Harmful Bedroom Items : घरातील आवडत्या जागेपैकी एक म्हणजे बेडरूम; इथे आपल्याला मर्जीप्रमाणे वागता येतं, बोलता येतं, आराम करायला मिळतो. पण, हार्वर्ड-प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टर सौरभ सेठी यांच्या मते, बेडरूममधील काही गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, ज्याचा कदाचित तुम्ही कधीच विचारसुद्धा केला नसेल.

तर डॉक्टर सौरभ सेठी, एमडी, एमपीएच असून गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, हेपॅटोलॉजी व इंटरव्हेंशनल एंडोस्कोपीमध्ये तज्ज्ञ आहेत. त्यांनी एम्स, हार्वर्ड व स्टॅनफोर्ड येथेही प्रशिक्षण घेतले आहे. अलीकडेच त्यांनी पोस्ट केलेल्या एका इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये त्यांनी बेडरूममधील तीन वस्तूंबद्दल माहिती दिली, ज्या तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवून तुमच्या झोपेत व्यत्यय आणू शकतात. त्यामुळे तुम्ही शक्य तितक्या लवकर या तीन वस्तू बेडरूममधून काढून टाकल्या पाहिजेत, असे मत त्यांनी या व्हिडीओत मांडले आहे.

तर व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे…

१. जुन्या उशा – जर तुम्ही एक ते दोन वर्षांपेक्षा जास्त जुन्या उशा वापरत असाल, तर कदाचित त्या बदलण्याची वेळ आली आहे. कारण- एक ते दोन वर्षांत त्यात धूळ, घाम आणि आणि त्याद्वारे जीवजंतू जमा झालेले असतात.

२. सिंथेटिक एअर फ्रेशनर – बरेचसे एअर फ्रेशनर्स फ्थॅलेट्स आणि VOCs (VOCs म्हणजे हवेत लवकर मिसळणारे रसायन किंवा वैज्ञानिक भाषेत अस्थिर सेंद्रिय संयुगे) रसायने सोडतात. सिंथेटिक एअर फ्रेशनरमुळे श्वसनासंबंधी आणि हार्मोनल बिघाड यांच्याशी संबंधित त्रास सुरू होतात.
एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, एअर फ्रेशनर्समध्ये ८६ टक्के फ्थॅलेट्स ॲसिडचे एस्टर हे रासायनिक संयुग असतात. एअर फ्रेशनर्समध्ये वास टिकवून ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. फ्थॅलेट्समधील या रसायनामुळे प्रजननासंबंधित समस्या व दम्याचा त्रास या बाबी तुमच्या शरीरात वाढू शकतात. त्यामुळे एअर फ्रेशनरऐवजी नैसर्गिक तेल वापरून पाहा.

३. जीर्ण झालेल्या गाद्या – ७ ते १० वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाद्या तुमच्या झोपेची गुणवत्ता कमी करू शकतात आणि दीर्घकालीन पाठदुखीचे कारण ठरू शकतात.

तर याबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने डॉक्टरांशी चर्चा केली.

१ ते २ वर्षांनी उशी का बदलावी?

कोशिस हॉस्पिटल्समधील ( Koshys Hospitals) सल्लागार डॉक्टर पलेती शिवा कार्तिक रेड्डी (Dr Palleti Siva Karthik Reddy) यांच्या मते, जुन्या उशांपासून होणारा सगळ्यात पहिला होणारा आरोग्याचा त्रास म्हणजे ॲलर्जीन. ॲलर्जीन म्हणजे ॲलर्जी निर्माण करणारे घटक. आपण ॲलर्जी निर्माण करणाऱ्या घटकांच्या दीर्घकाळ संपर्कात राहतो, ज्यामुळे शरीरात दीर्घकालीन जळजळ जाणवत राहते.

एक ते दोन वर्ष तीच उशी वापरल्याने त्यामध्ये जमा झालेले हाऊस डस्ट माईट आणि डर्माटोफॅगॉइड्स टेरोनिसिनस नावाचे धुळीत राहणारे अतिसूक्ष्म किडे आणि त्यांची विष्ठा डेर पी १ हे ॲलर्जी तयार करण्यास मुख्यत: कारणीभूत ठरतात. जेव्हा यांसारखे घटक श्वासावाटे शरीरात जातात तेव्हा शरीरातील IgE नावाची प्रतिकारशक्ती प्रतिक्रिया सक्रिय होते. या प्रतिक्रियेला टाईप १ हायपर सेन्सिटिव्हिटी, असे म्हणतात. त्यामुळे शिंका, नाक गळणे, दम्याचा झटका अशा समस्या उद्भवू शकतात.

