monsoon virus waterborne diseases पावसाळा आता खरं तर संपायला हवा. पण यंदा तो लांबला आहे आणि महाराष्ट्रात इतरत्रही अद्याप कोसळतोच आहे. किमान २० ऑक्टोबरपर्यंत तरी तो आपली पाठ काही सोडत नाही, असे हवामान विभागाच्या इशारा आणि माहितीवरून लक्षात येते आहे. आणि पलीकडे पावसाळ्यातील आजारांनी तर संपूर्ण राज्यात ठाण मांडल्यासारखीच स्थिती आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी आलेल्या पूरामुळे तर जीवाणूजन्य आजारांमध्ये सर्वत्र वाढच झालेली दिसते आहे.
जोखमीचा काळ
पावसात धरती तृप्त होते, पण त्याचसोबत वातावरणात ओलसरपणा आणि दमटपणा वाढतो. हीच वाढलेली आर्द्रता सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करते. विशेषतः जीवाणू आर्द्र हवामानात झपाट्याने वाढू लागतात. साचलेले पाणी, अस्वच्छ परिसर आणि दूषित पाणीपुरवठा यामुळे या काळात संसर्गांचा प्रसार वेगाने वाढतो. महानगरांपासून खेड्यापाड्यांपर्यंत सर्वत्र याचा परिणाम जाणवतो; परंतु दाट लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये संक्रमण अधिक जलद गतीने पसरते. त्यामुळे पावसाळी हंगाम म्हणजेच जीवाणूजन्य संसर्गाचा उच्च-जोखमीचा काळ मानला जातो.
प्रमुख जीवाणूजन्य आजार
पावसाळ्यात खालील जीवाणूजन्य आजार सर्वसाधारणपणे आढळतात किंवा वाढण्याची शक्यता असते:
कॉलरा
कॉलरा हा व्हिब्रिओ कॉलेरी या जीवाणूमुळे होणारा आतड्याचा तीव्र संसर्ग आहे. दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे हा जीवाणू शरीरात प्रवेश करून झपाट्याने पसरतो. या रोगात अचानक होणारे तीव्र जुलाब व उलट्या यामुळे शरीरातील पाणी व इलेक्ट्रोलाइट्स (क्षारांचे संतुलन) जलद गतीने कमी होते. वेळेवर उपचार न झाल्यास शरीरातील निर्जलीकरण (Dehydration) गंभीर स्वरूप धारण करून जीवघेणा धोका निर्माण करू शकतो. स्वच्छतेचा अभाव, दूषित जलस्रोत, पूरस्थिती किंवा आपत्कालीन परिस्थितीत कॉलऱ्याचा प्रादुर्भाव विशेषतः अधिक प्रमाणात दिसून येतो. पूरपरिस्थितीमध्ये याचा धोका सर्वाधिक असतो.

टायफॉईड
टायफॉइड हा साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होणारा उदरज्वर आहे. दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे हा जीवाणू शरीरात प्रवेश करतो आणि रक्तप्रवाहात पोहोचून ताप, डोकेदुखी, अशक्तपणा व पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी निर्माण करतो. वेळेवर योग्य उपचार न घेतल्यास हा संसर्ग गंभीर स्वरूप धारण करू शकतो. पूरस्थितीमध्ये या आजाराची शक्यताही बळावते.
लेप्टोस्पायरोसिस
लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पायरा प्रजातींच्या जीवाणूमुळे होणारा संसर्ग असून तो प्रामुख्याने उंदीर किंवा इतर प्राण्यांच्या मूत्राद्वारे पसरतो. अतिवृष्टीमुळे साचलेल्या किंवा पुराच्या पाण्यात हा जीवाणू टिकून राहतो आणि जर जखमी त्वचा किंवा पायांचा त्याच्याशी संपर्क आला, तर तो मानवी शरीरात सहज प्रवेश करतो. या आजारात ताप, अंगदुखी, डोळे लाल होणे, उलट्या, पिवळसरपणा (जॉन्डिस) अशी लक्षणे दिसतात; तर गंभीर प्रसंगी यकृत व मूत्रपिंडांचे कार्य निकामी होऊ शकते. पावसाळ्यातील अस्वच्छ आणि ओलसर वातावरणामुळे या रोगाचा प्रसार झपाट्याने वाढतो. पूरपरिस्थितीत या विकाराचे रुग्ण नेहमीच वाढतात, असे लक्षात आले आहे.
गॅस्ट्रोएन्टरायटिस व अतिसार
गॅस्ट्रोएन्टरायटिस म्हणजेच आतड्याचा संसर्ग हा विविध जीवाणू, विषाणू किंवा परजीवींमुळे होऊ शकतो. पावसाळ्यात खाद्यपदार्थ आणि पिण्याचे पाणी सहज दूषित होत असल्याने ई. कोलाई , आणि शिगेला प्रजाती यांसारखे जीवाणू शरीरात प्रवेश करतात आणि त्यामुळे जंतूसंसर्गजन्य अतिसार उद्भवतो. या आजारात वारंवार जुलाब, मळमळ, उलट्या, पोटदुखी अशी लक्षणे दिसतात; तर निर्जलीकरण (Dehydration) गंभीर स्वरूप धारण करून रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. पावसाळ्यातील अस्वच्छता व दूषित पाणीपुरवठा हेच या रोगाचा प्रसार झपाट्याने वाढवणारे प्रमुख घटक ठरतात.
