Ram Kapoor Weight Loss Secret : अभिनेता राम कपूरने १८ महिन्यांत ५५ किलोपेक्षा जास्त वजन कमी केले. त्याच्यातील या बदलामुळे तो सध्या चांगलाच चर्चेत आहे. अलीकडेच राम कपूर फराह खानच्या कुकिंग शोमध्ये दिसला. फराहबरोबर गप्पा मारताना त्याने त्याच्या डाएटविषयी सांगितले. जेव्हा फराहचे लक्ष त्याच्या मोठ्या कॉफीच्या कपकडे गेले तेव्हा ती म्हणाली, “हा कप नाही, तर ही बादली आहे.” त्यावर राम म्हणाला, “मी दिवसातून दोनदा जेवण करतो. याव्यतिरिक्त मला चहा-कॉफी पिण्याची परवानगी दिली आहे”

राम कपूरच्या डाएटबाबत दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली

आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा सांगतात, “हा दृष्टिकोन इंटरमेडिएट फास्ट (अधूनमधून उपवास) करण्याचे एक उदाहरण आहे. ठराविक वेळ आणि मर्यादित आहाराचा हा एक प्रकार आहे, ज्यामध्ये व्यक्ती एका ठराविक वेळी जेवते. उदा. सकाळी १०:३०-११:०० च्या सुमारास जेवण करायचे. त्यानंतर संध्याकाळी ६:३० च्या सुमारास जेवण करायचे.

मल्होत्रा सांगतात की, ही पद्धत वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, चयापचय क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यासाठी महत्त्वाची आहे; जी विशेषत: डायबेटीज आणि प्री-डायबेटीज असलेल्या लोकांशी संबंधित आहे

आहाराच्या दृष्टिकोन लक्षात घेऊन मल्होत्रा ​​सांगतात की, या डाएटच्या पद्धतीमुळे एकूण कॅलरीजचे सेवन कमी होण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे अमर्याद स्नॅक खाणे आणि रात्री उशिरापर्यंत जेवण करणे कमी होऊ शकते. कारण- या वाईट सवयींमुळे वजन वाढू शकते आणि चयापचयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

राम कपूरच्या वजन कमी करण्याचे रहस्य दिवसातून फक्त दोन वेळा जेवणाच्या गुणवत्तेत आणि संतुलनात आहे. हे जेवण पोषक घटकांनी भरलेले असावे. ऊर्जा पुरविणारे व स्नायू मजबूत करणारे असावे आणि एकूण आरोग्यासाठी प्रोटीन्स, चांगले फॅट्स, फायबर व पोषक घटक प्रदान करणारे असावे.

काय लक्षात ठेवावे?

हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, ही पद्धत काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते; पण काही लोकांसाठी योग्य असू शकत नाही. मल्होत्रा ​​यांनी सांगितले आहे की, जर ही पद्धत व्यवस्थितपणे स्वीकारली गेली नाही, तर काही लोकांना जास्त भूक लागणे, जेवणाच्या वेळी जास्त खाणे किंवा त्यांची चयापचय क्रिया मंदावण्याची शक्यता असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मल्होत्रा पुढे सांगतात, “मधुमेहासारख्या विशिष्ट आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांनी अशा गोष्टीचा अवलंब करण्यापूर्वी रक्तातील साखरेचे निरीक्षण करणे आणि आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी सातत्य राखणे आणि मानसिकता बदलणे अत्यंत गरजेचे आहे.”