Matki Eating Benefits For Health : आपल्या रोजच्या आहारात कडधान्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. यात ऋजुता दिवेकर यांच्यापासून ते रायन फर्नांडोपर्यंत अनेक सेलिब्रिटी आहारतज्ज्ञांनी कडधान्यांच्या सेवनाचे फायदे अधोरेखित केले आहेत. यातीलच एक सूपरफूड म्हणजे मटकी. महाराष्ट्र आणि आसपासच्या प्रदेशात मटकीचे पिक घेतले जाते.
प्रोटिन्सने भरलेल्या मटकी खाण्याचे आरोग्यासही भरपूर फायदे आहेत. यावर बेंगळुरू येथील एस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्सच्या सर्व्हिसेसप्रमुख एडविना राज म्हणाल्या की, मटकी ही एक लहान तपकिरी शेंग आहे, जी फायबर आणि मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारख्या आवश्यक खनिजांनी भरलेली असते.
मटकी बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. यासह रक्तदाब नियंत्रित करून हृदयाच्या आरोग्यासही फायदेशीर असते. त्यातील हाय फायबर रक्तवाहिन्या निरोगी ठेवते आणि पचनक्रिया सुधारते, यामुळे हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही मदत होते, असे एडविना राज म्हणाल्या.
नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या मुख्य आहारतज्ञ्ज प्रतीक्षा कदम म्हणाल्या की, मटकीत फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फोलेट व्यतिरिक्त हाय फायबर असते. यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवत एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते, यासह हृदयविकाराचा धोकादेखील कमी होतो. मटकीतील अँटीऑक्सिडंट गुणधर्म ऑक्सिडेटिव्ह ताण, जळजळ कमी करत हृदयाचे कार्य सुधारते.
कोणी काळजी घ्यावी?
राज यांनी नमूद केले की, मटकीचे सेवन बहुतेक लोकांसाठी सुरक्षित आहे, ज्यामध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांचाही समावेश आहे. पण, मूत्रपिंड किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या असलेल्या लोकांनी मटकीचे सेवन करताना आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
पचन आणि पोषक तत्वांचे शोषण वाढविण्यासाठी मटकी शिजवण्यापूर्वी भिजवून मोड आणून घ्यावी. तुम्ही सॅलेड, भाजी किंवा इतर प्रकारे रोजच्या आहारात मोड आलेल्या मटकीचा समावेश करू शकता, यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी ठेऊ शकता.
बहुतेक लोक मटकीचे सेवन कोणत्याही समस्येशिवाय करू शकतात, परंतु कडधान्याची अॅलर्जी आणि आयबीएस असलेल्यांना काळजी घ्यावी लागेल, कारण मटकीमुळे पोटफुगी किंवा अस्वस्थता येऊ शकते. रात्रभर मटकी भिजवून चांगली शिजवल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि फायटिक अॅसिडसारखे अँटी-न्यूट्रिएंट्स कमी होतात, असेही कदम म्हणाल्या.
स्वयंपाकतज्ज्ञ आणि डिजिटल क्रिएटर नित्या यांच्या मते, मटकी ७-८ तास किंवा रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका. मटकीतील पाणी पूर्णपणे नितळल्यानंतर ती उबदार कोरड्या जागी झाकून किंवा एका कपड्यात बांधून ठेवा. लवकरच तिला अंकुर येण्यास सुरुवात होईल. अशाप्रकारे अंकुर आलेल्या मटकीची भाजी बनवू शकता.