वय वाढते तसतशा शरीराच्या विविध जैवरासायनिक क्रिया मंदावतात, हे सत्य आहे. त्याचप्रमाणे उष्ण हवामानाशी लढण्याची शरीराची क्षमता सुद्धा घटत जाते. सभोवतालचे वातावरण उष्ण झाल्यावर त्याविरोधात  शरीरामध्ये जे बदल होणे अपेक्षित असतात, तसे ते वयस्कर लोकांमध्ये व्यवस्थित होताना दिसत नाहीत.

उन्हाळ्याला तोंड देण्यासाठी घामाची निर्मिती होण्याच्या एकंदरच प्रक्रियेमध्ये वृद्धांच्या शरीरामध्ये काही बिघाड झाल्याचे लक्षात येते. आयुर्वेदात म्हटल्याप्रमाणे शरीरामधील उष्णता बाहेर फेकण्याचा सहजसोप्पा मार्ग म्हणजे स्वेद अर्थात घामाची निर्मिती. त्वचेवर घाम निर्माण करून त्या घामाचे बाष्पीभवन करण्यासाठी त्वचेखालील रक्तामधील उष्णता वापरली जाते आणि रक्ताला थंडावा मिळतो. यासाठी स्वेद ग्रंथींनी घाम निर्माण केला पाहिजे, तर हृदय व रक्त वाहिन्यांनी रक्त अधिक प्रमाणात त्वचेकडे ढकलले पाहिजे. मात्र वयानुसार या प्रक्रियेमध्ये झालेली गडबड  शरीरात उष्णता वाढवण्यास कारणीभूत होते.

वय वाढल्यानंतर काही व्यक्तींमध्ये हृदयाचे कार्य अपेक्षेप्रमाणे होत नाही,असे दिसून येते. रक्ताला थंडावा मिळण्यासाठी अधिकाधिक रक्त त्वचेकडे पाठवणे आवश्यक असते, त्यासाठी हृदयाकडून शरीरभर होणारे रक्ताचे विक्षेपण (cardiac output) वाढणे अपेक्षित असते, तसे ते  वृद्धांमध्ये वाढताना दिसत नाही.ज्यामुळे उष्ण तापमानाचा सर्वाधिक परिणाम वृद्धांवर होताना दिसतो.

तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, वार्धक्यात कमी होणारी तहानेची संवेदना. शरीरात पाणी कमी झाले की तहान निर्माण करून पाणी पिऊन पाण्याची पूर्ती केली जाते, ही प्रक्रिया सुद्धा वय वाढते तशी बिघडते. त्यामुळे वृद्ध लोकांना फारशी तहान लागत नाही आणि पाणी न प्यायल्या मुळे शरीरात उष्णता वाढण्याचा धोका बळावतो. मूत्राचा रंग पिवळा-तपकिरी येत असेल तर आपण पाणी कमी पित आहोत हे ओळखता येते.याचसाठी वृद्धांनी तहान नसली तरी तास-दीड तासाने एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावावी. सरबत, ताक, दूध, फळांचे रस प्यावे, या दिवसांत ज्येष्ठांनी शहाळ्याचे पाणी तर रोज प्यावे. शरीराला पाणी व अत्यावश्यक खनिजे पुरवण्यास उत्त्तम.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इथे हे लक्षात घेतले पाहिजे की दिवसभर  एसीमध्ये राहणारे,अजिबात कष्ट-व्यायाम न करणारे असे जे लोक आहेत, ज्यांना दिवसभरातून घाम येतच नाही अशा मंडळींना सुद्धा वरील मुद्दा लागू होतो; मग त्यांचे वय कितीही असो. उन्हाळ्यात सातत्यानं एसीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या शरीरातसुद्धा वरील प्रक्रिया बिघडतात. तात्पर्य हेच की  ज्यांना घाम येत नाही , त्यांच्यावरसुद्धा उन्हाळ्याचा – उष्णतेचा विकृत परिणाम संभवतो.