फळ खाणे आरोग्यासाठी चांगले आहे हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भारतीय हवामानात पिकणाऱ्या केळी, सफरचंद, संत्री, पेरू यांसारख्या पारंपरिक फळांसोबतच आता पाश्चिमात्य देशांतील (Western countries) विदेशी फळांचाही आपल्या आहारात समावेश वाढत चालला आहे. त्यामध्ये क्रॅनबेरी, ब्ल्यूबेरी, अॅव्होकॅडो, किवी, स्ट्रॉबेरी, ड्रॅगनफ्रूट असे विविध फळांचे आजकाल सेवन केले जातात; पण त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होता याबाबत विचार करतो. काळजी करू नका, या लेखात क्रॅनबेरी या फळाचा रस प्यायल्यास आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊ या.
क्रॅनबेरी (Cranberry) फळ हे एक छोटं, लालसर रंगाचं बेरी प्रकारातील फळ आहे. ही फळं प्रामुख्यानं उत्तर अमेरिकेतील थंड हवामान असलेल्या भागांत उगम पावतात आणि तिथेच मोठ्या प्रमाणात त्यांची लागवड केली जाते.
पचनक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी सध्या अनेक जण नैसर्गिक पेयांकडे वळत आहेत. त्यामध्ये क्रॅनबेरी सरबताचाही समावेश होत आहे. यापूर्वी फक्त मूत्र संसर्गापासून संरक्षणासाठी ओळखला जाणारे हे सरबत आता आरोग्यस्नेही जीवनशैलीचा भाग बनत चालले आहे. आंबटगोड चव असलेला हा गडद लालसर रस अँटीऑक्सिडंट्स आणि वनस्पतीजन्य पोषक घटकांनी भरलेला आहे.
खरं तर दररोज क्रॅनबेरी सरबत प्यायल्यावर आपल्या पचनसंस्थेवर नेमका काय परिणाम होतो? यावर तज्ज्ञांचं मत खूप महत्त्वाचं आहे.
तर, रोज क्रॅनबेरी ज्यूस प्यायल्यास पचन क्रियेवर कसा परिणाम होतो?(So, what really happens to your digestive system when you sip on cranberry juice every day?)
“क्रॅनबेरी ज्यूसमध्ये बायोऍक्टिव्ह कंपाऊंड्स असतात. विशेषतः प्रोअँथोसायनिडिन्स, ज्यामध्ये अँटीमायक्रोबियल (“जीवाणू, विषाणू, बुरशी यांसारख्या हानिकारक सूक्ष्म जंतूंच्या वाढीला अटकाव करणारे) गुणधर्म असतात. हे घटक हानिकारक जीवाणूंच्या वाढीस अडथळा आणतात आणि चांगल्या जीवाणूंना वाढण्यास पोषक वातावरण निर्माण करतात.
काही संशोधनात असेही आढळले आहे,”क्रॅनबेरीमधील काही घटक हे पचनसंस्थेच्या आतील अस्तरावर रोगजंतू चिकटण्यापासून रोखू शकतात. त्यामुळे आतड्यांतील उपयुक्त जंतूंची आरोग्यदायी समतोल राखण्यास मदत होऊ शकते.”
डॉ. आदित्य नरगुंड सांगतात की, क्रॅनबेरी ज्यूसला पूर्णतः एकमेव उपाय मानणे योग्य नाही. ते केवळ पूरक उपाय म्हणूनच पाहिले पाहिजे. पचनक्रियेच्या दृष्टीने एकाच फळावर अवलंबून राहणे चुकीचे ठरू शकते.
चांगल्या पचनासाठी विविध, फायबरयुक्त आणि आंबवलेल्या(फर्मेंटेड) पदार्थांचा समावेश असलेला आहार महत्त्वाचा आहे.
“क्रॅनबेरी भारतात नैसर्गिकरीत्या उगम पावणारे फळ नाही. हे फळ बहुधा आयात केले जाते. त्यामुळे याची किंमत जास्त असते आणि प्रक्रिया करताना त्यात प्रिझर्वेटिव्ह्ज (कृत्रिम संरक्षक) घातले गेलेले असण्याची शक्यता असते.”
अतिरिक्त प्रमाणात किंवा अचानक सेवन केल्यास काही लोकांच्या पचनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. विशेषतः ज्यांना आधीपासून अशा फळांच्या सेवनाची सवय नाही किंवा ज्यांना पचनाच्या समस्या आहेत.
