Ghee Benefits For Sleep : ऑफिसवरून आल्यावर फ्रेश होऊन, जेवण करून अंथरुण घालून रात्रीची चांगली झोप घेण्याचे जे सुख असते ते कुठेच नाही, कारण रात्री लागलेली गाढ झोप दुसऱ्यादिवशी शरीराला आरामदायी, ताजेतवानं ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. पण, बऱ्याच लोकांना रात्री नीट झोपच येत नाही किंवा झोपल्यावर वारंवार जाग येते. जर तुम्हालाही ही समस्या जाणवत असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक प्राचीन आयुर्वेदिक उपचार घेऊन आलो आहोत; कदाचित तो तुमच्या उपयोगी पडेल…

आरोग्याचे मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षक श्लोका जोशी यांच्या मते, तुमच्यापासून काही फूट अंतरावर तूप किंवा एरंडेल तेलाचा दिवा खोलीत लावून झोपल्याने तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होऊ शकते. तुपाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामध्ये झोपेच्या वेळी तुपातून निघणाऱ्या धुराचा वास घेतल्याने श्वसनाचे कार्य चांगले राहते आणि तुमची मज्जासंस्था शांत होते.

याबद्दल द इंडियन एक्स्प्रेसने सल्लागार आहारतज्ज्ञ आणि प्रमाणित मधुमेह शिक्षिका कनिक्का मल्होत्रा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी याबाबत सहमती दर्शवत, “तूप निर्विवादपणे पोषक तत्वांनी समृद्ध आहे; ते अ, ड, ई आणि क जीवनसत्त्वे शरीराला पुरवतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून कमी प्रमाणात त्याचे सेवन केल्याने तेजस्वी त्वचा आणि पेशी दुरुस्त करण्यात मदत होते. त्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने काही पोषक घटक त्वचा सुंदर व शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.

तूप चांगल्या झोपेशी कसे जोडलेले आहे?

पोषणतज्ज्ञ पुढे म्हणाल्या की, तुपामुळे आम्लपित्त कमी होते, झोप सुधारते. सर्व पचनक्रिया एकमेकांशी जोडलेल्या असतात, त्यामुळे जेव्हा पचन आणि अन्नातील पोषण नीट शोषून घेतले जात नाही, तेव्हा शरीरात व्हिटॅमिन D आणि B12 ची कमतरता जाणवू शकते. एकंदरीतच झोप व्यवस्थित झाली की शरीर, मन, आरोग्य आपोआप चांगले राहते.

तुपाचा दिवा खालील समस्यांवर मात करू शकतो…

१. घोरणे
२. झोप न येण्याचा त्रास
३. अपचन, आंबट ढेकर
४. आयबीएस आणि जुनाट बद्धकोष्ठता ज्यांना दररोज फायबर किंवा गोळ्यांची आवश्यकता असते.
५. दररोज अँटासिड्स घेणाऱ्या लोकांसाठी चांगले.

शुद्ध, सेंद्रिय घरगुती तूप, ज्यामध्ये कोणतेही पदार्थ मिसळले नाहीत असे तूप निवडण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. नाक बंद पडणे, एक्झिमा, सोरायसिस किंवा श्वसनाच्या समस्यांसाठी तूप हा वैद्यकीय पर्याय नाही. पण, डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य देखरेखीखाली वापरण्यात अयोग्यसुद्धा नाही.