Side Effect Of Using Phone in Toilet Piles Hemorrhoids : अनेकांच्या आयुष्यात मोबाईल ही आता एक महत्त्वाची वस्तू बनली आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच जण मोबाईलवर व्यस्त दिसतात. काही मिनिटांसाठीदेखील ते मोबाईलपासून दूर राहू शकत नाही. यात अगदी टॉयलेटला जातानाही अनेक जण मोबाईल बरोबर घेऊन जातात, तिथे तासनतास बसून रील्स स्क्रोल करत बसतात, कोणाशी तरी कॉल किंवा मेसेजवर बोलत बसतात. अशाप्रकारे लोक मोबाईलमुळे गरजेपेक्षा अधिक वेळ टॉयलेटमध्ये बसून राहतात. पण, या सवयीमुळे तुम्हाला एका गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो.
आरोग्यतज्ज्ञांनी या टॉयलेटमध्ये मोबाईल वापरण्याच्या या सवयींबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या सवयीमुळे पाईल्स अर्थात मूळव्याध होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतोय.
टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने वाढतोय मूळव्याधीचा धोका?
फोर्टिस हॉस्पिटल्सचे कन्सल्टंट सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रणव होन्नावरा श्रीनिवासन यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने मूळव्याध होण्याचा धोका वाढू शकतो, विशेषतः जेव्हा जास्त वेळ बसण्याची सवय होते तेव्हा हा धोका अधिक वाढतो, कारण टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने गुदाशय आणि गुदद्वाराच्या आजूबाजूच्या नसांवर सतत दाब येतो. या दाबामुळे या नसा सुजू शकतात, ज्यामुळे कालांतराने मूळव्याध होण्याची शक्यता असते.
यात काही जण मोबाईलमुळे गरजेपेक्षा जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसून राहतात, यामुळे टॉयलेटला जाण्याची एक छोटीशी क्रिया मोबाईलमुळे तासावर जाते. यामुळे गुदद्वाराजवळील शिरांवर ताण तर येतो, पण तेथील रक्तप्रवाहावरही परिणाम होतो. अशाने तुमची आरोग्यस्थिती बिघडू शकते. यात मूळव्याधीस कारणीभूत बद्धकोष्ठता किंवा ताण या आजारांचा धोका वाढतो.
मूळव्याध नेमकी कशामुळे होते, यात जास्तवेळ टॉयलेटमध्ये बसल्याने काय होतं?
मूळव्याध किंवा हेमरॉइड्समुळे गुदद्वारजवळील नसा सुजतात. यामागे अनेक कारणं असू शकतात, जसे की दीर्घकालीन बद्धकोष्ठता, शौचास बसताना जोर लावणं, कमी फायबरयुक्त आहार, लठ्ठपणा, गर्भधारणा आणि जास्त वेळ एकाच जागी बसण्याची सवय. विशेषतः टॉयलेट सीटसारख्या कठीण जागी तासनतास बसल्याने हा त्रास आणखी वाढू शकतो, असे डॉ. श्रीनिवासन म्हणाले.
टॉयलेटला बसण्याची सवय यात महत्त्वाची भूमिका बजावते. उदाहरणार्थ, जे लोक नियमितपणे टॉयलेटला बसताना जोर देतात किंवा गरजेपेक्षा जास्त वेळ घालवतात, त्यांच्या गुदाशयाच्या भागात दाब वाढतो. तु्म्ही टॉयलेटला कसे बसता याचाही परिणाम होतो. विशेषतः बसल्यानंतर पुढे झुकून बसता तेव्हा गुदद्वारांवरील नसांवर दाब येतो, त्यामुळे टॉयलेटमध्ये बसण्याची पद्धत सुधारा, जसे की, जास्त वेळ बसणे टाळणे आणि टॉयलेटला जाण्यास उशीर करू नका, तुम्ही टॉयलेट कंट्रोल करून राहिल्यास त्रास आणखी वाढणार, यामुळे कळ आल्यानंतर लगेच टॉयलेटमध्ये जा, याने तुम्हाला मूळव्याधीचा त्रास काही प्रमाणात रोखता येऊ शकतो, असे डॉ. श्रीनिवासन म्हणाले.
मूळव्याधीच्या ‘या’ लक्षणांवर ठेवा लक्ष
डॉ. श्रीनिवासन म्हणाले की, मूळव्याधीच्या सुरुवातीच्या लक्षणांमुळे तुम्हाला टॉयलेटला जाऊन आल्यानंतर गुदद्वाराभोवती थोडीशी खाज सुटेल किंवा जळजळ जाणवू शकते, पोट नीट साफ झालं नाही असे वाटेल. मलावाटे रक्तस्त्राव होणे, बसताना गुदद्वाराच्या जागी तीव्र वेदना होणे किंवा सतत काहीतरी टोचतयं असं वाटू लागणे.
खूप दिवसांपासून हा त्रास होत असल्यास कालांतराने काहींना गुदद्वाराजवळ लहान मोठी गाठदेखील दिसू शकते. जर ही लक्षणं दिसून आली तर तुमच्या जीवनशैली आणि आहारात बदल करणे तसेच लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचे आहे.
मूळव्याध रोखण्यासाठी डॉ. श्रीनिवासन यांनी सांगितल्या सोप्या टिप्स
१) टॉयलेटला झाली असे वाटत असल्यास वेळ न दवडता लगेच जा. पोट साफ झाल्यानंतर जास्तवेळ बसून राहू नका
२) फायबरयुक्त पदार्थ खा, कारण मूळव्याधीचा त्रास असल्यास मल मऊ होण्यासाठी आहारात शक्यतो उष्ण पदार्थ टाळा, त्याऐवजी कडधान्य, धान्य, फळं आणि पालेभाज्या खा.
३) मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी रोज भरपूर पाणी प्या, नियमित व्यायाम करा.