Curry Leaves : उत्तम आहार घेणे आपल्या निरोगी शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे. आहारात नेहमी पौष्टिक घटकांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आपण आहारातील एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाविषयी जाणून घेणार आहोत. कढीपत्ता हा अत्यंत आरोग्यास फायदेशीर असून, आपण आहारात त्याचा आवर्जून समावेश करतो. त्याशिवाय कढीपत्ता केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. मुंबईच्या हेल्दी हायच्या (Healthy High) प्रमुख न्युट्रिशनिस्ट भक्ती कपूर यांनी कढीपत्त्याचे अनेक गुणकारी फायदे सांगितले आहेत.

भक्ती कपूर सांगतात, “कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात; जे शरीरातील पेशींना खराब होण्यापासून वाचवतात. कढीपत्त्यामुळे अल्सरचा धोकासुद्धा कमी होतो. आतड्यांचे आरोग्य चांगले राहते; ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. काही अभ्यासांतून असेही समोर आले आहे की, कढीपत्ता हा शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. त्याशिवाय कढीपत्त्यामुळे कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होते. कढीपत्त्यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाण अधिक आहे; ज्यामुळे आपली त्वचा आणि केस निरोगी राहण्यास मदत होते.”

हेही वाचा : चॉकलेट्स, चीज, ​कॅफिनमुळे सतत डोके दुखते का? डाॅक्टरांनी सुचवले ‘हे’ उपाय

कपूर पुढे सांगतात, “कढीपत्त्याचा स्वाद तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकता. स्वयंपाक करताना गरम तेलात तुम्ही कढीपत्ता टाकू शकता. त्याशिवाय वाळवलेला कढीपत्ता बारीक करून, त्याचा तुम्ही मसाला करू शकता. हा मसाला जास्त दिवस टिकेल. कढीपत्त्याची चव खूप जास्त प्रभावी असल्यामुळे कढीपत्ता नेहमी प्रमाणात वापरावा.”

प्रसिद्ध न्युट्रिशनिस्ट शोनाली सबरवाल यांनीसुद्धा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून कढीपत्त्याचे काही महत्त्वाचे आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत.

शोनाली सबरवाल यांनी सांगितल्याप्रमाणे –

मळमळ जाणवणे : कढीपत्ता घ्या आणि स्वच्छ पाण्याने धुवा. कढईत तूप टाका आणि त्यात हा कढीपत्ता तळा. थंड झाल्यानंतर तळलेला कढीपत्ता तुम्ही खाऊ शकता. तुमची मळमळ दूर होण्यास मदत होईल.

श्वास घेण्यास त्रास होणे : कढीपत्ता घ्या. स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्याची पाने पाच मिनिटे चावत राहा. त्यानंतर तोंड स्वच्छ धुऊन घ्या.

अतिसार : अतिसार ही गंभीर समस्यांपैकी एक आहे. ज्यांना अतिसाराचा त्रास असेल त्यांनी कढीपत्याची पेस्ट करावी आणि ही पेस्ट बदामाच्या दुधात थोडे पाणी टाकून मिसळावी. याचे सेवन केल्याने तुम्हाला अतिसारापासून आराम मिळू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मधुमेह : मधुमेहाच्या रुग्णांनी कढीपत्त्याची चटणी खावी. ही चटणी तुम्ही कोणत्याही पदार्थांबरोबर खाऊ शकता.