Chef Ranveer Brar Tea Recipe Benefits : ‘चहाला वेळ नसली तरी वेळेला चहा हवाच’ ही म्हण चहाप्रेमींसाठी ब्रीद वाक्यच आहे, त्यामुळे चहाप्रेमी कोणत्याही वेळेला चहा घेऊ शकतात. पण, चहासुद्धा चवीला चांगला हवा, नाही का? तर याचसंबंधित प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ रणवीर ब्रार यांनी अलीकडेच रणवीर इलाहाबादियाच्या यूट्यूब पॉडकास्टवर जगातील सर्वोत्तम चहाची रेसिपी सांगितली आहे. या सर्वोत्तम चहाची रेसिपी त्यांच्या वडिलांची आहे. त्यांचे वडील कधीच रेसिपी सांगत नाहीत, पण ते दोनदा दूध आणि उन्हाळ्यात बडीशेप आणि हिवाळ्यात ज्येष्ठमध घालतात. माझ्या आजीने सांगितले की, यामुळे शरीराचे संतुलन राखण्यास मदत होते. चहा वेगवेगळ्या लोकांद्वारे वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो, जरी त्याचे घटक सारखेच असले तरीही.

याबद्दल द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली. ठाणे येथील किम्स हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉक्टर अमरीन शेख यांनीसुद्धा सहमती दिली की, अनेक भारतीय घरगुती उपचारांमागे खूप ज्ञान आहे. ज्येष्ठमध आणि बडीशेप दोन्ही ऋतूत शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात. ज्येष्ठमध उबदार असते. खोकला, सर्दी आणि घशाची जळजळ कमी करण्यासाठी अरामसुद्धा देते. तसेच हिवाळ्यात आवश्यक असलेल्या श्वसनसंस्थेला आधार मिळतो. बडीशेप थंड असते, त्यामुळे पचनास मदत होते, आम्लता कमी करण्यास मदत आणि उन्हाळ्यात शरीराला थंड आणि शांत ठेवते. अशाप्रकारे बडीशेप आणि जेष्ठमध हा हंगामी पर्याय आपल्या सगळ्यांसाठी बेस्ट ठरेल.

बडीशेप आणि जेष्ठमध चहाची चव कशी बदलतात?

आहारतज्ज्ञ डॉक्टर अमरीन शेख म्हणतात की, ज्येष्ठमध चहाला मऊ, मातीसारखा गोडवा देतात; त्यात थोडासा कॅरामेलचा स्पर्श असतो आणि त्यामुळे चहाची चव अधिक चांगली होते; तर बडीशेप चहाला हलकी, ताजी गोड चव देतो जी दुधामुळे येणारी जडपणा कमी करण्यात मदत करते.

काय लक्षात ठेवावे?

बडीशेप आणि जेष्ठमध वापरताना प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे. दोन कप चहासाठी चिमूटभर (एक चतुर्थांश चमचा) बडीशेप आणि जेष्ठमध पुरेसे आहे, कारण जास्त प्रमाणात जेष्ठमध चहाला जास्त गोड आणि जास्त प्रमाणात बडीशेप किंचित कडू बनवू शकते. उच्च रक्तदाब किंवा मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या लोकांनी जेष्ठमधाचे सेवन मर्यादित करावे, कारण वारंवार सेवन केल्याने सोडियम संतुलन बिघडू शकते. हंगामानुसार चहात केलेला हा छोटासा बदल, साध्या चहाला खास बनवतो. असा चहा शरीर आणि मन दोन्हीला पोषण देतो आणि हवामान व शरीराच्या नैसर्गिक लयीशी जुळून राहण्यास मदत करतो, असे तज्ज्ञ म्हणाले आहेत.