटले जाते. पवन मुक्तासन एक उत्कृष्ट आसन आहे; जे पचनक्षमतेचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण मानले जाते.
करण्याची पद्धत
- फरशीवर पोटाच्या आधारे शवासन (Shavasana) सारखी स्थिती करुन आरामात झोपा.
- डावा गुडघा वाकवा आणि जेवढे शक्य होईल तितके त्याला पोटाजवळ नेण्याचा प्रयत्न करा.
- आता श्वास सोडताना तुमच्या दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंतवा आणि गुडघ्यांच्या खाली ठेवा आणि त्यांच्या सहाय्याने तुमच्या डाव्या गुडघ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
- त्यानंतर तुमचे डोके जमिनीवरुन वरच्या बाजूला घ्या आणि गुडघ्यापर्यंत नाकाने स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
- डोके वर उचलून आणि नाकाने गुडघ्यांना स्पर्श करुन 10-30 सेकंद याच स्थितीमध्ये रहा आणि हळूहळू श्वास सोडा.
- आता हीच पूर्ण प्रक्रिया उजव्या पायाने करा आणि 3-5 वेळा हे आसन पुन्हा करा.