Iron Deficiency In Body: लोहाची कमतरता ही सामान्य वाटत असली तरी एक गंभीर समस्या आहे. यामुळे शरीराच्या ऊतींमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होण्यासह अशक्तपणाचा त्रास वाढीस लागतो. मानवी शरीर रचनेनुसार, शरीर अन्नातून लोह शोषून घेते. नंतर ट्रान्सफरिन नावाच्या प्रोटीनसह लोह यकृतापर्यंत पोहोचते, जिथे ते फेरीटिन म्हणून साठवले जाते व पुढे नवीन लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यकतेनुसार सोडले जाते. त्यामुळे लोहाचे शरीरात कमी शोषण होणे हे थेट तुमच्या रक्तपेशींच्या संख्येवर परिणाम करू शकते. आज आपण लोह कमतरता कशी होते इथपासून ते तुमच्याही शरीरात लोह कमी आहे का हे कसे ओळखावे या सगळ्या बाबींची माहिती घेणार आहोत. याशिवाय अपोलो हॉस्पिटल येथील डॉ. सुरंजित चॅटर्जी यांनी शरीरात लोह शोषण वाढण्यासाठी सांगितलेले काही मार्गही जाणून घेऊया..
शरीरात लोह कमी आहे हे कसे ओळखाल?
रक्त तपासणी: लोहाच्या कमतरतेचे निदान करण्याचा सर्वात अचूक मार्ग म्हणजे रक्त तपासणी. यातून हिमोग्लोबिन, सीरम फेरीटिन, ट्रान्सफरिन सॅचुरेशन आणि मीन कॉर्पस्क्युलर व्हॉल्यूम (MCV) चे स्तर मोजले जातात. कमी फेरीटिन आणि ट्रान्सफरीन हे कमी हिमोग्लोबिन पातळी, लोहाची कमतरता अशक्तपणा दर्शवते. MCV लाल रक्तपेशींच्या आकाराविषयी माहिती प्रदान करते, ज्यामुळे लोहाच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या अॅनिमियाचे निदान करता येते.
क्लिनिकल लक्षणे: रक्त चाचण्या सर्वात सोपा मार्ग असला तरी काही चिन्हे आणि लक्षणे लोहाच्या कमतरतेची शक्यता दर्शवू शकतात. थकवा, अशक्तपणा, त्वचा पांढरी पिवळसर दिसणे, ठिसूळ नखे, पायदुखी आणि वारंवार संक्रमण ही लोहाच्या कमतरतेची लक्षणे आहेत.
लोहाचे शोषण कमी कशामुळे होते?
1)पालेभाज्या आणि शेंगा यांसारख्या लोहयुक्त पदार्थांचे आहारात अपुरे सेवन
2) गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रक्तस्त्राव, मासिक पाळी आणि गर्भधारणा यासारख्या परिस्थितीमुळे लोहाची गरज वाढू शकते आणि संभाव्य कमतरता होऊ शकते. काही गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर, जसे की सेलिआक डिसीज लोहाचे शोषण कमी करू शकतात, जोखीम वाढवू शकतात.
3) शरीरात रक्त कमी होणे- सामान्यतः पेप्टिक अल्सर, हायटल हर्निया, कोलन पॉलीप किंवा कोलोरेक्टल कर्करोग यांसारख्या स्थितींमुळे लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होऊ शकतो.
4) काहीवेळा पेन किलर्सच्या नियमित वापरामुळे अशास्थिती उद्भवू शकते.
5)·जुने आजार, शस्त्रक्रिया यामुळे रक्त कमी होऊ शकते व लोहाचे शोषण कमी होते.
लोहाचे शोषण शरीरात वाढवण्यासाठी काय करावे?
लोह समृध्द अन्न: लोहयुक्त पदार्थांचा समावेश असलेल्या संतुलित आहाराचे सेवन करणे महत्वाचे आहे. अंडी, मासे यासारखे हेम लोह समृद्ध असलेले अन्न शरीराद्वारे अधिक सहजपणे शोषले जाते. शेंगा, टोफू, पालक आणि फोर्टिफाइड तृणधान्यांसह हेम नसलेले लोह स्रोत देखील लोहाच्या सेवनात योगदान देऊ शकतात. लिंबूवर्गीय फळे किंवा मिरपूड यांसारख्या व्हिटॅमिन सीच्या स्त्रोतांसह नॉन-हेम लोहयुक्त पदार्थ लोहाचे शोषण वाढवतात.
स्वयंपाक करण्यापूर्वी शेंगा, धान्ये आणि बिया भिजवल्याने फायटेटची पातळी कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे लोह शोषण्यास प्रतिबंध कमी होतो. याव्यतिरिक्त, कास्ट-आयरन कूकवेअर वापरल्याने जेवणातील लोह वाढू शकते.
हे ही वाचा<< नितीन गडकरींची शुगर अचानक वाढली; अशावेळी जेवणाआधी ३० मिनिटे ‘या’ गोष्टीचे सेवन कमी करू शकते धोका
आहारातील काही घटक लोहाचे शोषण कमी करू शकतात. चहा, कॉफी आणि काही हर्बल इन्फ्युजनमध्ये आढळणारे टॅनिन सारखे पदार्थ तसेच दुग्धजन्य पदार्थांमधील कॅल्शियम आणि फॉस्फेटसह लोहाचे शोषण रोखू शकतात. त्यामुळे या पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे.