Tips For Healthy Eating With Diabetes : बैठी जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा, अशा अनेक कारणांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. यात तासनतास बसून काम असल्याने अनेकांना चालण्यास वेळ मिळत नाही, यामुळे दिवसभर तुम्हाला सक्रियपणे काम करता येत नाही. पण, काळजी करू नका. जर तुम्ही दर ४५ मिनिटांनी योग्य फॉर्ममध्ये १० स्क्वॅट्स मारल्यास तुमची तासनतास बसण्याची सवय कमी होण्यास सुरुवात होईल. काही जण असेही म्हणतात की, दररोज ३० मिनिटे चालण्यापेक्षा १० स्क्वॅट्स मारल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येते. पण, यावर डॉक्टर काय सांगतात जाणून घेऊ…
हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करण्यासाठी चालणे हा उत्तम व्यायाम प्रकार आहे, परंतु खूपवेळ बसून राहिल्यानंतर दर ४५ मिनिटांनी १० स्क्वॅट्स मारल्यानेही फायदे होऊ शकतात, असे इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसिन डायरेक्टर डॉ. मनीषा अरोरा म्हणाल्या.
जरी स्क्वॅट्स व्यायामाची ही क्रिया अल्पकालीन असली तरी त्यामुळे तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. विशेषत: ग्लुकोज चयापचयावर होणारे दुष्परिणाम कमी करण्यास मदत होऊ शकते. दरम्यान, आजकाल तुम्ही किती सक्रिय आहात याबद्दल नाही तर तुम्ही किती वेळ बसून राहता याबद्दल चर्चा होते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर कोणतीही क्रिया, हालचाल न करता दीर्घकाळ बसल्याने गंभीर परिणाम सहन करावे लागू शकतात, असे डॉ. अरोरा म्हणाल्या.
स्क्वॅट्स या व्यायाम प्रकाराने शरीराच्या खालच्या भागातील स्नायू सक्रिया होतात, ज्यामुळे ग्लुकोज चयापचयाची क्रिया सुरळीततपणे होते, अशी माहिती हैदराबादमधील एलबीनगर येथील ग्लेनेगल्स अवेअर हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. बिराली स्वेथा यांनी दिली.
दिवसभरात नियमित स्क्वॅट्ससारखा व्यायाम प्रकार करून तुम्ही रक्तातील साखरेची पातळी चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवू शकता. जर तुम्हाला आणखी प्रभावी परिणाम हवे असतील तर तुम्ही नियमितपणे चालणे किंवा इतर कोणताही एरोबिक व्यायाम प्रकार करू शकता. यामुळे तुमच्या शरीराची योग्य हालचाल आणि त्याचे चांगले फायदेही मिळतील. विशेषत: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येईल, असे डॉ. अरोरा म्हणाले.
चालण्याचे अनेक फायदे असंख्य अभ्यासांमधून सिद्ध झाले आहेत, पण रक्तातील साखर नियंत्रणासाठी स्क्वॅट्स हा उत्तम व्यायाम प्रकार आहे, याचे पुरावे अजूनही समोर येत आहेत असे त्या म्हणाल्या. पण, चालण्यापेक्षा स्क्वॅट्स हा व्यायाम प्रकार करण्याचे फायदे व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतात. हे तुमचा फिटनेस, आहार, आरोग्य स्थिती आणि एकूण जीवनशैली यांसारख्या घटनांवर अवलंबून आहे, असेही डॉ. अरोरा म्हणाल्या.
डॉ. बिराली म्हणाल्या की, रोज ३० मिनिटं चालणे किंवा दर ४५ मिनिटांनी १० स्क्वॅट्स करणं या दोन्ही प्रकारांचे वेगवेगळे फायदे आहेत. हे दोन्ही व्यायाम प्रकार मधुमेह असलेल्या आणि त्यासंबंधित लक्षणं दिसणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर आहेत. कायम यामुळे ग्लुकोजची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, हृदय व स्नायूंचे आरोग्य मजबूत राहते. पण, कोणताही व्यायाम प्रकार करण्याआधी नेहमीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, अशी सूचनाही डॉ. बिराली यांनी दिली.