Daily Walking Benefits : चालणे हा चांगल्या आरोग्यासाठी एक उत्तम व्यायाम आहे. नेहमी सक्रिय आणि फिट राहण्यासाठी चालणे ही क्रिया अत्यंत फायदेशीर मानली जाते. दिवसातून किती पावले चालावीत, पहाटे ५ वाजता चालणे आरोग्यासाठी चांगले आहे का? यांसारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजवर मिळाली असतील. पण, चालण्यासंदर्भात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकाला पडतो तो म्हणजे ६० वर्षांपेक्षा जास्त वय वा कमी वय असलेल्या लोकांनी किती चालावे? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी संशोधन करणारे शास्त्रत्ज्ञ व युनायटेड स्टेट्समधील सेंट ल्यूकच्या मिड-अमेरिका हार्ट इन्स्टिट्यूटमधील फार्मसीचे डॉक्टर जेम्स डिनिकोलँटोनियो (Dr. James DiNicolantonio) सांगतात, “चालणे हे आपले आयुष्य वाचवू शकते.”

डॉ. डिनिकोलँटोनियो यांच्या मते,

  • जर तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही नियमितपणे सहा ते आठ हजार पावले चालायला हवे. त्यामुळे तुमचा लवकर मृत्यू होण्याचा धोका कमी होतो.
  • जर तुमचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही नियमितपणे आठ ते १० हजार पावले चालायला हवे. त्यामुळे तुमचा लवकर मृत्यू होण्याचा धोका कमी होतो.

हेही वाचा : लवकर उठण्यापेक्षा उशिरा उठणे चांगले? वाचा न्यूरोलॉजिस्ट काय सांगतात

याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली. दिल्ली येथील धरमशिला नारायण हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक्स विभागाचे संचालक व वरिष्ठ सल्लागार डॉ. बी. एस. मूर्ती सांगतात, “वयाचा विचार न करता, चालणे हा निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग आहे. पण, तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे की कमी यावर आधारित तज्ज्ञ तुम्हाला चालण्याबाबत थोडा वेगळा सल्ला देऊ शकतात.”

डॉ. मूर्ती सांगतात, “ज्या लोकांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांनी प्रत्येक आठवड्याला कमीत कमी १५० मिनिटे मध्यम तीव्रतेचा अॅरोबिक व्यायाम करावा. जसे की वेगाने चालणे. आठवड्यातून पाच दिवस तुम्ही ३० मिनिटे हा व्यायाम करा. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आरोग्य जपण्यास आणि वजन संतुलित ठेवण्यास मदत होते. त्याशिवाय व्यक्तीचा मूडसुद्धा सुधारतो आणि ऊर्जा वाढते.”

हेही वाचा : तुम्ही दररोज किती वेळा मिठी मारता? जाणून घ्या, मिठी मारणे हे आरोग्यासाठी कसे फायदेशीर?

“ज्या लोकांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांनी दर आठवड्याला १५० मिनिटे मध्यम तीव्रतेसह चालावे; पण स्नायूंचे आरोग्य जपण्यासाठी त्यांनी कमीत कमी दोनदा बॅलन्स आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा व्यायाम करणे गरजेचे आहे. शरीराची आरोग्य स्थिती, वैयक्तिक फिटनेस यांवर चालण्याची तीव्रता आणि किती चालावे, हे ठरविणेसुद्धा महत्त्वाचे आहे,” असा सल्लाही डॉ. मूर्ती यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरासरी किती पावले चालावीत, याविषयी डॉ. मूर्ती सांगतात की, वेळ बघून स्वत:वर ताण ओढवून घेण्यापेक्षा नियमितपणे चालण्याच्या सवयीवर लक्ष केंद्रित करा. ते सांगतात, “वय काहीही असो, चालणे हा सक्रिय व निरोगी राहण्याचा उत्तम पर्याय आहे. चालताना आरामदायी सोईस्कर असे शूज घाला. शरीर हायड्रेटेड ठेवा आणि तुम्हाला योग्य वाटेल त्या वेगाने चालण्याचा आनंद घ्या.”