हाऊस डस्ट माईट (mites)व्यतिरिक्त उशांमध्ये बुरशीसुद्धा आढळतात. वुडकॉक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १.५ ते २० वर्षांपासून वापरत असलेल्या उशांचे विश्लेषण केले. या उशांमध्ये वजनाच्या प्रति ग्रॅम बुरशीचे हजारो कण सापडले. त्यातही ‘एस्परगिलस फ्युमिगॅटस’ नावाची बुरशी सगळ्यात जास्त प्रमाणात आढळली, जी माणसांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते. त्यामुळे बुरशीजन्य आणि हाऊस डस्ट माईटच्या ॲलर्जीशी सतत संपर्कात राहिल्यामुळे माणसांना श्वसनाचे आजार आणि गंभीर ॲलर्जी होण्याची शक्यता असते.

एअर फ्रेशनर्स विषारी का असतात?

डॉक्टर रेड्डी म्हणतात, सिंथेटिक एअर फ्रेशनर्समध्ये अनेक वेगेवेगळी रसायने असतात., त्यापैकी बऱ्याच रसायनांची माहिती उत्पादनांच्या लेबलवरदेखील लिहिलेली नसते. स्टाइनमन यांनी २०११ मध्ये एनव्हायर्मेंटल हेल्थ पर्स्पेक्टिव्हजमध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्त्वपूर्ण अभ्यासात वेगवेगळ्या २५ एअर फ्रेशनर्सची तपासणी केली. त्यात असे आढळून आले की, या उत्पादनांपैकी एकूण १३३ प्रकारच्या एअर फ्रेशनर्समधून VOCs रसायने बाहेर पडतात. सरासरी प्रत्येक एअर फ्रेशनरमधून १७ VOCs बाहेर पडले आणि त्यापैकी जवळजवळ १/४ म्हणजे २५ टक्के रसायनं धोकादायक व विषारी म्हणून वर्गीकरण केली गेली आहेत; ज्यामध्ये बेंझिन आणि फॉर्मल्डिहाइडसारख्या ज्ञात कार्सिनोजेन्सचा समावेश होता. या रसायनांच्या सर्वांत चिंताजनक वर्गांपैकी एक म्हणजे फ्थॅलेट्स; जे शरीराच्या हार्मोन्सच्या नैसर्गिक कामात अडथळा आणतात. संशोधनानुसार फ्थॅलेट्स पुरुषांच्या हार्मोन्समध्ये व्यत्यय आणण्याचे काम करतात. त्यामुळे प्रजनन क्षमता आणि मेंदूच्या वाढीवर वाईट परिणाम होतो.

गादी आणि आरोग्य

डॉक्टर रेड्डी सांगतात की, गादीची गुणवत्ता आणि मस्क्यूकोस्केलेटल (हाडे व स्नायूंचे आरोग्य) आरोग्य यांच्यातील संबंध क्लिनिकल संशोधनात स्पष्टपणे सिद्ध झाले आहेत. गादी कालांतराने एकसमान आधार देण्याची क्षमता गमावते, ज्यामुळे पाठीचा कणा सैल होतो. पाठीचा कणा वाकतो, ज्यामुळे इंटरव्हर्टेब्रल डिस्क, फेसेट जॉइंट्सशिवाय पॅरास्पाइनल स्नायूंवर लक्षणीय ताण येतो आणि त्यामुळे पाठीच्या खालच्या भागाचे दीर्घकालीन दुखणे सुरू होण्याला हातभार लागतो. गादीला बरीच वर्षे झाल्यावर ती हळूहळू दबली जाऊन सगळ्या बाजूंनी ती सैल झालेली असते आणि त्यामुळे ती गादी टाकून द्यायला तुमचे मन होत नसले तरी ती मात्र तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात आधार देण्यालायक राहिलेली नसते. त्यातूनच मग सकाळी उठल्यावर अंगदुखी, अस्वस्थता ही त्रासदायक लक्षणे दिसू लागतात. एकंदरीत जुनी किंवा खराब गादी पाठदुखी, मानदुखी किंवा स्नायू-हाडांच्या आजारांना कारणीभूत ठरू शकते.