Symptoms of leaking urine in men: आजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. या सगळ्याची प्रमुख कारणं म्हणजे खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलती जीवनशैली. वाढत्या वयानुसार शरीर कमकुवत होते आणि अनेक आजारांना बळी पडते. तसंच लघवीच्या निरीक्षणावरूनही काही समस्या लक्षात येतात. काही लोकांना वारंवार लघवी होते की काय असे भास होतात. काहींना खूप लवकर लघवी होते किंवा काहींचे लघवीचे प्रमाण कमी होते. या समस्यांना अनेकदा वृद्धत्वाचा नैसर्गिक परिणाम असल्याचे म्हटले जाते आणि त्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते.

जयपूर इथल्या मणिपाल हॉस्पिटलमधील युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. डी. आर. धवन यांनी दि इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, पुरूष अनेकदा किरकोळ आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करतात. अनेक पुरूषांनी लघवी केल्यानंतरही त्यांचे लघवीचे काही थेंब पडतात. याकडे ते बऱ्याचदा दुर्लक्ष करतात. असे केल्यास यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. शिवाय लघवीतील हे बदल सौम्य प्रोस्टेटिक हायपरप्लासियामुळे असू शकतात. या आजारामुळे प्रोस्टेट ग्रंथी मोठी होते आणि परिणामी मूत्रमार्गात समस्या निर्माण होतात.

नेमकी ही समस्या काय आहे?

जर लघवी केल्यानंतरसुद्धा काही थेंब पडत राहिले तर याला वैद्यकीय भाषेत पोस्ट-व्हॉइड ड्रिब्लिंग म्हणतात. वयानुसार हे होण्याची शक्यता वाढते. असं असताना जर हा प्रकार कायम होत असेल तर तो प्रोस्टेट किंवा मूत्रमार्गाच्या समस्येचे लक्षण असू शकतो.

वाढत्या वयानुसार धोकाही वाढतो

भारतातील वृद्धत्वाबाबतच्या अभ्यासानुसार, ४५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या १.४९ टक्के पुरूषांचा बीपीएच आहे. या अभ्यासात बीपीएच (प्रोस्टेटिक हायपरप्लासिया) आणि नैराश्याच्या लक्षणांमधील एक मजबूत संबंधदेखील उघड झाला. म्हणूनच आरोग्यावर त्याचा परिणाम मूत्र समस्यांपेक्षाही जास्त आणि अधिक आहे.

कमकुवत पेल्विक स्नायू

पेल्विक स्नायू मूत्राशय आणि मूत्रमार्ग नियंत्रित करतात. जर हे स्नायू कमकुवत झाले तर लघवी केल्यानंतरही काही थेंब लघवी आपोआप गळू शकते. हे साधारणपणे जास्त वेळ बसून राहणाऱ्या किंवा व्यायामाचा अभाव असलेल्या पुरूषांमध्ये दिसून येते.

लक्षणांकडे दुर्लक्ष नको

जर तुम्हाला वारंवार लघवी होणे, लघवी करताना वेदना होणे, जळजळ होणे, दुर्गंधीयुक्त लघवी किंवा अशक्तपणा यासारख्या इतर समस्या येत असतील तर ते यूटीआय, प्रोस्टेटायटीस किंवा मूत्राशयाच्या बिघाडाचे लक्षण असू शकते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. जर वेळीच तपासणी केली नाही तर ही समस्या गंभीर होऊ शकते आणि याचा मूत्रपिंडावरही परिणाम होऊ शकतो.

यावर उपचार काय?

पेल्विक स्नायूंसाठी व्यायाम हा मूत्र गळतीपासून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतात. हे व्यायाम लघवी थांबवण्यासारख्या हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या स्नायूंना बळकटी देतात.

पूर्ण लघवी करा

लघवी करताना घाई करू नका. लघवी झाल्यानंतर काही सेकंद थांबा आणि तुमचे मूत्राशय पूर्णपणे रिकामे करण्यासाठी थोडेसे खाली वाकून घ्या.

पुरेसे पाणी प्या

पाणी कमी प्यायल्याने लघवी जास्त प्रमाणात सांद्रित म्हणजेच घट्ट होऊ शकते. त्यामुळे संसर्ग आणि जळजळ होण्याचा धोका वाढतो. दररोज किमान अडीच ते तीन लिटर पाणी प्या.