केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात निपा या घातक विषाणूचा उद्रेक पाहायला मिळत आहे. केरळमध्ये निपाची बाधा होऊन दोन जणांचा मृत्यू झाला असून, आणखी चार संशयित प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे निपा विषाणू आता आरोग्य विभागासमोर नवे संकट उभे करीत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र आणि केरळ राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणांनी सावधानता बाळगत प्रतिबंधक उपाययोजनांसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी संशयितांचे नमुने गोळा करीत तपासणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV)कडे पाठवत आहेत. आता निपाचे नमुने पॉझिटिव्ह आढळ्यास चार वर्षांत देशातील ही पहिलीच घटना असेल. कारण- निपा विषाणूची शेवटची केस २०१९ मध्ये केरळमधील २३ वर्षीय विद्यार्थ्याची नोंदवली गेली होती. यावेळी विषाणूचा फैलाव फक्त एकाच केसमध्ये आढळला होता; ज्यातून तो विद्यार्थी पूर्णपणे बराही झाला होता. यावेळी विषाणूच्या जीनोमिक सिक्वेन्सिंगवरून असे आढळून आले की, केरळमध्ये २०१८ मध्ये १९ पैकी १७ जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला होता. यामुळे निपा विषाणूचा पुन्हा वाढणारा धोका लक्षात घेऊन तिरुवनंतपुरममधील इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड व्हायरॉलॉजीचे संचालक डॉ. ई. श्रीकुमार यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना यावर सविस्तर माहिती दिली आहे. निपा विषाणू नेमका आहे कसा? निपा हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे; जो प्रामुख्याने वटवाघूळ, डुक्कर, कुत्रे व घोडे या प्राण्यांना प्रभावीत करतो. हा जुनोटिक प्रकारचा विषाणू असल्याने तो संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या माणसाला संक्रमित करू शकतो. त्यानंतर माणसांकडून माणसांमध्येही त्याचा प्रसार होत आहे. निपा विषाणूची लक्षणे कोणती? १) तीव्र ताप २) डोकेदुखी ३) श्वास घेण्यास त्रास होणे. ४) खोकला आणि घसा खवखवणे. ५) अतिसार ६) उलट्या होणे. ७) स्नायू दुखणे आणि तीव्र कमजोरी ८) आजाराची तीव्रता वाढल्यास एन्सेफेलायटिससारख्या विकारांची लागण होते. ९) हा विषाणू मज्जासंस्था आणि मेंदूवरही आघात करतो केरळमधील दोन रुग्णांमुळे धोका वाढला? निपा विषाणूची गंभीर लक्षणे पाहता, संशयित प्रकरणांचा लवकर शोध घेणे आणि पुढील प्रसार रोखणे आवश्यक आहे. कारण- संसर्गानंतर रुग्णांची येणारी पॉझिटिव्ह चाचणी पाहता, मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये २००१ आणि २००७ च्या उद्रेकात 'सीएफआर'चे प्रमाण अनुक्रमे ६८ टक्के व १०० टक्के होते. केरळमध्ये २०१८ च्या उद्रेकाच्या बाबतीत, दोन संक्रमित व्यक्ती जिवंत राहण्यासह त्याचा सीएफआर ९१ टक्के होत्या. तुलना करण्यासाठी सध्या भारतात कोविड-१९ चे सीएफआर प्रमाण सुमारे १.२ टक्का आहे. निपा वेगाने पसरणारा विषाणू आहे? निपा विषाणू कोरोना आणि इन्फ्लूएन्झा विषाणूसारखा वेगाने पसरत नाही. त्यामुळे त्याच्या संसर्गाचे प्रमाणही अधिक नसते, अशी माहिती तिरुवनंतपुरममधील इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड व्हायरॉलॉजीचे संचालक डॉ. ई. श्रीकुमार यांनी दिली. यावर ते म्हणाले की, निपा विषाणूच्या संसर्गाचा पूर्वीचा इतिहास आणि विषाणूचे स्वरूप असे सूचित करते की, ते इन्फ्लूएंझा, कोविड-१९ किंवा अत्यंत संसर्गजन्य गोवर इतक्या वेगाने पसरू शकत नाही. हा रोग कसा पसरतो? फळझाडे, फळे, खजुराचा रस, ताडी यांच्यावरील विषाणू असलेल्या स्राव किंवा संक्रमित प्राण्यांशी जवळून संपर्कात आल्यास निपा विषाणू माणसामध्ये पसरू शकतो. घरात किंवा हॉस्पिटलमध्ये संक्रमित व्यक्तीच्या जवळून संपर्कात आल्यासही हा विषाणू इतर लोकांमध्ये पसरू शकते. निपाग्रस्त व्यक्तीचा मृतदेह हाताळल्याने त्याचा प्रसार होऊ शकतो. त्याशिवाय संसर्ग बंदिस्त खोली, गर्दीच्या वातावरणात हा विषाणू पसरतो. २०१८ च्या केरळच्या उद्रेकात तेच घडले होते. रुग्णालयातील रेडिओलॉजिकल चाचण्यांसाठी एका छोट्या कॉरिडॉरमध्ये इंडेक्स पेशंटपासून इतरांपर्यंत