How Breakfast Time Affects Diabetes: तुम्ही जे खाता त्यानुसार तुमचे शरीर घडत असते हे आपण सर्व जाणतो पण त्याबरोबरीनेच तुमची कोणत्या वेळी व कसे खाता यावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतात. विशेषतः जर आपल्याला मधुमेहाचा त्रास असेल तर रक्तातील साखरेची पातळी ठराविक स्तरावर ठेवण्यासाठी आपल्याला खाण्याच्या पथ्यासह खाण्याची वेळ सुद्धा नीट निवडणे आवश्यक आहे. डॉ व्ही मोहन, अध्यक्ष, डॉ मोहन डायबिटीज स्पेशॅलिटी सेंटर, यांनी बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ (ISGlobal) च्या अभ्यासावरून मांडलेल्या निरीक्षणातून यासंदर्भात तपशीलवार माहिती जाणून घेऊया…
डायबिटीजवरील अभ्यास काय सुचवतो?
तर या अभ्यासात असे म्हटले आहे की, सकाळी ९ नंतर नाश्ता केल्याने सकाळी ८ वाजेपूर्वी नाश्ता करणाऱ्यांच्या तुलनेत टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका ५९ टक्क्यांनी वाढतो. फ्रेंच गटातील १ लाखाहून अधिक सहभागींवर झालेल्या अभ्यासाचा हा मुख्य निष्कर्ष आहे. इतर अभ्यासांद्वारे, विशेषतः भारतीय लोकसंख्येमध्ये यासंदर्भात अजून सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे मात्र सध्या समोर आलेल्या माहितीनुसार काही गोष्टी जाणून घेणे सुद्धा आवश्यक आहे.
शरीराची रचना कशी कार्य करते?
पहाटेपासून ते मध्य सकाळपर्यंतचा वेळ हा आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा असतो. कारण रात्री काही प्रमाणात आराम घेतल्यावर रक्तातील ग्लुकोजची पातळी पहाटे ४ वाजता सर्वात कमी होत असल्याचे यापूर्वी समोर आले आहे. याशिवाय कॉर्टिसोलची पातळी, रक्तातील साखरेचे उत्सर्जन नियंत्रित करणारे हार्मोन्स तसेच फॅट्स, प्रोटिन्स आणि कार्ब्स याचे विभाजन करून तुमच्या चयापचयासाठी कसे वापरायचे हे ठरवणारे हार्मोन्स सुद्धा या वेळेत वाढू लागतात. पहाटे ४ ते सकाळी ९ पर्यंत ही पातळी सर्वोच्च असते.
नाश्त्याची योग्य वेळ काय?
कॉर्टिसॉल तुमच्या यकृताला ग्लुकोज तयार करण्यासाठी सिग्नल देते जेणेकरून तुम्हाला दिवसभर पुरेशी ऊर्जा मिळते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे जर तुम्ही सकाळी ९ नंतर नाश्ता केल्यावर कॉर्टिसोलची पातळी नैसर्गिकरित्या खाली येऊ लागते व परिणामी तुमच्या रक्तातील साखरेची पातळीची वाढ थांबण्यास मदत होते. त्यामुळेच उठल्यानंतर लगेच नाश्ता करू नये कारण यावेळी अगोदरच साखरेची पातळी उच्च असताना त्यात खाल्ल्यांनंतर साखर पुन्हा वाढू शकते.
नाश्त्यात काय खावे?
आता आणखीन एक महत्त्वाचा व आपल्यालाही ठाऊक असणारा मुद्दा म्हणते तुम्ही नाश्त्यात काय खाता? तुमच्या नाश्त्याच्या ताटात नेहमी प्रथिने आणि निरोगी फॅट्स असायला हवेत शक्यतो कर्बोदके कमी करा. फायबर समृद्ध फळांनी कार्ब्सला पर्याय देऊ शकता. अंडी/अंड्यांचा पांढरा भाग/चण्याच्या पीठाने बनवलेला पोळा हे नाश्त्याचे पदार्थ भारतीय शरीराला साजेसे ठरतात. यामुळे मुख्यतः पोट भरल्याची भावना निर्माण होते, या पदार्थांचे पचन संथ गतीने होत असल्याने रक्तातील साखरेचे उत्सर्जन सुद्धा कमी होते, प्रथिने-फायबर-हेल्दी फॅट ब्रेकफास्टमुळे तुमचे वारंवार खाण्याचे प्रमाण सुद्धा कमी होऊ शकते.
रात्रीच्या जेवणाशी ब्लड शुगरचा संबंध आहे का?
संशोधकांना असेही आढळून आले की, रात्रीचे जेवण उशिराने केल्यास (रात्री 10 नंतर) डायबिटीजचा धोका अधिक असतो. जर एखाद्याने रात्रीचे जेवण उशिरा केले तर त्या जेवणाचा ऊर्जानिर्मितीसाठी उपयोग करण्यास उशीर होतो. बर्याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर तुम्ही रात्रीचे जेवण उशिरा केले तर, न वापरलेल्या कॅलरींचे फॅटमध्ये रूपांतर होते आणि ते यकृतामध्ये साठवले जाते. हे अर्थातच, नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग किंवा NAFLD ला कारण ठरते , ज्यामुळे इन्सुलिन प्रतिकार होतो. काहीवेळा, उशीरा जेवण हे तुम्हाला सकाळी जड वाटण्याचे कारण असते. यामुळेच अनेकजण नाश्ता वगळतात परिणामि ब्लड शुगर बूस्ट होते.
हे ही वाचा<< Eye Flu: डोळ्यांची साथ राज्यभर पसरली; खालीलपैकी एकही लक्षण दिसताच करा ‘हे’ घरगुती आयुर्वेदिक उपाय
अलीकडे क्रोनो-न्यूट्रिशन हा टाईप २ मधुमेहाच्या व्यवस्थापनात महत्त्वाचा दृष्टिकोन म्हणून उदयास येत आहे. आहारामध्ये हे घटक तीन खांबांवर अवलंबून असतात – जेवणाच्या वेळा, सर्कॅडियन लय आणि चयापचय . प्राणी आणि मानवी संशोधनाच्या पुराव्यांवरून असे दिसून आले आहे की सर्काडियन व्यत्ययामुळे चयापचय, रक्तातील साखरेची पातळी व विशेषतः इंसुलिन कार्यक्षमतेवर परिणाम होतो.