फळे ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. म्हणून डॉक्टरदेखील आपली फळे खाण्याचा सल्ला देतात. त्यात सफरचंद शरीरासाठी खूपच चांगले असल्याचे मानले जाते. पण, सफरचंदामध्येही आता दोन प्रकार पाहायला मिळतात. एक म्हणजे हिरवा सफरचंद आणि दुसरा म्हणजे थोडा लाल, गुलाबी सफरचंद. हल्ली बाजारात आपल्या लाल, गुलाबी सफरचंदांबरोबर हिरवी सफरचंदेही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. काही जण हिरव्या सफरचंदाची चव जाणून घेण्यासाठी म्हणून ती खरेदी करतात. तुम्हाला माहीत आहे का की, हिरवी सफरचंदेही लाल व गुलाबी सफरचंदांइतकीच आरोग्यदायी असतात; पण चवीला किंचित आंबट व गोड असतात. याच सफरचंदांचे इतर अनेक फायदे सिग्नस लक्ष्मी हॉस्पिटलचे सल्लागार जनरल फिजिशियन डॉ. संजय सिंग यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले आहेत.

हिवाळ्यात हिरवे सफरचंद खाणे आरोग्यदायी मानले जाते. त्यामुळे हिरव्या सफरचंदांचे आरोग्यदायी फायदे आणि ते खाण्यापूर्वी काय खबरदारी घेणे आवश्यक आहे ते आपण जाणून घेऊ.

डॉ. सिंग यांनी सांगितलेले १०० ग्रॅम हिरव्या सफरचंदातील पौष्टिक घटक खालीलप्रमाणे :

  • कॅलरीज : 52 kcal
  • कर्बोदके : 14 ग्रॅम
  • फायबर : 2.7 ग्रॅम
  • साखर : 10 ग्रॅम
  • प्रथिने: 0.3 ग्रॅम
  • चरबी : 0.2 ग्रॅम
  • व्हिटॅमिन सी
  • व्हिटॅमिन ए
  • व्हिटॅमिन के
  • व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स (B1, B2 सह B3 व B5)
  • कॅल्शियम
  • फॉस्फरस
  • लोह
  • पोटॅशियम
  • मॅग्नेशियम
  • तांबे
  • मॅंगनीज
  • अँटिऑक्सिडंट्स

हिरवे सफरचंद खाण्याचे आरोग्यदायी फायदे

१) रोगप्रतिकारशक्तीत वाढ : व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेले हे फळ रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि अँटिऑक्सिडंट्स प्रदान करते.

२) रक्तातील साखरेवर नियंत्रण : यातील फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते.

३) पचनकार्यात सुधारणा : यातील फायबर पचनकार्य सुधारण्यास मदत करते; ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

४) डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम : यातील व्हिटॅमिन ए हे डोळ्यासंबंधित विविध आजारांपासून संरक्षण करण्यास दूर ठेवण्यास मदत करते.

५) हृदयाच्या कार्यास चालना : यातील पोटॅशियम हृदयाच्या कार्यास चालना देते आणि रक्तदाब नियंत्रित करते.

६) वजना नियंत्रणात ठेवते : कॅलरी कमी; पण फायबरचे प्रमाण जास्त यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

मधुमेही हिरवे सफरचंद खाऊ शकतात का?

डॉ. सिंग यांच्या म्हणण्यानुसार, हिरवे सफरचंद मधुमेह असलेले रुग्णही खाऊ शकतात. त्यात असलेले साखरेचे मध्यम प्रमाण आणि फायबर रक्तातील साखरेचे नियंत्रण चांगले ठेवण्यास हातभार लावू शकतात. परंतु, मधुमेह असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच त्याचे सेवन करावे.

गर्भवती महिलांसाठी ते फायदेशीर आहे का?

हिरवे सफरचंद गर्भधारणेदरम्यान खाणेही फायदेशीर असते. त्यातील आवश्यक जीवनसत्त्वे आणि फायबर शरीरासाठी उत्तम मानले जातात.

हिरवी सफरचंद खाण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची खबरदारी आवश्यक

डॉ. सिंग यांनी हिरवे सफरचंद खाण्यापूर्वी काही आवश्यक खबरदारी गरजेचे असल्याचे सूचित केले आहे.

साखरेचे प्रमाण : इतर काही फळांपेक्षा यात साखरेचे प्रमाण कमी असले तरी ते खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा ते प्रमाणात खावे.

अतिसेवन टाळा : हिरव्या सफरचंदाच्या अतिसेवनामुळे पचनास त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्याचे योग्य प्रमाणातच सेवन करावे, असा सल्ला दिला जातो.

‘हे’ गैरसमज करा दूर

हिरवे सफरचंद जादूप्रमाणे मधुमेह बरा करू शकते, असा काहींचा गैरसमज आहे. मधुमेहाचे रुग्ण याचे सेवन करू शकत असले तरी त्यामुळे मधुमेह बरा होऊ शकत नाही.

हिरव्या सफरचंदाच्या सेवनाने कर्करोग बरा होऊ शकतो हा गैरसमज आहे. त्यातील अँटिऑक्सिडंट्स कर्करोगाचा धोका कमी करू शकतात; परंतु त्यामुळे कर्करोग बरा होत नाही.

Story img Loader