अतिवृष्टी आणि साथीचा वाढता धोका
अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पुराच्या परिस्थितीत सांडपाण्याचे मिश्रण आणि अस्वच्छता या कारणांनी जलजन्य आजारांचा उद्रेक झपाट्याने होतो. २००५ मधील मुंबईतील विक्रमी पाऊस व २०१८ च्या केरळ पुरानंतर लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली, तर कॉलरा व अतिसाराचेही उद्रेक दिसून आले. अभ्यासानुसार २०११ ते २०२० या कालावधीत नोंदवलेल्या ५६५ कॉलरा साथींतील बहुतांश उद्रेक मान्सून काळातच झाले. पुरामुळे सांडपाणी व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने उंदीर व इतर रोगवाहकांची संख्या वाढते आणि त्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका अधिक तीव्र होतो. म्हणूनच पुरोत्तर काळात स्थानिक प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून पाणी व अन्नाची सुरक्षितता सुनिश्चित करावी, तसेच नागरिकांनीही आवश्यक दक्षता घ्यावी.
प्रतिबंधात्मक उपाय आणि काळजी
पावसाळ्यातील जीवाणूजन्य आजार टाळण्यासाठी खालील साधे आणि प्रभावी उपाय अवलंबावेत:
- स्वच्छ पाण्याची सुविधा: पिण्याकरिता नेहमी उकळलेले किंवा निर्जंतुक केलेले पाणीच वापरा. पाण्यात जरा तुरटी टाकून गाळ खाली बसू द्या किंवा योग्य जलशुध्दीकरण यंत्र वापरा. शक्यतो फिल्टर केलेले, उकळलेले किंवा क्लोरीनने प्रक्रिया केलेले पाणीच प्या.
- अन्नाची काळजी: खाद्यपदार्थ स्वच्छ व शिजवलेले असावेत. पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला मिळणारे उघडे खाणेपिणे, कच्ची फळे व सलाड यांपासून दूर राहा. दूषित अन्न-पाण्यामुळेच बहुतांश कॉलरा, टायफॉईड इत्यादी आजार होतात, त्यामुळे “बाहेरचे चमचमीत पेक्षा घरचे स्वच्छ अन्न” हा मूलमंत्र पाळणे योग्य ठरेल.
- व्यक्तिगत आणि परिसर स्वच्छता: हातांची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची – जेवणापूर्वी आणि शौचाला जाऊन आल्यानंतर साबणाने हात धुवा. घर आणि परिसरात पाणी साचू देऊ नका; आसपास कुठे पाणी साठले असेल तर ते वेळच्यावेळी काढून टाका. कचरा साचणार नाही याची काळजी घ्या, कारण अस्वच्छ वातावरणात रोगजनक जास्त काळ जिवंत राहू शकतात.
- पूराचे किंवा साचलेले पाणी टाळावे: रस्त्यावर किंवा परिसरात पुराचे पाणी साचलेले असल्यास त्यातून जाणे टाळा. जर जाणे अपरिहार्य असेल, तर पायांचे संरक्षण करण्यासाठी रबरचे बूट वापरा आणि कोणत्याही उघड्या जखमेवर जलरोधक पट्टी बांधा. अशा पाण्यात उंदीर, जनावरांचे मृतदेह किंवा मलमूत्र मिसळलेले असण्याची शक्यता असते, ज्यामुळे त्वचेच्या संपर्कातून लेप्टोस्पायरोसिससारखे गंभीर संक्रमण होऊ शकते.
- घरगुती उपचार: पोटदुखी किंवा जुलाब झाल्यास त्वरित द्रवपान सुरू करा. शरीरातील पाणी व क्षारांची कमतरता भरून काढण्यासाठी ओआरएस, ORS (तोंडी पुनर्जलीकरण द्रावण) घ्या. ते उपलब्ध नसेल, तर उकळलेल्या स्वच्छ पाण्यात थोडे मीठ व साखर टाकून घरगुती द्रावण तयार करून सेवन करा. हलका, सहज पचणारा आहार घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या.
- लसीकरण व औषधोपचार: टायफॉईड व कॉलरासाठी प्रभावी लसी उपलब्ध असून, वैद्यकीय सल्ल्याने त्यांचे लसीकरण करून घेणे प्रतिबंधासाठी उपयुक्त ठरते. तसेच, ज्या भागांत लेप्टोस्पायरोसिसची साथ वारंवार उद्भवते, तेथे प्रतिबंधक उपाय म्हणून डॉक्टर डॉक्सीसायक्लिन सारख्या प्रतिजैविकांची कमी मात्रेची प्रोफायलेक्सिस सुचवू शकतात. मात्र कोणत्याही परिस्थितीत स्वयं-औषधोपचार टाळावा आणि केवळ तज्ज्ञांच्या वैद्यकीय मार्गदर्शनावर अवलंबून राहावे
- लक्षणे दिसताच वैद्यकीय मदत: पावसाळ्यात साधा ताप, जुलाब, त्वचेवरील जखमा किंवा डोळे लाल होणे, अंगदुखी यांसारख्या तक्रारी क्षुल्लक वाटल्या तरीही त्याकडे दुर्लक्ष करू नका. थोडीशी तब्येत बिघडली तरी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर निदान आणि योग्य उपचार झाल्यास बहुतेक जीवाणूजन्य आजार सहजपणे बरे होतात आणि गंभीर गुंतागुंती टाळता येतात.
पाऊस आनंदासोबतच आरोग्याची आव्हानेही आणतो. या काळात जीवाणूजन्य संक्रमणांचा धोका वाढतो, परंतु स्वच्छता, प्रतिबंधक उपाय आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन केल्यास तो मोठ्या प्रमाणात टाळता येतो. थोडी सावधानी पाळली, तर ‘प्रतिबंध हेच उपचारापेक्षा श्रेष्ठ’ या तत्त्वावर आपण पावसाळ्याचा आनंद सुरक्षितपणे लुटू शकतो.