क्रॅनबेरी ज्यूस नियमित पिण्याचे तोटे (Potential downsides of consuming cranberry juice regularly)
डॉ. नरगुंड यांच्या मते, बाजारात सहज उपलब्ध असलेली अनेक क्रॅनबेरी सरबते अतिशय गोडसर असतात. कारण- त्यात जास्त प्रमाणात साखर वापरलेली असते. त्याचे काही संभाव्य तोटे खालीलप्रमाणे :
१. पचनसंस्थेतील जीवाणूंचा समतोल बिघडतो
– साखरेमुळे आतड्यांमधील चांगल्या आणि वाईट जीवाणूंचा समतोल बिघडतो.
– त्यामुळे पचनविकार, गॅस, अपचन यांसारखे त्रास होऊ शकतात.
२. शरीरात सूज (inflammation) वाढू शकते
– जास्त साखरेचे सेवन केल्यास शरीरात सूज निर्माण करणारी प्रक्रिया (inflammatory response) सक्रिय होते.
३. मेटॅबॉलिझमशी संबंधित समस्या
– नियमितपणे गोडसर सरबत प्यायल्यास वजनवाढ, इन्सुलिन रेझिस्टन्स, मधुमेहाचा धोका या गोष्टी वाढू शकतात.
४. वाईट जीवाणूंच्या वाढीस पोषक
– जास्त साखरेमुळे पचनसंस्थेत असणारे वाईट जीवाणू वाढीस लागतात, ज्याचा दीर्घकाळात अपाय होऊ शकतो.
“क्रॅनबेरी सरबत पिताना शक्यतो ‘नो शुगर अॅडेड’ किंवा होममेड, डायल्युटेड (पाणी मिसळलेला) पर्याय निवडावा. हे सरबत रोज पिण्याऐवजी ते आठवड्यातून २-३ वेळा घेणे अधिक सुरक्षित आहे,” असा सल्लाही डॉ. नरगुंड यांनी दिला आहे.
क्रॅनबेरी सरबत आणि पचनसंस्थेवर त्याचा परिणाम
अॅसिडिटी आणि पचनाचा त्रास:
क्रॅनबेरी सरबत नैसर्गिकरीत्या अॅसिडिक असते. बहुतांश लोकांना ही अॅसिडिटी सहन करता येते; पण वारंवार सेवन केल्यास त्यांना पोटदुखी, आम्लपित्त किंवा जठराच्या त्रासाचा अनुभव येऊ शकतो. जठराची सूज यांसारख्या जठरांत्रीय संवेदनशीलता असलेल्या लोकांसाठी हे विशेषतः खरे आहे.
लॅक्सेटिव्ह परिणाम आणि किडनी स्टोनचा धोका :
“काही लोकांमध्ये क्रॅनबेरी ज्यूसमुळे सौम्य रेचक (mild laxative) प्रभाव दिसून येतो, ज्यामुळे शौचास जास्त वेळा जावे लागू शकते. तसेच, त्यात असलेले ऑक्झलेट घटक जास्त असल्याने खूप सेवन केल्यास किडनी स्टोन होण्याचा धोका वाढू शकतो.
ताज्या व साखर नसलेल्या क्रॅनबेरी सरबत आणि बाजारातून विकत घेतलेल्या सरबतामधील फरक
ताजे आणि साखर न घातलेले क्रॅनबेरी सरबत त्यातील phytonutrients (विशेषतः अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्स) अधिक प्रमाणात टिकवून ठेवते, जे पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरतात. अनेक स्टोअरमध्ये विकल्या जाणाऱ्या क्रॅनबेरी सरबतामध्ये इतर रस मिसळलेले असतात किंवा साखर घातलेली असते, ज्यामुळे त्याच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये घट होते आणि अनावश्यक additives देखील शरीराला हानिकारक ठरू शकतात.
“भारतामध्ये क्रॅनबेरी हे स्थानिक फळ नसल्यामुळे येथील बाजारात उपलब्ध असलेली क्रॅनबेरीची सरबते प्रामुख्याने आयात केलेली असतात आणि त्यांचे शेल्फ लाइफ वाढविण्यासाठी preservativesचा वापर केला जातो. या कारणांमुळे या सरबतांचे पोषणमूल्य घटू शकते. तसेच संवेदनशील पचनसंस्था असणाऱ्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो. त्यामुळे ज्यांना पचनसंस्थेच्या आरोग्याची काळजी आहे, त्यांनी क्रॅनबेरी सरबत माफक प्रमाणातच प्यावे आणि शक्य असल्यास साखर न घातलेले शुद्ध सरबत निवडावा. त्याहून अधिक चांगला पर्याय म्हणजे क्रॅनबेरी हे इतर फळभाज्यांबरोबर संतुलित आहाराचा भाग म्हणून घ्यावे”, असा सल्ला शेवटी डॉ. नरगुंड देतात