संसर्ग पसरला होता. पण, हा विषाणू हवेशीर जागेत सहसा पसरू शकत नाही, असे डॉ. श्रीकुमार म्हणाले. संसर्गाची मूलभूत यंत्रणा ज्ञात असली तरी संशोधक या प्रकरणांमध्ये प्राण्यांपासून मानवापर्यंत पसरण्याचे मुख्य स्रोत शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मूळ जाणून घेतल्याने त्यांना भविष्यातील उद्रेक रोखण्याचे मार्ग अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होऊ शकते. डॉ. श्रीकुमार यांच्या मते, २०१८ मध्ये निपाच्या उद्रेकाच्या वेळी त्याचा मुख्य स्रोत पिन-पॉइंट करण्यात आला नाहीयावेळी हा विषाणू वटवाघळांनी दूषित झालेल्या फळांमधून पसरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. झाडे आणि फळांवर दूषित फळांच्या वटवाघळांचा स्राव बांगलादेशातील प्रकरणांशी जोडला गेला आहे. स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपण काय करू शकतो? डॉ. श्रीकुमार यांच्या मते, प्रकरणांची पुष्टी झाल्यास स्थानिक उद्रेकाबाबत माहिती घेता येईल. याचा अर्थ देशाच्या इतर भागांतील लोकांना सध्या संसर्गाचा धोका नाही. पण ज्या भागात प्रकरणे आढळून आली, त्या भागातील लोकांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी आणि दोन इंडेक्स केसेसच्या इतर संपर्कात येण्यापासून स्वत:ला रोखले पाहिजे. यापूर्वी निपाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, सरकारने फळे खाण्याआधी पूर्णपणे धुऊन आणि सोलून खा, अशा खबरदारीच्या सूचना केल्या होत्या. वटवाघूळ खात असलेली फळे खाणे टाळावे. तसेच ताडीचा रस पिण्यापूर्वी थोडा गरम करावा. सरकार उद्रेक कसे व्यवस्थापित करील? दोन रुग्णांचे नमुने पुष्टीकरणासाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. तर, स्थानिक सरकारने आधीच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले आहे. या दोन्ही प्रकरणांच्या जवळच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे संसर्गाचा उद्रेक होऊ नये म्हणून हे केले जात आहे. संसर्गाच्या लक्षणांसाठी संपर्कात आलेल्या व्यक्तींचे निरीक्षण केले जाईल. त्याच वेळी यंत्रणा प्राण्यांपासून मानवामध्ये संक्रमणाचा स्रोत शोधण्यास सुरुवात करतील. डॉ. श्रीकुमार म्हणाले की, दोन प्रकरणांचा संपूर्ण इतिहास जाणून घेत, त्यांना संसर्ग कसा झाला हे समजून घेता येईल; शिवाय बरीच माहिती समोर येईल. निपा विषाणूचे निदान कसे केले जाते? रिअल-टाइम पॉलिमरेझ चेन रिॲक्शन (RT-PCR) चाचणी नाकातील शेष्मल किंवा घशातील स्वॅब्स, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड (CSF), मूत्र व रक्ताच्या नमुन्यांद्वारे निपा व्हायरसची पुष्टी केली जाते. एलिसा चाचणीद्वारे काही प्रतिपिंडांसाठी तुमच्या रक्ताची चाचणी करून डॉक्टर संसर्गाचे नंतरच्या टप्प्यात किंवा पुनर्प्राप्तीनंतर निदान करू शकतात. निपा विषाणूच्या संसर्गावर उपचार कसा केला जातो? निपा विषाणूवर कोणत्याही प्रकारचे अँटीव्हायरल औषध नाही. त्यामुळे विषाणूचे लक्षणात्मक व्यवस्थापन करण्यासाठी गरम पाणी पिणे, विश्रांती घेणे, मळमळ किंवा उलट्या नियंत्रित करण्यासाठी औषधे घेणे, श्वासोच्छ्वासासाठी इनहेलर आणि नेब्युलायझरचा वापर करणे, लक्षणे गंभीर असल्यास डॉक्टरांच्या सल्लानुसार औषधे घेणे यांचा समावेश आहे. पण, या विषाणूवर आता संशोधक मोनोक्लोनल अँटीबॉडी उपचारपद्धतीचा वापर करता येईल का याचा अभ्यास करीत आहेत. निपा विषाणूच्या संसर्गावर कोणती प्रभावी उपचारपद्धती आहे का? निपा विषाणूचा संसर्ग बरा करण्यासाठी कोणतीही लस किंवा औषधे नाहीत. निपा विषाणूचा इतिहास काय आहे? शेजारील बांगलादेशाप्रमाणे भारतात निपाचा प्रादुर्भाव फारसा सामान्य नाही; ज्यात २००१ मध्ये पहिल्या प्रकरणापासून जवळजवळ दरवर्षी विविध प्रकरणे आढळून येत आहेत. बांगलादेशमध्ये निपा विषाणूने हंगामी आजाराचे रूप धारण केले आहे, डिसेंबर ते मेदरम्यान लोकांना याचा संसर्ग होतो. बांगलादेशाच्या शेजारी असलेल्या पश्चिम बंगालमध्ये २००१ मध्ये पहिला रुग्ण आढळून आला असून, भारतात आतापर्यंत चार वेगवेगळे उद्रेक झाले आहेत. निपाचा एकदा संसर्ग झाल्यानंतर मृत्यूची शक्यता खूप जास्त असते.