Nutritional Values Of Sprouts: मोड आलेली कडधान्य आरोग्यासाठी खूप पौष्टिक मानली जातात. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने ते जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. डॉ. कॅंडे यांनी एका संशोधनाचा उल्लेख केला आहे, ज्यावरून असे दिसून आले आहे की कडधान्य शरीरात ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ म्हणजेच एचडीएल (हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन) पातळी वाढविण्यासदेखील मदत करू शकतात, जे हृदयाचे आरोग्य वाढवते आणि रक्तदाब राखते.
पण, मोड आलेले कडधान्य खाण्याची योग्य पद्धत कोणती?
डॉ. कॅंडे यांच्या मते, उकडलेले कडधान्य खाणे फायदेशीर आहे, त्याची अनेक कारणे आहेत. खाण्यापूर्वी मोड आलेले कडधान्य वाफवून किंवा शिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. याचे पहिले कारण म्हणजे ते साल्मोनेला आणि ई. कोलाईसारख्या सूक्ष्मजंतूंनी दूषित असू शकते.
डॉ. कॅंडे म्हणतात की, अंकुरलेली कडधान्य खाण्यापूर्वी उकळून किंवा शिजवून खाल्ल्याने त्यांची पचनक्षमता वाढण्यास मदत होते. कच्चे कडधान्य आपल्या शरीरासाठी पचायला कठीण असतात. शिवाय ते आपल्या शरीराद्वारे सहज शोषले जात नाहीत.
ज्या लोकांचे आतडे संवेदनशील आणि कमकुवत असतात आणि त्यामुळे पोट फुगणे, पोटदुखी किंवा अतिसार होतो, अशा लोकांमध्ये ते पचण्यास कठीण असतात. “कडधान्य शिजवल्याने अन्न विषबाधा टाळण्यास आणि पचनक्षमता सुधारण्यास मदत होईल. तथापि, उष्णतेच्या संपर्कात आल्याने व्हिटॅमिन सीसारख्या काही पोषक घटकांचे नुकसानदेखील होईल,” असे डॉ. कॅंडे स्पष्ट करतात.
डॉक्टर कॅंडे यांच्या मते, गर्भवती महिला, लहान मुलं आणि वृद्धांनी कच्च्या कडधान्यांच्या सेवनाबाबत अधिक काळजी घेतली पाहिजे, कारण कच्च्या कडधान्यांमुळे होणारी अन्न विषबाधा, उलट्या आणि अतिसाराची लक्षणे त्यांच्या शरीरात अनेक आरोग्य समस्या निर्माण करू शकतात.