Tomatoes Control Blood Pressure: अनेकांना माहित नसते, की उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब या दोन्ही मुख्यतः खराब जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या स्थिती आहेत. याबाबत फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूट, दिल्लीचे मुख्य संचालक, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी, डॉ. निशीथ चंद्रा, यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, नुकत्याच निदान झालेल्या रक्तदाबाच्या रुग्णासाठी मी लगेच औषध लिहून देत नाही तर आधी दोन ते तीन आठवडे आहारात बदल करून व्यायामाचिरे सवय लावून जीवनशैली सुधारण्यावर भर देतो. डॉक्टर असेही सांगतात की, तुमचा विश्वास बसणार नाही पण माझे ३० टक्के रुग्ण जीवनशैली आणि आहारातील बदलांमुळे पुन्हा रक्तदाब नियंत्रणात आणण्यात यशस्वी होतात. पण जेव्हा जीवनशैलीत सुधारणा करूनही रक्तदाब कमी होत नाही तेव्हा औषधोपचाराकडे वळायला हवे.

टोमॅटो व रक्तदाब यांचा संबंध काय, अभ्यास काय सांगतो?

युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, जे लोक दररोज अधिक टोमॅटो किंवा टोमॅटोचे पदार्थ खातात त्यांना उच्च रक्तदाबाचा धोका एक तृतीयांशपेक्षा कमी होतो. टोमॅटो खाल्ल्याने तुमचा रक्तदाब कमी होण्यास मदत होते. अभ्यासातील निरीक्षणानुसार, ज्यांनी टोमॅटो किंवा टोमॅटो-आधारित पदार्थ जास्त खाल्ले आहेत त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याचा धोका कमी टोमॅटो खाणाऱ्यांपेक्षा ३६ टक्क्यांनी कमी होता. आधीच उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये, विशेषत: पहिल्या टप्प्यात उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये, टोमॅटोचे मध्यम प्रमाणात सेवन देखील रक्तदाब कमी करण्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले होते, या अभ्यासापूर्वी अमेरिकन हार्ट असोसिएशननेही रक्तदाब कमी करण्यासाठी टोमॅटोचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला होता.

टोमॅटो रक्तदाबावर कसा प्रभाव टाकतो?

उच्च रक्तदाब हा आहारात सोडियमचे प्रमाण वाढल्यामुळे होतो. म्हणूनच आम्ही रुग्णांना मीठाचे सेवन मर्यादित करण्यास सांगतो. तुमचे दररोज सोडियमचे एकूण प्रमाण १,५०० -२,००० मिलीग्राम (mg) पेक्षा जास्त नसावे. रक्तदाबावर होणारा सोडियमचा प्रभाव पोटॅशियम आणि त्यात भरपूर पदार्थ खाल्ल्याने कमी केला जाऊ शकतो. टोमॅटो पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहे.

टोमॅटोमध्ये लाइकोपीन देखील असते, जे एंडोथेलियम किंवा रक्तवाहिन्यांच्या भिंती मजबूत करते. हे एंडोथेलियममध्ये नायट्रिक ऑक्साईड तयार होण्यास प्रोत्साहन देते. यामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि रक्तदाब कमी होतो. रक्तवाहिन्या अरुंद होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अँजिओटेन्सिन 2 ची निर्मिती देखील टोमॅटोमुळे कमी होते, परिणामी हृदयाला रक्त बाहेर ढकलण्यासाठी घ्यावे लागणारे परिश्रम कमी होऊ शकतात.

टोमॅटो खाण्याची योग्य पद्धत कोणती?

अर्थात टोमॅटोचे सेवन योग्य पद्धतीनेच केले पाहिजे. जर तुम्ही त्यांच्यावर मीठ टाकले किंवा तीव्र आचेवर शिजवले तर त्यांचे पौष्टिक आणि हृदय-संरक्षणात्मक फायदे वाफ बनून निघूनच जातात, म्हणूनच भारतीय लोक त्यांच्या आहारात टोमॅटोचा भरपूर वापर करत असले तरी त्यांना त्याचे पौष्टिक फायदे मिळत नाहीत.

हे ही वाचा<< १०० ग्रॅम पुदिन्याच्या पानांमध्ये दडलंय काय? डोकं व पोटाच्या ‘या’ त्रासांना करता येईल रामराम, तज्ज्ञांचं मत वाचाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टोमॅटोच्या सॅलडवर मीठ शिंपडले तरी त्याचे पोषण मूल्य नाहीसे होते. हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी सर्वात अनुकूल आहार म्हणजे टोमॅटो कच्चा खाणे. फार फार तर आपण ऑलिव्ह ऑइल टाकून टोमॅटो खाऊ शकता. तुमच्या आहारात टोमॅटोचा योग्य प्रकारे समावेश करण्यासह शरीराला व्यायाम आणि झोप सुद्धा दिल्याने तुमचा रक्तदाब मर्यादेत ठेवण्यास नक्कीच मदत होईल.