Supermarket Worst Foods To Avoid For Gut Health : आपण अनेकदा मॉल, बिग बाजार, सरकारी भांडार अर्थातच सुपर मार्केटमध्ये सेल लागला की, ढीगभर खाण्याच्या वस्तू घेऊन येतो. पण, आपण जे पदार्थ खरेदी करीत आहोत, ते आपल्यासाठी योग्य आहेत का याबद्दल कोणालाच माहिती नसते. मग ते पदार्थ खाल्ले की, आपल्या शरीरात नकळत वेगवेगळे बदल दिसू लागतात. कारण- जसे खाल, तसे दिसाल म्हणजेच जे तुम्ही खाता, त्याचा तुमच्या आरोग्य आणि शरीरावर परिणाम होतो, असं म्हणतात.

त्यामुळे दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टर पाल माणिकम यांनी आतड्यांच्या आरोग्यासाठी काय चांगले, रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास कोणते पदार्थ मदत करतात याबद्दलची मते मांडून सुपरमार्केटमधील पाच पदार्थ विकत न घेण्याचा सल्ला दिला आहे. तर नेमके हे पदार्थ कोणते याबद्दल बातमीतून जाणून घेऊयात…

तर ‘हे’ ५ पदार्थ कोणते? (Supermarket Worst Foods To Avoid )

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट असलेले डॉ. माणिकम स्वतः फळांचे रस, गोडसर पॅकेज्ड लस्सी, प्रोबायोटिक सप्लिमेंट्स, शुगर-फ्री बिस्किटे, प्रक्रिया केलेले (प्रोसेस्डस) मांस व फ्रोजन फूड्स खरेदी करीत नाहीत आणि इतरांनाही खरेदी न करण्याचा सल्ला ते देतात.

फळांचे रस आणि आरोग्यदायी पेये – या पेयांमध्ये १०० टक्के फळांचा रस आहे, असे म्हटल्यावर ते आरोग्यदायी ठरत नाही. बहुतेकदा त्यामध्ये फक्त पाणी असते आणि फायबर काढून टाकलेले असतात. त्यामुळे असे पेय पिण्यापेक्षा संपूर्ण फळ खाणे कधीही चांगले, असे डॉक्टर पाल माणिकम यांनी सांगितले आहे.

या संदर्भात नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी-यकृतरोग सल्लागार डॉक्टर दीपक भंगाळे म्हणाले की, पॅकेज्ड आंब्याचा रस, एनर्जी ड्रिंक्स व माल्टेड हेल्थ पावडर यांना जाहिरातीसाठी पौष्टिक पदार्थ म्हणून दाखवले जाते. त्यामुळे या उत्पादनांच्या वास्तविक रचनेत प्रिझर्वेटिव्ह्ज आणि इमल्सीफायर्ससह अतिरिक्त साखरेचे प्रमाण समाविष्ट असते. त्यामुळे तुमच्या आतड्यांतील मायक्रोबायोटामध्ये व्यत्यय, इन्सुलिन प्रतिरोध व फॅटी लिव्हरचा रोग होण्याचा धोकाही वाढतो.

प्रो-बायोटिक सप्लिमेंट्स – प्रो-बायोटिक सप्लिमेंट्स अनेकदा पोटातील आम्ल टिकवून ठेवत नाहीत. त्याऐवजी दही, लापशी व इडली यांसारख्या नैसर्गिक आंबवलेल्या पदार्थांमधून प्रो-बायोटिक्स घेण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला डॉक्टर पाल माणिकम यांनी दिला आहे.

बिस्किटे – डाएट आणि डायबेटीस असणारे हमखास शुगर-फ्री बिस्किटे विकत घेता. पण, तुम्हाला ही बिस्किटे आरोग्यदायी वाटत असतील. पण, प्रत्यक्षात या बिस्किटांमध्ये कृत्रिम गोड पदार्थ (आर्टिफिशल स्वीटनर) असतात आणि आतड्यांना त्रास देणाऱ्या घटकांचे स्रोत त्यात असतात आणि तुमच्या रक्तातील साखर आणि आतड्यांतील सूक्ष्मजीवांवर त्यांचा विपरीत परिणाम होतो. ‘डायबेटीस फ्रेंडली’ या लेबलने तर अजिबात फसू नका, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

प्रोसेस्ड मांस आणि फ्रोझन फूड – तर प्रोसेस्ड मांस म्हणजे नैसर्गिक मांस थेट न खाता, त्यावर प्रक्रिया करून बनवलेले पदार्थ आणि फ्रोझन फूड म्हणजे म्हणजे जे पदार्थ आधी तयार करून, फ्रिजमध्ये गोठवून ठेवलेले असतात. त्यामध्ये कबाब, सॉसेज, नगेट्स यांचा समावेश असतो. डॉक्टर भंगाळे यांनी सांगितले की, सुपरमार्केटमध्ये तुम्हाला अनेकदा गोठवलेले मांसाहारी स्नॅक्स दिसतात, ज्यावर अनेकदा प्रक्रिया केली जाते आणि पदार्थांची सुरक्षा म्हणून सोडियम नायट्रेटचा वापर केला जातो. त्यामुळे असे पदार्थ सतत खाल्यास आतड्यांतील जळजळ होण्याबरोबर आतडयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता दीर्घकाळ वाढू शकते.

दही आणि पॅकेज्ड लस्सी – डॉक्टर भंगाळे यांनी या उत्पादनांमध्ये अनेकदा कृत्रिम फळांच्या चव आणि साखरेचा समावेश असतो, असे सांगितले. अशा दुग्धजन्य पदार्थांचे जास्त सेवन केल्यास आतड्याच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो; विशेषतः ज्यांना लॅक्टोज असहिष्णुता किंवा साखरेसंबंधी संवेदनशीलता आहे. जर तुम्हाला दही आणि पॅकेज्ड लस्सी खायची असेल, तर कमी साखर असलेले दही निवडा किंवा फक्त साधे दही घ्या आणि टॉपिंग म्हणून तुम्हाला आवडत असलेल्या फळाचे त्यात काप करून टाका.

डॉक्टर भंगाळे म्हणाले की, पॅकेज्ड इन्स्टंट नूडल्सदेखील या पदार्थांच्या यादीत येतात. भारतीय कुटुंब वारंवार या नूडल्सचे सेवन करतात; ज्यामध्ये रिफाइंड पीठ (मैदा), उच्च सोडियम पातळी, कृत्रिम चव वाढविणारे घटक एमएसजी व पाम तेल असते. अशा पदार्थांचे वारंवार सेवन केल्याने आतड्यातील अस्तरांना जळजळ होण्याचा त्रास होतो, ज्यामुळे पोटफुगी पचन प्रक्रियांमध्ये व्यत्यय येण्यास सुरुवात होते.

डॉक्टर भंगाळे यांनी रिफाइंड वनस्पती तेलांची यादीखील सांगितली की, ज्यामध्ये सूर्यफूल तेल, करडई तेल व सोयाबीन तेल यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे. रिफाइंड तेल जे आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो; त्यावर वेगवेगळे रासायनिक उपचार केले जातात; त्यामुळे त्यातील नैसर्गिक गुणधर्म कमी होऊन जातात. या तेलांमध्ये ओमेगा-६ फॅटी ॲसिडचे प्रमाण जास्त असते; जे जास्त प्रमाणात शरीरात गेलं तर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.शरीरात ओमेगा ६ ते ओमेगा ३ चे प्रमाण वाढल्याने चयापचय विकारांसह आतड्यांमध्ये जळजळ होते.