Home Remedies For Headache In Summer: एप्रिल महिना सुरु झाल्यापासून उन्हाचा प्रभाव वाढल्याचा अनुभव होत आहे. उन्हाळा सुरु झाल्यावर शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते. यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता वाढत जाते. या कालावधीमध्ये डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो. अनेकदा सूर्य डोक्यावर आल्यावर हा त्रास सुरु होतो. ही समस्या फार गंभीर नसली, तरी त्यामुळे त्रास सहन करावा लागू शकतो. आहारामध्ये असंतुलन असल्यामुळेही डोक दुखायला सुरुवात होते. डोकेदुखीच्या या त्रासावर घरगुती उपाय करता येतात. काही ठराविक पदार्थांचा समावेश दैनंदिन आहारात केल्याने ही समस्या नाहीशी होते.
कलिंगडचा ज्यूस
कलिंगडमध्ये ९२ टक्के पाणी असते. याच्या सेवनामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राहते. परिणामी डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. कलिंगडमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी असे पोषक घटक असतात. कलिंगडचा ज्यूस प्यायल्याने डोकेदुखीसह अन्य आजाराचे प्रमाण कमी होते.
पालक
हिरव्या पालेभाज्यांमुळे पचनक्रिया सुधारते. याव्यतिरिक्तही भाज्यांचे अनेक फायदे आहेत. पालकमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम असते. मायग्रेनचा त्रास कमी व्हावा यासाठी पालक खाण्याचा सल्ला दिला जातो.
दही
उन्हाळ्यात डोकेदुखीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. दही खाल्याने शरीरात राइबोफ्लेविन आणि कॅल्शियम हे घटक पोहचत असतात. या घटकांमुळे डोकेदुखीचा त्रास कमी होतो.
आलं
आल्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, आयर्न, कॉपर आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक घटक असतात. या औषधी पदार्थाचा समावेश आहारामध्ये केल्याने डोकेदुखीचे प्रमाण कमी होते. अन्य समस्यांदेखील आल्यामुळे कमी होतात.