How To Take A Deep Sleep: तुमच्या मेकअप बॉक्समधील सर्वात महागडी गोष्ट असते ती म्हणजे पुरेशी झोप! उत्तम झोपेमुळे त्वचा, केस ते शरीराच्या एकूण एक प्रक्रियेला हातभार लागतो असे अनेक अभ्यासात सिद्ध झाले आहे. पण कितीही महत्त्वाची असली तरी झोप किंबहुना असं म्हणूया ‘पुरेशी’ झोप प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही. कधी कामाच्या निमित्ताने, तर कधी सहजच आपण झोप येत असतानाही जागे राहण्याचा हट्ट धरतो आणि मग हळूहळू या उशिराने झोपण्याची सवय होऊ लागते. आणि मग वेळेवर झोपण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी क्वचितच चांगली झोप मिळते. काहींना वेळेत झोप लागते पण मध्ये मध्ये सतत जाग येत असते. तुम्हालाही हाच त्रास होत असेल तर आज आपण अलीकडेच झालेल्या एका अभ्यासात समोर आलेली माहिती पाहणार आहोत.
कार्डिफ युनिव्हर्सिटीने गेल्या वर्षी झालेल्या अभ्यासात असे सांगितले होते की, झोपताना डोळ्यावर मास्क लावल्याने प्रकाशामुळे झोप मोड होण्याची शक्यता कमी होते. तसेच अशा प्रकारची गाढ झोप ही आपली स्मरणशक्ती व सतर्कता वाढवण्यात सुद्धा मदत करू शकते. डोळ्यावर मास्क लावल्याने खरोखरच झोपेत येणार व्यत्यय कमी होऊ शकतो का याविषयी आपण इंडियन एक्सस्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने दिलेली माहिती पाहणार आहोत.
झोपताना डोळ्यावर मास्क लावल्याने झोप सुधारते का? त्याचे फायदे काय?
डॉ सुरंजित चॅटर्जी, वरिष्ठ सल्लागार, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल, नवी दिल्ली यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “झोपताना डोळ्याच्या मास्कचा वापर केल्याने तुम्हाला सर्व प्रकारचा सभोवतालचा प्रकाश डोळ्यावर येण्यापासून थांबवता येतो. तसेच त्याचा आरामदायी मऊपणा तुम्हाला लवकर झोपायला मदत करू शकतो. रात्रीची चांगली झोप मेंदूला दिवसभरात तुम्ही जागे असताना साठवलेल्या आठवणी व नवीन माहितीला नीट एकत्रित करण्यास वेळ देते, ज्यामुळे स्मरण शक्ती आणि सतर्कता या दोन्हीमध्ये मदत होते.”
झोपेचे टप्पे किती व कोणते?
डॉ, चॅटर्जी यांनी सांगितले की, अभ्यासात असे दिसून येते की, मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी डोळ्यांची जलद हालचाल (REM) होत असतानाची झोप आणि स्लो-वेव्ह स्लीप महत्त्वपूर्ण आहे. “आरईएम झोप एखाद्या व्यक्तीला झोपल्यानंतर ७० ते ९० मिनिटांनी येते आणि ती भावनिक आरोग्यासाठी आवश्यक असते. दुसरीकडे, खोल, स्लो-वेव्ह झोप, जी ९० मिनीटांनंतरच्या कालावधीत येते ही शरीराच्या अवयवांना दुरुस्तीसाठी मदत करते. या झोपेत शरीर विश्रांतीच्या स्थितीत असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते. डोळ्यावर घातलेला मास्क झोपेच्या दोन्ही टप्प्यात घालवलेला वेळ वाढवण्यास मदत करतात. यामुळे पुढील दिवशी स्मरणशक्ती सुधारते, चांगले लक्ष केंद्रित होते आणि एकाग्रता वाढते.
डॉ चॅटर्जी यांनी नमूद केलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे झोपेच्या वेळी सतत प्रकाशाच्या संपर्कात आल्याने मेलाटोनिन, हे हार्मोन सोडण्यात शरीराला अडथळा येतो. हे हार्मोन झोपेला प्रवृत्त करते आणि झोपेचे चक्र नियंत्रित करते. डोळ्यांचे मास्क कृत्रिम किंवा नैसर्गिक प्रकाश डोळ्यांपर्यंत पोहोचण्यापासून आणि मेलाटोनिनच्या पातळीत बदल होण्यापासून थांबवतात. यामुळे मेलाटोनिन नैसर्गिकरित्या वाढू शकते आणि योग्य वेळी चांगली झोप येते. म्हणूनच डोळ्यावर मास्क लावून झोपलेल्या लोकांना जेव्हा जाग येते तेव्हा त्यांना अधिक टवटवीत आणि सतर्क वाटते.
झोपेवरील अभ्यासात काय सांगितलंय?
यूकेमधील कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी गेल्या वर्षी एक अभ्यास केला होता, ज्यामध्ये एका गटाने डोळ्यावर मास्क घालून आणि एका गटाने मास्क विना झोप घेतली होती. यानंतर सहभागींना समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवण्याशी संबंधित टास्क सोपवण्यात आला होता. मास्क घालून झोपलेल्या व्यक्तींची या टास्कमधील गती ही मास्क न घातलेल्यांच्या तुलनेने अधिक होती.
दुसरीकडे, २०१० मध्ये नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, अतिदक्षता विभागातील (ICU), रुग्ण जे सामान्यत: त्यांच्या सभोवतालची हालचाल, प्रकाश आणि आवाज यामुळे विचलित झालेले असतात ते डोळ्यावर मास्क घालून REM (रॅपिड आय मूव्हमेंट) झोपेत जास्त वेळ घालवू शकतात.
हे ही वाचा<< तुपात काळ्या मिरीची पावडर मिसळून खाल्ल्याने शरीराला काय फायदे मिळतील? रोज किती व कसे खावे मिश्रण?
मास्कशिवाय झोप कशी सुधारायची?
डॉ चॅटर्जी सल्ला देतात की, आपल्या सर्व शारीरिक हालचाली आणि कामे दिवसाच्या पूर्वार्धात पूर्ण करावीत. झोपण्याच्या काही तास आधी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा संपर्क थोडक्यात स्क्रीनसमोर घालवलेला वेळ कमी करावा. निदान झोपेच्या दोन तास आधी तरी मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही वापरू नये. एक तासभर आधी तरी अनावश्यक दिवे बंद किंवा मंद करावेत. मऊ बेड, उशी व स्वच्छ चादर चांगल्या झोपेस मदत करू शकतात. तुमच्या घराबाहेर अधिक प्रकाश असल्यास जाड पडदे वापरण्याचा पर्याय विचारात घ्या.