Body detox drinks: आताच्या धावपळीच्या आयुष्यात लोकांचा जंक फूडकडे कल खूपच वाढला आहे. रात्री अपरात्री जंक फूड खाणं, भूक लागल्यावर बर्गर, पिझ्झा खाणं किंवा तळलेले पदार्थ रोजच्या आहारात खाणं हे सर्व अगदी साधारण झालं आहे. या सवयी तात्पुरत्या आनंद देतात, मात्र शरीराला हळूहळू कमकुवत करत जातात. जंक फूडमधील तेल, मीठ आणि हानिकारक रंग शरीरात विषारी पदार्थ जमा करतात. शरीरात विषारी पदार्थ साचल्यास सुरूवातीला थकवा, मुरूमे आणि पचनाच्या समस्या उद्भवतात. अशा सवयींमुळे हळूहळू ह्रदयरोग, रक्तातील साखर वाढणे आणि लठ्ठपणासारखे गंभीर आजार होतात.

पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी सांगितल्याप्रमाणे, नियमित डिटॉक्सिफिकेशन हे दैनंदिन जीवनशैलीत बदल करण्याइतकेच महत्त्वाचे आहे. डिटॉक्सिफिकेशन विषारी पदार्थ काढून टाकते, पचनसंस्था सुधारते आणि चयापचय सुधारते. तुमच्या आहारात काही नैसर्गिक डिटॉक्स पेये समाविष्ट केल्याने शरीर आतून स्वच्छ होते आणि ऊर्जा वाढते. पचन आणि आरोग्यासाठी असंख्य फायदे देणाऱ्या काही प्रभावी डिटॉक्स पेयांबाबत जाणून घेऊ…

लिंबू, काकडी आणि पुदिना

लिंबूमधील ‘सी’ जीवनसत्त्व आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. काकडी शरीराला हायड्रेट ठेवते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकते. पुदिन्याचा थंडावा पचन सुधारतो आणि ताजेपणा आणतो. एका बाटलीत पाणी भरा आणि त्यात लिंबाचे तुकडे, काकडीचे तुकडे आणि पुदिन्याची पाने घाला. काही तास भिजवल्यानंतर हे पाणी पिल्याने पचन सुधारते, त्वचा मऊ होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

सकाळी कोमट पाण्यात लिंबू

सर्वात सोपा आणि प्रभावी डिटॉक्स उपाय म्हणजे लिंबू पाणी. सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी ते प्या. थोडे मध घातल्याने परिणाम दुप्पट होतात. हे पेय पचन सुधारते, चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

मध आणि आलं

आल्यामध्ये जिंजरॉल नावाचा घटक असतो. तो जळजळ कमी करतो, पचन सुधारतो आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतो. आलं पाण्यात उकळून ते गरम असतानाच त्यात मध टाकून प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीर डिटॉक्स करते.

दालचिनी आणि मधाचे पाणी

दालचिनीमध्ये औषधी गुणधर्म असतात. ती रक्तातील साखर नियंत्रित करते, शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते आणि विषारी पदार्थ काढून टाकते. कोमट पाणी आणि मधासह दालचिनीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

हर्बल चहा

ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे हानिकारक पदार्थांना डिटॉक्सिफाय करतात आणि ह्रदयरोगपासून संरक्षण करतात. ग्रीन टीचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते, त्वचेचा रंग सुधारतो आणि मेंदूचे कार्य सुधारते. हे नैसर्गिकरित्या शरीराला डिटॉक्सिफाय करते.