पित्त म्हणजे यकृतामध्ये तयार होणारे पित्त किंवा क्वचित तोंडामध्ये येणारे आंबट पित्त वा उलटीवाटे पडणारे पित्त असा अर्थ नाही. निसर्गातील विविध घटकांना शरीरासाठी सात्म्य (अनुकूल) बनवणारे अर्थात शरीरामध्ये ट्रान्स्फॉर्मेशन घडविणारे, बदल (conversion) घडविणारे, शरीराला उर्जा(energy) देणारे, उष्मा (heat) पुरवणारे उष्ण तत्त्व म्हणजे पित्त, असा व्यापक अर्थ आयुर्वेदाला अपेक्षित आहे. हे पित्त सर्व शरीरामध्ये-प्रत्येक शरीरकोषामध्ये असते.

आणखी वाचा: Health Special: लहान मुलांच्या आयुष्याचा रिअ‍ॅलिटी शो होतो तेव्हा

पित्ताचा संचय होणे म्हणजे पित्त जमणे. शरीरामध्ये आमाशय, क्लोम (स्वादुपिंड), रक्त, लसिका, घाम ही पित्ताची मुख्य स्थाने आहेत, त्याठिकाणी (त्यांच्यामध्ये) पित्त जमणे म्हणजे पित्तसंचय. पावसाळ्यात (वर्षा ऋतूमध्ये) जमलेले पित्त त्यापुढच्या शरद ऋतूमध्ये पित्तविकारांना कारणीभूत ठरते. इथे पावसाळ्यामध्ये पित्ताचा संचय का होतो, ते समजून घेऊ.

आणखी वाचा: Dengue Alert: रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्यास पपई किंवा गुळवेलीचा रस पिताय? मग जरा थांबा, वाचा डॉक्टर काय सांगतात…

पावसाळ्यातल्या पहिल्या दोन महिन्यातले पाणी हे अम्लविपाकी असते अर्थात आंबट परिणाम करणारे असते. या अम्लविपाकी पाण्यावर पोसलेल्या वनस्पतीसुद्धा अम्लविपाकी गुणांच्या बनतात. स्वाभाविकच पावसाळ्यात ते पाणी पिऊन, त्या वनस्पती (धान्य,कडधान्ये,भाज्या,फ़ळे,वगैरे) खाऊन आणि त्या पाण्यावर पोसलेल्या प्राण्यांचे मांस खाऊन मानवाच्या शरीरावर सुद्धा त्या अम्लविपाकाचा परिणाम होतो. म्हणजे काय होते? तर शरीरावर आंबट परिणाम होतो, संपूर्ण शरीराच्या कोषांमध्ये आंबटपणा वाढतो आणि आंबटाने पित्त वाढते, हे तर आपण जाणतोच. त्याला जोड मिळते पावसाळ्यातल्या अग्निमांद्याची. अग्नी मंद झालेला असताना (भूक व पचनशक्ती मंदावलेली असताना) शरीरावर आंबटाचा प्रभाव अधिक परिणामकारी होतो आणि पित्तसंचय होतो.

आणखी वाचा: Health Spcial: ‘हा’ आहे हॅपी डाएटिंगचा फंडा

मात्र इथे पित्त केवळ स्वतःच्या स्थानांमध्येच साचते, असा पित्तसंचयाचा अर्थ आहे. या अवस्थेमध्ये पित्त स्वतःच्या स्थानांमध्येच वाढत असते, साचते. ते इतक्या प्रमाणात वाढत नाही की शरीरभर पसरून रोग निर्माण करेल. हे वाढलेले पित्त यापुढच्या ऋतूमध्ये म्हणजे शरद ऋतूमध्ये प्रकुपित होते आणि विविध उष्णतेसंबंधित आजारांना (पित्तविकारांना) कारणीभूत ठरते.

अशाप्रकारे पित्तप्रकोप शरदात होत असला तरी त्याची सुरुवात काही वेळा, काही व्यक्तींमध्ये (विशेषतः वात-पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये) वर्षा ऋतूच्या शेवटी शेवटी झालेली असते. पावसाळ्याच्या शेवटी- शेवटी जेव्हा पावसाचे प्रमाण कमी होत जाते आणि उन्हाचा जोर वाढू लागतो तेव्हाच शरीरात जमत चाललेल्या पित्ताचा प्रकोप सुरु होतो. प्रत्यक्षातही शरद ऋतू सुरु होण्यापूर्वीच पावसाळ्याच्या अंती पित्तप्रकोपामुळे होणार्‍या त्रासाचे रुग्ण उपचारासाठी वैद्य-डॉक्टरांकडे येऊ लागतात. जसे- तोंड येणे, अंगावर पित्ताच्या गांधी उठणे, लालसर पुळ्या येणे, अर्धशिशीचा त्रास होणे, अम्लपित्ताचा त्रास होणे, गुदमार्गावाटे रक्त पडणे वगैरे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाळ्यात पाणी अम्लविपाकी होते व त्याने शरीरामध्ये पित्त वाढते, याचा काय अर्थ काय? पावसाळ्याच्या पहिल्या काही दिवसांच्या पाण्यामध्ये हायड्रोजन आयन्सचे प्रमाण इतर ऋतूंच्या तुलनेमध्ये अधिक होत असावे का, जे पाणी वनस्पतीमध्ये वा प्राणी-शरीरामध्ये गेल्यावर हायड्रोजन आयन्स वाढवत असावे. पावसाळ्यात शरीरामध्ये अधिक मात्रेमध्ये जाणारे हे हायड्रोजन आयन्स शरीरामधील पित्त वाढवत असावेत, असा माझा कयास आहे. या विषयावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. पावसाळ्यात पाण्याच्या मूलभूत गुणामध्येच बदल होतो, जो विकृतींना आमंत्रण देतो, या पूर्वजांच्या निरिक्षणाकडे संशोधक दृष्टीने पाहायला हवे.