तुमच्या पाहण्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जी कारणाशिवाय वारंवार उगाच चिडत असते. चिडण्याजोगे कारण असो वा नसो निमित्त मिळाले की ती व्यक्ती चिडतेच, आजूबाजूच्यांवर राग काढून त्यांना सळो की पळो करून सोडते. किंबहुना निमित्त असो वा नसो ‘चिडणे-रागावणे’ हा त्या व्यक्तीचा स्वभावच होऊन जातो. तर अशावेळी हा त्रास (जर त्या व्यक्तीला काही मानसिक त्रास नसेल तर) शरीरामध्ये वाढलेल्या पित्तप्रकोपाचा निदर्शक असू शकतो.

एकीकडे हा अकारण ‘क्रोध’ जसा शरीरामध्ये वाढलेल्या पित्तप्रकोपाचा सूचक असतो, तसाच ‘निःसहत्व’ अर्थात असहनशीलतासुद्धा शरीरामध्ये पित्तप्रकोप होत असल्याचे दर्शवते. तुमच्या आजूबाजूला अशी व्यक्ती तुम्हाला नक्कीच भेटेल जिला सहनशीलता अजिबात नसते. मनाविरुद्ध झालेल्या कोणत्याच गोष्टी त्या व्यक्तीला अजिबात खपत नाहीत, सहन होत नाहीत. असं आहे की जगामध्ये सर्वच गोष्टी काही तुमच्या मनासारख्या होत नाहीत, तुमच्या सभोवतालच्या सर्वच घटना तुम्हाला पटण्याजोग्या होतील हेसुद्धा संभवत नाही. तुम्हाला जीवनातल्या अनेक बाबींमध्ये जगाशी-सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घ्यावे लागते, न पटणाऱ्या न रुचणाऱ्या गोष्टी एका मर्यादेपर्यंत तरी सहन कराव्या लागतातच, अन्यथा जीवन जगताच येणार नाही. मात्र पित्तप्रकृती व्यक्ती, ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता आधिक्याने असते, पित्तप्रकोप झालेला असतो अशा व्यक्ती मात्र अजिबात सहनशील नसतात.

हेही वाचा – विराट कोहलीच्या आहारात ९० टक्के उकडलेले पदार्थ! तज्ज्ञ सांगतात, तेल, मसाल्याचा वापर बंद करावा का? उलट..

या असहनशील व क्रोधी-संतापी व्यक्तींच्या बरोबर विरोधी अशा कफप्रकृती व्यक्ती असतात, ज्या सहनशील-प्रेमळ-उदार मनाच्या व सहसा न चिडणाऱ्या सर्वांशी जमवून घेणाऱ्या अशा असतात. असहनशीलता व अकारण क्रोध या मानसिक लक्षणांवरुन शारीरिक विकृतीचे निदान करण्याची आयुर्वेदाची ही पद्धत अलौकिक अशीच आहे. प्रत्यक्षातही अशा व्यक्तींना पित्तशामक औषधांनी चांगला फायदा झालेला दिसतो आणि त्या-त्या वेळेस थंड पाणी-थंड दूध दिले तर त्यांचा राग शमलेला दिसतो, कारण तो स्वभावदोष किंवा मानसिक लक्षण नसून शारीरिक विकृती असते. प्रत्यक्षात हे रुग्ण आभ्यन्तर पित्तप्रकोपाने त्रस्त असतात व आयुर्वेदीय पित्तशामक उपचाराने व्यवस्थित बरे होतात.

तिखट खाल्ल्याने पित्तप्रकोप होतो?

आपण जाणून घेणार आहोत पित्तप्रकोपाची कारणे. सर्वप्रथम विचार करू अर्थातच आहाराचा, कारण आयुर्वेद कोणत्याही आजाराच्या कारणांचा अभ्यास करताना सर्वाधिक महत्त्व आहाराला देते. शरीरामध्ये पित्त (उष्णता) वाढवायला कारणीभूत होणारा आहार म्हणजे तिखट-आंबट व खारट आहार.

याठिकाणी समाजामध्ये असलेला एक गैरसमज दूर केला पाहिजे. आयुर्वेदीक डॉक्टरांकडे उपचारासाठी गेलात की आंबट-खारट बंद करावे लागते, हा तो गैरसमज. प्रत्यक्षात आंबट-खारट आहार पित्त वाढवतो व कफसुद्धा. त्यामुळे तुम्हाला पित्तविकार वा कफविकार असेल तरच आंबट-खारट सेवन नियंत्रणात आणण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तुम्हाला वातविकार त्रस्त करत असेल तर मात्र आंबट-खारट खाणे उपयुक्त सिद्ध होऊ शकते. सरसकट एकच सल्ला ढोबळपणे देण्याची पद्धत आयुर्वेदामध्ये नाही. अर्थात तुमच्या आजारामध्ये कोणता रस टाळायचा याचा निर्णय डॉक्टरांनी घ्यायचा असतो.

पित्तप्रकोपास कारण होणार्‍या तिखट-आंबट व खारट रसांपैकी तिखट रस म्हणजे तिखट चवीचे पदार्थ हे मुख्यत्वे शरीरामध्ये उष्णता वाढवण्यास कारणीभूत असतात. मुळात तिखट रस हा बाहुल्याने अग्नी व वायू या दोन महाभूतांपासून तयार झालेला आहे. अग्नी हे महाभूत उष्ण असल्यामुळे पित्त वाढवतेच, तर वायू हे तत्त्व त्या पित्ताला अधिकाधिक भडकवण्याचे काम करते. त्यामुळे तिखट रस हा एकीकडे भूक वाढवणारा, अन्नामध्ये रुची निर्माण करणारा, अन्नपचनास मदत करणारा, अन्नाच्या शोषणास मदत करणारा, कोणताही अडथळा-बंध दूर करणारा, कफाने चोंदलेले मार्ग मोकळे करणारा अशा गुणांचा आहे. मात्र या तिखट रसाचे अतिसेवन केले तर मात्र ते पित्तप्रकोप करून आरोग्याला बाधक होते.

हेही वाचा – थंडीत श्वसन विकाराचे रुग्ण वाढले; दिवाळीत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा धोका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिखटाचे अतिसेवन करणार्‍याला वारंवार तहान लागते, शरीराचे बल घटते, शुक्रक्षय होतो, मूर्च्छा येते, स्नायूंचे-नसांचे वगैरे आकुंचन होते, कंबर व पाठीच्या विविध व्यथा त्रस्त करतात. अर्थात यातल्या तहान लागण्याचा त्रास हा तिखट खाल्ल्यामुळे तत्काळ संभवतो, तर इतर समस्या दीर्घकाळ तिखटाचे सेवन अतिप्रमाणात केल्याने संभवतात. त्यामुळेच ज्यांच्या घरी स्वयंपाकामध्ये तिखटाचे प्रमाण जास्त असते, त्यांच्या घरामध्ये पित्तप्रकोपजन्य आजार बाहुल्याने पाहायला मिळतात. होतं असं की अनेकदा या मंडळींना आपल्या आजाराची कारणे आपल्याच घरामध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये लपली आहेत, हे माहीत नसते. अम्लपित्तापासून ते गुदविकारांपर्यंत (पाईल्स-फीशर्स, वगैरे) पिंपल्सपासून मूत्रदाहापर्यंत, नाकाचा घुळणा फुटण्यापासून अंगावर उठणाऱ्या पुळ्या-फोडांपर्यंत, पायाला चिऱ्या पडण्यापासून अर्धशिशीपर्यंत आणि वीर्यामधील अल्प शुक्राणुसंख्येपासून ते मासिक पाळीच्या तक्रारींपर्यंत विविध अंगांच्या वेगवेगळ्या विकारांमागे आपल्याच आहारातला तिखट रस कारणीभूत आहे, हे अनेकांना माहित नसते. त्या-त्या तक्रारींवर उपचार करण्यासाठी असे रुग्ण वेगवेगळ्या डॉक्टरांचे उंबरे झिजवत असतात. पण मूळ कारण दूर न करता केलेली चिकित्सा गुणकारी होणार कशी?